मराठी

सहाव्या वहीवरील चिंतने: 327-365

आता आपण संत फॉस्टिना यांच्या सहा वह्यांपैकी शेवटच्या वहीकडे वळतो. आपल्या अथांग आणि परिपूर्ण दयेविषयी प्रभूने त्यांना जे प्रकट केले, ते त्यांनी या वह्यांमध्ये लिहून ठेवले. इथवर येताना दयेचा संदेश तुम्हाला स्पष्ट झाला असेल आणि देवाच्या अगम्य प्रेमावर तुमचा गाढ विश्वास बसला असेल. आजवर सांगितलेल्या सर्व गोष्टींतून हे दिसून येते की देव तुम्हाला शोधण्याचे कधीच थांबवत नाही. तुमच्यावर बिनशर्त प्रेम करावे आणि तुम्हाला सर्वकाळ आपल्या गौरवमय जीवनात सहभागी करून घ्यावे, एवढीच त्याची इच्छा आहे.

पवित्र होण्याच्या या पाचारणात सर्वांत मोठा अडथळा म्हणजे पाप. पण देवाच्या दयेपुढे पापाचा टिकाव लागत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. त्याची दया क्षणात तुमचे पाप दूर करते आणि भूतकाळातील तुमच्या चुका कायमच्या पुसून टाकते. देवाला हवा आहे तो फक्त हा वर्तमान क्षण. कारण याच क्षणी तो स्वर्गातून उतरून तुमच्याकडे येतो आणि तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात प्रवेश करतो. तुमच्याशी परिपूर्ण ऐक्य साधण्यासाठी आणि तुम्हाला उंचावून आपल्या दैवी जीवनात सहभागी करून घेण्यासाठी तो येतो.

या शेवटच्या वहीवरील चिंतनात आजवरच्या सर्व चिंतनांचा सारांश असेल. पहिल्या वहीवरील चिंतनांप्रमाणेच या वहीतील चिंतनेही थोडक्यात आणि नेमकी असतील. हा अध्याय वाचून झाल्यावर पुन्हा पुन्हा त्याकडे वळा, म्हणजे देवाच्या विपुल दयेची आठवण तुम्हाला सहज आणि लगेच होईल. प्रभूचे प्रेम सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. हे सत्य स्पष्टपणे आणि ठामपणे तुमच्याशी बोलू देण्यासाठी प्रभूला तुमच्या अंतःकरणात जागा द्या.

चिंतन 327: देवाची गुप्त उपस्थिती

देव स्वतःला लपवतो. पण का? आपण त्याचा आस्थेने शोध घ्यावा म्हणून तो गुप्ततेच्या आणि मौनाच्या पडद्याआड राहतो. जगात तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींशी तो स्पर्धा करत नाही, कारण तुमच्या मनाला केवळ त्याचीच ओढ असावी, अशी त्याची इच्छा आहे. तो तुमच्या अंतःकरणात, पवित्र संस्कारांमध्ये, मौनात आणि दिवसभरात तुम्हाला भेटणाऱ्या माणसांमध्ये दडलेला आहे. त्याचा शोध घेण्याची इच्छा मनात बाळगा. प्रभू तिथेच आहे. अथांग दयेने भरलेले त्याचे हृदय तुम्हाला सापडावे म्हणून तो तुमची वाट पाहत आहे. आपल्या सर्व शक्तीनिशी त्याचा शोध घ्या (पाहा: दैनंदिनी #1591).

आज देवाच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा. देव तुमच्या सभोवती आहे, तो तुम्हाला सतत हाक देत आहे आणि आपल्या हृदयात येण्याचे आमंत्रण देत आहे, याची जाणीव ठेवा. तुम्ही उदासीन झालात किंवा जगातील गोष्टींनी तुमचे लक्ष विचलित होऊ दिलेत, तर तो तुमच्या किती जवळ आहे, हे तुम्हाला कधीच उमगणार नाही. त्याच्या गुप्त उपस्थितीवर चिंतन करा आणि आजच त्याचा शोध घ्यायला संकोच करू नका.

हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण कधीकधी माझ्या जगण्यात ते प्रेम पुरेपूर उतरू शकत नाही. शेवटी फारसे महत्त्व नसलेल्या गोष्टींमुळे माझे लक्ष सहज विचलित होते. माझे लक्ष पुन्हा तुझ्याकडे वळवायला आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझा शोध घ्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 328: स्वर्ग

स्वर्ग आपल्याला अशा जीवनाचे आमंत्रण देतो, ज्याचा गौरव आणि परिपूर्णता आपल्या आकलनापलीकडची आहे. स्वर्गातही देवाचे आणि त्याच्या दयेचे गौरवशाली रहस्य आपल्याला पूर्णपणे समजणार नाही. गौरवाने आणि कृपेने तेजस्वी झालेले संत स्वर्गातून आपल्याकडे प्रेमाने पाहतात. देवाची दया आपल्याला भरभरून लाभावी, अशी त्यांची इच्छा आहे. स्वर्ग हेच तुमच्या जीवनाचे पहिले आणि अंतिम ध्येय ठेवा. हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सर्व काही करा. मग सर्वकाळासाठी तुम्ही जो खजिना साठवाल, तो तुमच्या आशेपेक्षाही कितीतरी अधिक समृद्ध असेल (पाहा: दैनंदिनी #1592).

स्वर्ग हेच आपल्या जीवनातील एकमेव खरे ध्येय आहे, असे तुम्हाला वाटते का?  या पृथ्वीवर आपण प्रेमाने अर्पण केलेल्या प्रत्येक कृतीचे स्वर्गात स्मरण केले जाईल आणि तिचा गौरव होईल.  या जगातून आपल्या शाश्वत निवासस्थानी जाण्याच्या गौरवशाली दिवसाची तयारी म्हणूनच आपण पृथ्वीवर सर्व काही करावे.  आपल्या इच्छांचे चिंतन करा. स्वर्गाच्या वैभवाला तुमच्या इच्छांमध्ये पहिले स्थान नसेल, तर ते ओळखा, आपले लक्ष पुन्हा स्वर्गाकडे वळवा आणि या अंतिम पारितोषिकावर आपली दृष्टी खिळवण्याचा प्रयत्न करा.  स्वर्गाचे सौंदर्य आणि वैभव न्याहाळताना, प्रभू तुमच्या अंतःकरणात स्वर्गाची तीव्र ओढ जागवून तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करील.

हे प्रभू, स्वर्गाच्या आनंदाने माझे अंतःकरण भरून टाक. हे ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवायला आणि या जीवनात मी जे काही करीन, ते त्या मधुर भेटीची तयारी म्हणून करायला मला मदत कर. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्याशी माझे परिपूर्ण ऐक्य होईल, त्या दिवसाची मला मोठी आशा आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 329: आनंदाने पापस्वीकार करणे

पापस्वीकाराची तुम्हाला भीती का वाटते? हा गौरवशाली संस्कार आपल्या प्रभूच्या कोमल हृदयातून तुम्हाला दिला जातो. या गौरवशाली देणगीद्वारे येशू तुमच्या खांद्यांवरचे ओझे उतरवतो, जेणेकरून त्याच्या दयेत तुम्हाला अधिक पूर्णपणे सहभागी होता येईल. हे तुम्हाला उमगले असते, तर नियमितपणे पापस्वीकाराला जाण्यास तुम्ही क्षणभरही कचरला नसता. तुमची दयनीय अवस्था उघड होते म्हणून नव्हे, तर या संस्कारामुळे तुम्हाला त्या अवस्थेतून बरे होऊन कायमची मुक्ती मिळते म्हणून तुम्हाला त्याची ओढ वाटली असती (पाहा: दैनंदिनी #1602).

समेटाच्या संस्काराच्या देणगीकडे तुम्ही कोणत्या भावनेने पाहता, याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. मनात संकोच जाणवत असेल, तर त्यामागचे कारण शोधा. स्वतःच्या पापांना सामोरे जाण्याची भीती वाटते का? धर्मगुरूंना सामोरे जाण्याची भीती वाटते का? तुमच्या निर्णयावर भीतीचा प्रभाव कधीही पडू देऊ नका. या संस्कारातून शेवटी काय लाभते याकडे लक्ष द्या आणि मनातली भीती सोडून द्या. त्यातून तुम्हाला स्वातंत्र्य लाभते आणि तुम्ही देवाशी एकरूप होता. या दयेची तुम्हाला गरज आहे आणि ती स्वीकारल्याचा तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही.

हे प्रभू, या गौरवशाली संस्काराविषयी माझ्या मनात असलेल्या भीतीतून मला मुक्त कर. तुझ्या अनंत दयेकडे पाहत असतानाच मला माझ्या पापांकडे प्रामाणिकपणे पाहायला मदत कर. या दयेची तीव्र इच्छा आणि ती देत असलेल्या स्वातंत्र्याची ओढ माझ्या अंतःकरणात जागव. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 330: इतरांसाठी प्रार्थना करणे

तुमच्या प्रार्थनांचे सामर्थ्य कमी लेखू नका. देवाच्या दयेवर तुमचा जितका अधिक विश्वास असेल, तितक्या तुमच्या प्रार्थना ज्यांना त्यांची गरज आहे त्यांच्यासाठी अधिक प्रभावी ठरतील. प्रभूला सर्व काही ठाऊक आहे. कोणाला कशाची गरज आहे हेही त्याला माहीत आहे. पण जे त्याची कृपा मागतात, त्यांच्याशी एकरूप होऊन ती द्यावी, अशी त्याची इच्छा आहे. इतरांसाठी प्रार्थना करणे हा देवाची दया या जगात आणण्याचा तुमच्यासाठी सर्वांत प्रभावी मार्ग आहे (पाहा: दैनंदिनी #1603).

तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता का? करत नसाल, तर तशी प्रार्थना करण्याचा निश्चय करा. एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट गरजेसाठी किंवा ती ज्या अडचणीतून जात आहे तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. पण त्या प्रार्थनेचा नेमका काय परिणाम व्हावा, हे आपण नेहमी देवाच्या दयेवर सोपवावे. इतरांना देवाच्या हाती सोपवणे आणि कोणत्याही परिस्थितीत काय घडणे सर्वांत हिताचे आहे हे त्याला माहीत आहे असा भरवसा ठेवणे, हे आपल्या प्रभूला आवडते. त्यामुळे गरज असलेल्यांना विपुल कृपा लाभते.

प्रभू, आज जे सर्व जण दुःखी आहेत आणि ओझ्याखाली दबले आहेत, त्यांना मी तुला अर्पण करतो. पापी, संभ्रमात पडलेले, आजारी, तुरुंगात असलेले, श्रद्धेत दुर्बळ असलेले, दृढ श्रद्धा असलेले, व्रतस्थ स्त्री-पुरुष, सामान्य ख्रिस्तविश्वासी आणि तुझे सर्व याजक यांना मी तुला अर्पण करतो. प्रभू, तुझ्या लोकांवर दया कर, विशेषतः ज्यांना तुझ्या दयेची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यावर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 331: तुमच्या सामर्थ्यापलीकडे काहीही नाही

तुमच्या सामर्थ्यापलीकडचा क्रूस तुम्हाला वाहावा लागेल, असे प्रभू कधीही होऊ देणार नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला यावर विश्वास आहे का? असेल, तर पुढच्या वाटेवर लक्ष ठेवून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे जाण्यास तो विश्वास तुम्हाला मदत करील. वाटेत कितीही मोठी संकटे आली, तरी हे नक्की जाणा की जीवनात तुम्हाला जे काही सामोरे येईल त्यातून जाताना प्रभू तुमच्या सोबत आहे. गरज पडली तर तो तुम्हाला उचलून नेईल. तुमची नजर त्याच्यावर खिळलेली असेल, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या दयेपासून आणि त्याच्या परिपूर्ण इच्छेपासून दूर ठेवू शकणार नाही (पाहा: दैनंदिनी #1607).

प्रभूने तुमच्यासमोर ठेवला आहे असे तुम्हाला वाटते, त्या मार्गावर चिंतन करा. कोणते अडथळे पार करणे तुम्हाला अशक्य वाटते? ते कोणतेही असोत, धैर्याने आणि आपल्या प्रभूवर पूर्ण भरवसा ठेवून तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे. काही गोष्टी कितीही वेदनादायक असल्या, तरी देवाच्या दयेच्या आवाक्याबाहेर काहीही नाही. तुम्ही त्याला तसे करू दिले, तर तो तुमच्यासमोरची खडतर वाट सुगम करील.

प्रभू, तू सदैव माझ्या सोबत आहेस, मला मार्ग दाखवतोस आणि माझे रक्षण करतोस, यावर माझा खरोखर विश्वास आहे. जीवनात एखादे संकट आले, तर तुझ्या कृपेवर अधिक अवलंबून राहण्याची संधी म्हणून त्याकडे पाहायला मला मदत कर. प्रिय प्रभू, जे काही करण्यास तू मला बोलावतोस ते सर्व मी करू शकतो, हे मला माहीत आहे. तू माझ्यासाठी आखून दिलेल्या मार्गाने चालण्याचा मी निश्चय करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 332: क्रूस वाहताना कधीही थकू नका

प्रभू संत फॉस्टिनाशी दुःखसहनाविषयी पुष्कळ बोलतो. अपमान आणि शारीरिक आजार यांमुळे तिने पुष्कळ दुःख भोगले. तिची दुःखे त्याच्या क्रूसाशी जोडली गेली की त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होते, याची आठवण येशू तिला न थकता करून देत असे. हा संदेश कधीही विसरता कामा नये. दुःखसहन हा ‘सुखाचा’ विषय नसला, तरी त्याचा खरा अर्थ समजला की तो आनंदाचा विषय ठरतो. तुमची दुःखे जगात देवाची दया पोहोचवण्याचे साधन होऊ शकतात, हे उमगले की ती स्वीकारण्यास आणि ख्रिस्ताशी जोडण्यास तुम्ही कचरणार नाही. देवाच्या दयेच्या या पवित्र साधनाविषयी कधीही शंका बाळगू नका (पाहा: दैनंदिनी #1612).

दुःखे सोसण्याचा आणि त्यांच्याविषयी बोलण्याचाही शीण येऊ शकतो; पण आपली दुःखे प्रभूच्या क्रुसाशी जोडलेली नसतात तेव्हाच असे होते. ती त्याच्या क्रुसाशी जोडली की त्यांचे ओझे हलके होते. हे तुम्हाला उमगले आहे का आणि त्यानुसार तुम्ही जगता का, यावर चिंतन करा. त्यानुसार जगत असाल, तर तुमची दुःखे आता जड ओझे राहिलेली नाहीत, उलट ती आनंदाचा स्रोत झाली आहेत, असे तुम्हाला जाणवेल. अशा पूर्ण समर्पणापर्यंत पोहोचणे कठीण असले, तरी हेच तुमचे पाचारण आहे आणि त्याचे प्रतिफळ तुमची वाट पाहत आहे.

प्रभू, मी सोसत असलेली प्रत्येक वेदना आणि प्रत्येक दुःख तुला अर्पण करताना मला कधीही थकवा येऊ नये. मोठी संकटे आली, तर ती तुला अर्पण करायला मला मदत कर. लहानसहान त्रास झाले, तरी ते तुला अर्पण करायला मला मदत कर. प्रिय प्रभू, हे सर्व मी तुझ्या गौरवशाली क्रूसाशी जोडतो आणि हे सर्व बदलून टाकण्याच्या तुझ्या अगाध सामर्थ्यावर भरवसा ठेवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 333: साधेपणा

कधी कधी जीवन गुंतागुंतीचे वाटते आणि आपण स्वतःही तसेच भासू शकतो. पण खरे तर जीवनातल्या गुंतागुंतीपलीकडे पाहून हे समजून घेण्याची गरज आहे की देवाच्या दृष्टीने आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन साधे आहे. ते साधे आहे, कारण आपल्याला एवढेच करायचे आहे: दररोज त्याला ‘हो’ म्हणायचे, सर्व काही त्याच्या हाती सोपवायचे आणि प्रत्येक पावलावर त्याच्यावर भरवसा ठेवायचा. त्याच्या प्रेरणांना आणि कृपेला आपण तत्परतेने प्रतिसाद दिला पाहिजे. पण या गुंतागुंतीच्या जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये शिरून त्यांचा उलगडा करण्याची आणि सगळे प्रश्न सोडवण्याची गरज नाही. हे आपल्या आवाक्यापलीकडचे आहे आणि देव ते कितीतरी चांगल्या रीतीने करू शकतो. देवाच्या परिपूर्ण सुज्ञतेवर भरवसा ठेवणारे साधे मन मिळवण्याचा प्रयत्न करा. मग तो तुमच्या जीवनातल्या गुंतागुंती सोडवील (पाहा: दैनंदिनी #1617).

कधीकधी तुमचे जीवन गुंतागुंतीचे वाटते का? या प्रश्नावर चिंतन करा. उत्तर “हो” असेल, तर कदाचित तुम्ही देव तुमच्याकडून जे मागतो त्यापेक्षा अधिक करण्याचा आणि ज्यांची उत्तरे त्याला आधीच माहीत आहेत असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात. आज साध्या मनाने आणि विश्वासाने त्याच्याकडे वळा. तो तुम्हाला जे काही सांगेल त्याला प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा आणि तो प्रतिसाद मनापासून व तत्परतेने द्या. पण जीवनात दिसणाऱ्या सगळ्या गुंतागुंतींची काळजी करू नका. प्रभूला त्या चांगल्या समजतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळात तो तुम्हाला मार्ग दाखवेल.

प्रभू, मला साधे मन लाभावे, अशी मी प्रार्थना करतो. तुझ्यावर आणि तुझ्या सुज्ञतेवर पूर्ण भरवसा ठेवून या वाटेने चालण्याचे मी ठरवतो. प्रिय प्रभू, तुला सर्व काही माहीत आहे. मी तुला मार्ग दाखवू दिला, तर जीवनात जी गुंतागुंत भासते, तिच्यातून तू मला प्रत्येक पावलावर मार्ग दाखवशील. प्रिय प्रभू, यावर माझा खरोखर विश्वास आहे. हा विश्वास माझ्या संपूर्ण जिवाने धरून ठेवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 334: आत्म्यांची सेवा

इतरांची सेवा करण्याची क्षमता हा आपल्याला मिळालेल्या सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आहे. आपण अनेक प्रकारे त्यांची सेवा करतो, विशेषतः आपल्यापैकी प्रत्येकाला लाभलेल्या जीवनपाचारणानुसार. पण एखाद्या व्यक्तीसाठी आपण करू शकणारी सर्वांत मोठी सेवा म्हणजे देवाच्या दयेचे सेवक होऊन त्या व्यक्तीला स्वर्गाच्या वैभवाकडे नेणे. देवावरचे प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही असंख्य आत्म्यांना प्रेरणा दिली आहे, हे जाणून स्वर्गात असणे कसे असेल, याची कल्पना करा. हा तुमच्या जीवनातला एक मोठा आशीर्वाद आणि बहुमान आहे, असे माना (पाहा: दैनंदिनी #1622).

आपल्या देवाचे सत्य, प्रेम आणि करुणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही किती आतुर आहात?  ही किती मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे आणि तिच्यामुळे तुम्हाला किती मोठी प्रतिष्ठा लाभते, हे तुम्हाला जाणवते का?  जीवनात या कार्याला सर्वोच्च प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल कधीही शंका बाळगू नका.  संपूर्ण अंतःकरणाने आणि सर्वस्वाने देवावर प्रेम करणे हे प्रथम येते; त्याखालोखाल इतरांची सेवा करणे आणि तारणाच्या वाटेवर त्यांना मदत करणे येते.  दयेच्या या गौरवशाली कार्यासाठी आजच स्वतःला वाहून घ्या. असे केल्याबद्दल तुम्ही अनंतकाळ कृतज्ञ राहाल.

प्रभू, इतरांची मनापासून सेवा करण्याची इच्छा आणि निर्धार मला दे. त्यांच्यावर प्रेम करायला आणि त्यांच्या जीवनात तुझी दया व करुणा पोहोचवायला मला मदत कर. प्रिय प्रभू, माझ्या जीवनाद्वारे तू त्यांना जी कृपा देतोस, तिच्यामुळे अनेक आत्मे तुझ्याकडे येवोत. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 335: सदैव क्षमा करणे 

जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने व करुणेने वागणे, ही जीवनातल्या सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक आहे. पण त्यांचा द्वेष करून किंवा त्यांच्यावर राग काढून काय साधते? अशा रीतीने त्यांना ‘इजा’ करण्याने त्यांच्या आत्म्यापेक्षा तुमच्याच आत्म्याची कितीतरी जास्त हानी होते. क्षमा करा, पुन्हा क्षमा करा आणि वारंवार क्षमा करत राहा. खरे तर, दुसऱ्याला क्षमा करणे हा देवाच्या न्यायाचा एक आविष्कार आहे. यातून त्या व्यक्तीला क्षमेची गरज आहे हे स्पष्ट होते आणि तिच्या दुष्ट हेतूंची तुमच्या जीवनावर असलेली घातक पकड सुटते. त्यांना क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांना देवाच्या दयेवर सोपवा. असे केल्याने तुमच्या आत्म्याला मोठी शांती लाभेल (पाहा दैनंदिनी #1628).

तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आहे का, जिचा तुम्ही द्वेष करता? किंवा निदान अशी कोणी व्यक्ती आहे का, जिच्यावर फार राग धरावासा तुम्हाला वाटतो? असेल तर आज त्या व्यक्तीविषयी विचार करा आणि तिला क्षमा करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्या. या निर्णयामुळे तुमच्या भावना लगेच बदलतीलच असे नाही, पण त्यातून तुम्हाला हळूहळू शांती मिळू लागेल. मनात राग असेपर्यंत त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा क्षमा करा. प्रभू तुमच्या जीवनातून हा दुर्गुण छाटून टाकील आणि त्याच्या जागी आपला आनंद देईल.

हे प्रभू, तुझ्या अपार दयेने तू माझ्या पापांची क्षमा केली आहेस. मी या देणगीस पात्र नाही, तरी तिच्याबद्दल मी तुझे आभार मानतो. इतरांशी, विशेषतः ज्यांनी मला दुखावले आहे त्यांच्याशी, तितक्याच गाढ दयेने आणि करुणेने वागण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, मी त्यांना क्षमा करतो. हजार वेळा, त्याहूनही अधिक वेळा, मी त्यांना क्षमा करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 336: जगाची संपत्ती… की देव?

ऐहिक वस्तूंची आस आपल्याला कितीदा लागते, हे विचार करण्यासारखे आहे. जगातले सगळे खजिने एकट्या तुमच्या मालकीचे झाले, तरी तुमच्या मनाची ओढ तृप्त होणार नाही. तुमच्या अंतःकरणातली पोकळी भरून काढू शकतात ते केवळ प्रभू आणि त्याची पवित्र इच्छा. दुसरे काहीही पुरेसे नाही. तरीही नाशवंत गोष्टी अधिकाधिक मिळवण्यासाठी आपण किती धडपड करतो! (पाहा दैनंदिनी #1632.)

आज थोडा वेळ काढून कल्पना करा की तुम्हाला अफाट संपत्ती मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात काय बदल होईल? त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल का? कदाचित त्यात गंमत वाटेल, कुतूहल आणि उत्साह निर्माण होईल, करमणूकही होईल… निदान काही काळ तरी. पण सत्य हे आहे की देवाशिवाय दुसरे काहीही तुमच्या हृदयातील पोकळी भरून काढू शकत नाही. होय, तुमच्या हृदयात अशी एक पोकळी आहे जी भरून निघायला हवी. ती तुम्हाला जाणवते आणि ती कशी भरून काढावी, याचा तुम्ही सतत शोध घेत असता. देवाला आणि त्याच्या दयेला आपल्या हृदयात स्थान देऊन ती पोकळी भरून काढा. इतका काळ तुम्हाला ज्याची आस होती, ते तुम्हाला विनामूल्य स्वीकारता येते, हे तुमच्या लक्षात येईल.

हे प्रभू, तूच माझे धन, तूच माझी संपत्ती आहेस. माझ्या जीवनात मला फक्त तुझीच आस असावी. या सत्यावर विश्वास ठेवण्याची आणि माझ्या साऱ्या आकांक्षांची पूर्ती म्हणून तुझी निवड करण्याची कृपा मला दे. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 337: चिंतेत असलेल्यांना आधार देणे

आपल्या जीवनात अस्वस्थ, व्याकूळ किंवा चिंतेत असलेली माणसे आपल्याला अधूनमधून भेटतील, हे जवळजवळ निश्चित आहे. या ना त्या गोष्टीचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत राहू शकतो, आणि कधी कधी त्यांच्या विचारांना तर्काचाही फारसा आधार नसतो. अशा वेळी दया दाखवण्याची किती कृपामय संधी आपल्याला मिळते! जीवनात चिंता आणि काळजी येणारच, पण आपण त्यांत ओढले जाऊ नये. आपण आपली मनःशांती टिकवावी, प्रसंगातला ताण हलका करावा आणि विशेषतः या ओझ्याशी झुंजणाऱ्यांसाठी प्रार्थना करावी (पाहा दैनंदिनी #1636).

एखादी व्यक्ती अतिशय काळजीत किंवा चिंतेत आहे असे दिसते, तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते? हे त्या व्यक्तीसाठी मोठे ओझे असते आणि त्यामुळे तिला खूप ताण येतो. अशा परिस्थितीत तुम्ही लोकांशी कसे वागता, यावर चिंतन करा. त्यांच्या काळजीने ग्रासलेल्या मनाला आणि अस्वस्थ हृदयाला शांती देण्यासाठी प्रभूला तुमच्याद्वारे कार्य करायचे आहे, हे लक्षात ठेवा. दयेचे हे कार्य करण्याचा निश्चय करा, आणि प्रभू त्यांना आशीर्वाद देईल.

हे प्रभू, मला तुझ्या शांतीचे साधन बनव. ज्यांच्या मनाला शांती नाही आणि जे चिंतेने ग्रासलेले आहेत, अशी माणसे मला भेटतात तेव्हा त्यांच्याकडे करुणेने आणि प्रेमाने पाहण्यास मला मदत कर. या जिवांना तुझ्या दयेची गरज आहे आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तू मलाच पाठवले आहेस, याची मला जाणीव होऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 338: गुपित जपणे

एखाद्या व्यक्तीने आपल्याला विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे ही प्रेमाची एक कृती आहे. कुणीतरी आपली अडचण किंवा मनातला गोंधळ घेऊन आपल्याकडे येते आणि ही गोष्ट कुणालाही सांगू नका, अशी विनंती करते, हा अनुभव आपणा सर्वांना आला आहे. अशा प्रकारचे पवित्र गुपित तुम्हाला जपता येईल का? दुसऱ्याने विश्वासाने सांगितलेली गोष्ट गुप्त ठेवणे ही दयेची एक सुंदर कृती आहे. तुम्ही खरोखरच गुपित जपता हे लोकांच्या लक्षात आले, तर ते आपल्या चिंता घेऊन अधिक मोकळेपणाने तुमच्याकडे येतील. मैत्रीपोटी केलेल्या या प्रेमळ कृतीमुळे त्यांना तुमच्यापुढे मन मोकळे करणे आणि तुम्हाला आपल्या अंतःकरणात स्थान देणे शक्य होते. त्यांनी मन उघडल्यावर त्यांना अतिशय समजूतदारपणे आणि काळजीपूर्वक समजून घ्या. प्रभू तुमच्याद्वारे त्यांना आशीर्वाद देईल (पाहा दैनंदिनी #1638).

एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याबद्दल चिंतन करा.  कोणी विश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, तर ती आणखी कोणाला सांगता येईल, असा विचार लगेच तुमच्या मनात येतो का?  ती गुपिते उघड करण्याचा किंवा त्याहूनही वाईट म्हणजे लोकांमध्ये त्यांची चर्चा पसरवण्याचा मोह तुम्हाला होतो का?  इतरांना जे काही सांगायचे असेल, ते ऐकून घेणारे, त्यांना समजून घेणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असे अनेक जीव प्रभूला हवे आहेत.  पवित्र भावनेने इतरांचे ऐका आणि त्यांनी विश्वासाने सांगितलेले गुपित जपा; अशा रीतीने तुम्ही प्रभूची दया अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन व्हाल.

हे प्रभू, माझ्या वागण्यात प्रामाणिकपणा आणि सचोटी असावी आणि ज्यांना मन मोकळे करायचे आहे, त्यांचे म्हणणे मी करुणेने ऐकून ते गुप्त ठेवावे, अशी मी प्रार्थना करतो.  निरर्थक बडबड आणि दुसऱ्यांच्या खासगी गोष्टींची चर्चा करण्यापासून मुक्त होण्यासाठी मला कृपा दे. प्रत्येक व्यक्तीच्या खासगीपणाचा आदर करून तिचा सन्मान जपण्याची कृपाही मला दे.  अधिक जाणून घेण्यासाठी मी कधीही आग्रह धरू नये किंवा खोदून विचारू नये; उलट, प्रेम दाखवायला सदैव तयार असलेला करुणामय मित्र व्हावे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 339: निर्मळ आत्मा

हे कदाचित तुमच्या लगेच लक्षात येणार नाही, पण देवावर निर्मळ प्रेम करणाऱ्या आत्म्याची अनेकांना भीती वाटते. ही ‘भीती’ म्हणजे अशा आत्म्याला विरोध करण्याची भीती. दुष्ट हेतू बाळगणारे लोक अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण तो प्रयत्न त्यांच्यावरच उलटू शकतो हे त्यांना माहीत असते. तुमचे अंतःकरण पूर्णपणे प्रभूवर स्थिर असेल, तर कोणीही तुमची हानी करू शकत नाही (पाहा दैनंदिनी #1643).

तुम्हाला कशाची भीती वाटते? किंवा ‘तुम्हाला भीती का वाटते?’ हा प्रश्न कदाचित अधिक योग्य ठरेल. तुमचे हृदय ख्रिस्ताच्या हृदयाशी एकरूप असेल, तर काळजी करण्याचे किंवा कशालाही घाबरण्याचे कारण नाही. इतरांनी तुमच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला केला, तरी तुमचे हृदय ख्रिस्ताशी दृढपणे जोडलेले असेल, तर त्या हल्ल्याने काही फरक पडणार नाही. डोळ्यांसमोर धुके आणा आणि ते म्हणजे जीवनातील अनेक संघर्ष आहेत असे समजा. मग तेजस्वी, प्रखर सूर्य उगवून ते धुके विरघळून टाकतो, अशी कल्पना करा. आपण आपले हृदय प्रभूवर लावतो, तेव्हा असेच घडते.

हे प्रभू, माझा आत्मा निर्मळ असावा आणि माझे अंतःकरण केवळ तुझ्यावर स्थिर असावे, अशी माझी इच्छा आहे. हे प्रिय प्रभू, माझे अंतःकरण तुझेच आहे. माझी सारी शक्ती एकवटून मी ते तुझ्या हाती सोपवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 340: परीक्षेला सामोरे जाणे

परीक्षेला सामोरे जाणे त्या क्षणी सुखद वाटेलच असे नाही, पण कधीकधी त्यातून आपल्याला खूप लाभ होतो. प्रभू अनेक प्रकारे अशा परीक्षा येऊ देतो. परीक्षा म्हणजे मोह नव्हे. उलट, प्रभू आपल्याला कसोटीचा प्रसंग सोसू देतो आणि त्याद्वारे त्याच्या पवित्र इच्छेपुढे अधिक पूर्णपणे समर्पित होण्याचे आमंत्रण देतो. एखादी कसोटी आपल्यासमोर येत आहे असे जाणवले, तर गुडघे टेकून अशी प्रार्थना करणे हे सर्वांत उत्तम: “हे प्रभू, सर्व बाबतींत तुझी दैवी इच्छा पूर्ण होवो! तुझी जी काही इच्छा असेल, ती मी पूर्ण मनाने स्वीकारतो!” विशेषतः कसोटीच्या प्रसंगी ही किती समर्पक प्रार्थना आहे! ही प्रार्थना तुम्हाला त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करील (पाहा दैनंदिनी #1648).

जीवनात एखाद्या परीक्षेला सामोरे जावे लागते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही निराश होता का? की गुडघे टेकून आपले जीवन देवाला समर्पित करता? यावर चिंतन करा आणि प्रत्येक बाबतीत स्वतःला देवाच्या हाती सोपवण्याचा निश्चय करा, म्हणजे तुम्ही जीवनातील प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण व्हाल.

हे प्रभू, मी स्वतःला पूर्णपणे तुझ्या स्वाधीन करतो. आज जे काही मी आहे आणि भविष्यात जे काही होण्याची आशा बाळगतो, ते सर्व तू स्वीकार. प्रभू, सर्व काही तुझेच आहे. माझ्याबाबतीत तुला जे करावेसे वाटेल, ते तुला हवे तेव्हा आणि हवे तसे कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 341: हे माझ्या आत्म्या, प्रभूची आराधना कर

निसर्गाचा एखादा अद्भुत चमत्कार तुम्ही पाहिला असेल, तर तो नजरेस पडताच मन कसे विस्मयाने भरून जाते, हे तुम्हाला ठाऊक असेल. ग्रँड कॅनियन, नायगरा धबधबा किंवा स्विस आल्प्स पर्वतरांग प्रथमच पाहताना तुम्ही थक्क व्हाल आणि त्या क्षणी देवाची सृष्टी पाहून तुमचे मन आराधनेत तल्लीन होईल. पण निसर्गाचे सौंदर्य तुमच्या मनात अशी भावना जागवू शकते, तर देवाचे अनंत सौंदर्य तुम्हाला अनंतकाळ विस्मयात ठेवेल. ते ‘दर्शन’ असे असेल की देवाशी समोरासमोर भेट होताच तुमचे संपूर्ण अस्तित्व त्याच्याकडे ओढले जाईल. आणि तो ‘क्षण’ अनंतकाळ टिकेल. देवाच्या आराधनेकडे स्वतःला ओढले जाऊ दिलेत, तर त्या क्षणाची सुरुवात आत्ताच होऊ शकते (पाहा दैनंदिनी #1652).

देवाची आराधना करणे म्हणजे काय, हे तुम्हाला समजते का? ते समजून घेण्याचा एकच मार्ग आहे: स्वतः आराधना करणे. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला ग्रँड कॅन्यनबद्दल सगळे सांगितले, तर ते ऐकणे रंजक वाटेल; पण ते आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्याविषयीची तुमची समज पूर्णपणे बदलते. आपल्या संपूर्ण जिवाने देवाची आराधना करणे म्हणजे काय, हे तुम्हाला खरोखर उमगले आहे का, यावर आज चिंतन करा. ते अजून उमगले नसेल, तर या अलौकिक अद्भुत अनुभवाचा शोध घ्या.

हे प्रभू, माझ्या संपूर्ण अस्तित्वाने तुझी आराधना करावी, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या सौंदर्याने आणि गौरवाने मला मंत्रमुग्ध व्हायचे आहे. हे प्रिय प्रभू, मला तुझ्याकडे ओढून घे आणि ज्या गौरवाचे दर्शन मला अनंतकाळ घडणार आहे, त्याची एक झलक तरी मला पाहू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 342: प्रभूच्या दुःखसहनातून मिळणारा दिलासा

सहसा ‘दुःखसहन’ आणि ‘दिलासा’ हे शब्द आपण एकत्र वापरत नाही. ख्रिस्ताच्या दुःखसहनातून दिलासा कसा मिळू शकतो? लौकिक दृष्टीने पाहता, ते केवळ भयावह आणि दुःखद आहे. प्रभूने अपार यातना सोसल्या आणि आपल्या धन्य मातेनेही अत्यंत दुःखित अंतःकरणाने त्याच्यासोबत दुःख सोसले. तरीही या कृतीत त्या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. कारण प्रभूचे दुःखसहन ही निखळ प्रेमाची कृती आहे. आणि प्रेमासारखा दिलासा दुसरे काहीही देऊ शकत नाही. तुम्ही आपल्या प्रभूच्या दुःखसहनावर मनन करता, तेव्हा त्याच्या यातना सोसणाऱ्या आत्म्याला आनंद आणि दिलासा देता. त्याच्या दुःखसहनात तुम्ही सहभागी होता, तेव्हा तुमच्या स्वतःच्या क्रुसांचेही रूपांतर होते (पाहा दैनंदिनी #1657).

आपल्या प्रभूच्या दुःखसहनावर चिंतन करणे कधीही थांबवू नका. त्याची प्रतिमा तुमच्या अंतःकरणावर कोरली गेली पाहिजे. निखळ प्रेमाच्या या कृतीवर तुम्ही किती वेळा मनन करता, याचा विचार करा. या कृतीचा अर्थ तुम्हाला उमगतो का? आपल्या प्रभूला ही देणगी देण्यास प्रवृत्त करणारे प्रेम आणि करुणा तुम्हाला दिसतात का? आज प्रभूच्या दुःखसहनावर आपली दृष्टी खिळवा आणि परिपूर्ण दयेच्या या दिलासा देणाऱ्या कृतीवरून ती कधीही हटवू नका.

हे प्रभू, तुझ्या दुःखसहनाचे खरे स्वरूप मला पाहू दे. तुझ्या दुःखाचा आणि वेदनांचा पडदा बाजूला कर, म्हणजे ज्या प्रेमाने तुला या क्षणापर्यंत आणले ते मला दिसेल. या सौंदर्याकडे पाहताना माझ्याकडून तुला आनंद लाभो आणि तुझ्या दयेने माझे रूपांतर होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 343: प्रत्येक गोष्टीत प्रभूचा गौरव करणे

सगळे सुरळीत चालले असताना कृतज्ञ राहणे सोपे असते. पण कठीण काळात आपण स्वतःची कीव करत स्वतःतच गुरफटून जातो. तरीही प्रत्येक गोष्टीत प्रभूचा गौरव करायला तुम्ही शिकले पाहिजे. देव तुम्हाला असंख्य आशीर्वाद आणि कृपा देतो; त्यांबद्दल तुमच्या मनात अपार कृतज्ञता असली पाहिजे. कुटुंबाला लाभलेले आशीर्वाद, आध्यात्मिक सांत्वन, कर्तव्ये पार पाडण्याचे समाधान अशा सर्व गोष्टी कृतज्ञतेच्या संधी ठरल्या पाहिजेत. पण जीवनाच्या प्रत्येक अंगात, अगदी कठीण प्रसंगांतही, कृतज्ञता असली पाहिजे. केवळ ‘जीवनातील चांगल्या गोष्टीं’बद्दलच नव्हे, तर कठीण प्रसंगांतून जातानाही प्रभूचा गौरव करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट देव स्वतःच्या गौरवासाठी वापरू शकतो; या जाणिवेत आपण रात्रंदिवस आनंद मानला पाहिजे (पाहा दैनंदिनी #1661-1662).

या “आव्हानावर” मनन करा. काहीही घडले तरी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद मानता येईल का? देवाची स्तुती करून त्याचे आभार मानता येतील का? असे करणे सार्थ आहे, कारण देव तुमच्या अखंड स्तुतीस पात्र आहे. तो तुम्हाला कधीही सोडत नाही. ही जाणीवच तुमच्या अखंड स्तुतीचा आणि कृतज्ञतेचा झरा बनेल.

हे प्रभू, मी तुझी आराधना आणि उपासना करतो, तुझी स्तुती करतो आणि माझ्या जीवनातील सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो. तू दिलेल्या आशीर्वादांबद्दल आणि कठीण काळातही तू नेहमी माझ्या सोबत असतोस याबद्दल तुझे आभार. तुझ्याबद्दलची माझी कृतज्ञता वाढत जावी आणि तुझ्या दयेचा मी सदैव आनंद मानावा, यासाठी मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 344: पापाबद्दल चिंता करणे सोडा

हे शीर्षक जरा विचित्र वाटेल. पाप टाळण्यासाठी तुम्ही कसोशीने प्रयत्न केला पाहिजे; त्या अर्थाने पापाबद्दल तुम्ही सावध असले पाहिजे. पण देवाच्या दयेची तुम्हाला असलेली समज महासागराच्या तुलनेत पाण्याच्या एका थेंबाएवढीच आहे, हे उमगले तर तुम्ही या सावधपणाचे रूपांतर चिंतेत होऊ देणार नाही. पापाबद्दल सावध असणे म्हणजे सदसद्विवेकबुद्धीला जागून वागणे, आणि तसे वागणे ही देवाची कृपा आहे. पण देवाच्या दयेच्या प्रकाशात तुम्ही स्वतःच्या पापाकडे प्रामाणिकपणे आणि बारकाईने पाहता, तेव्हा आपले पाप इतके मोठे आहे की देवही ते दूर करू शकणार नाही, अशी चिंता तुम्हाला कधीच वाटणार नाही. तुमचे पाप एका क्षणात कायमचे पुसून टाकावे, हीच त्याची सर्वांत मोठी इच्छा आहे (पाहा दैनंदिनी #1665).

आपल्या पापांना पूर्ण प्रामाणिकपणे सामोरे जाणे तुम्हाला सहज जमते का, यावर चिंतन करा.  तसे नसेल, तर त्याची अमर्याद दया तुम्हाला अजून समजलेली नाही, याचे ते लक्षण आहे.  त्याची दया समजून घेणे हाच प्रत्येक पापावरचा सर्वोत्तम उपाय आहे, हे लक्षात ठेवा.

हे प्रभू, माझे पाप मला दिसते, पण ते मला आणखी स्पष्टपणे दिसावे, अशी माझी इच्छा आहे. तुझी परिपूर्ण दया जाणण्याची कृपा मला दे, म्हणजे चिंता किंवा भीती न बाळगता मी माझ्या पापाला सामोरे जाऊ शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 345: देवामध्ये पूर्णपणे बुडून जाणे

तुम्ही कधी देवाच्या सान्निध्यात पूर्णपणे तल्लीन होता का? बहुतेकांना असा अनुभव क्वचितच येतो, तर काहींना तो कधीच येत नाही. देवात तल्लीन होणे, म्हणजेच त्याच्यात बुडून जाणे, याचा अर्थ प्रार्थनेत इतके खोलवर मग्न होणे की त्याच्या सान्निध्यात जणू तुम्ही स्वतःलाच विसरून जाता. असे घडते तेव्हा त्या क्षणी प्रभू तुम्हाला पूर्णपणे आपलेसे करतो आणि तुमचा आत्मा त्याच्या अधीन होतो. ही अवस्था कदाचित टिकणार नाही आणि तुम्ही लवकरच पुन्हा पापांकडे वळाल. तरीही, निखळ चिंतनाचे हे क्षण या जीवनात इतर कशाहीपेक्षा अधिक मोलाचे आहेत. अशा रीतीने देव तुम्हाला आपल्या वैभवाची थोडीशी गोडी चाखू देतो, जेणेकरून त्याच्याविषयीची तुमची ओढ आणखी वाढावी (पाहा दैनंदिनी #1669).

याचा विचार करा: देवाच्या सान्निध्याकडे तुम्ही स्वतःला कधी इतके ओढले जाऊ दिले आहे का की तुम्हाला वेळेचे आणि स्थळाचे भानच उरले नाही? जणू तुम्हाला ख्रिस्ताच्या हृदयात नेले गेले आणि त्याच्या कुशीत तुम्ही विसावलात. प्रार्थनेची ही खोली तुम्ही अजून अनुभवली नसेल, तर लक्षात ठेवा, हा अनुभव तुमची वाट पाहत आहे. प्रभूचे प्रेम इतके गहिरे आणि परिपूर्ण आहे की त्याची किंचितशी गोडी जरी तुम्ही चाखली, तरी पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही शक्य तितक्या वेळा त्याच्याकडे परताल.

हे प्रभू, मला तुझ्या सान्निध्यात ओढून घे. तुला आणि तुझ्या परिपूर्ण प्रेमाला जाणून घेण्यास मला मदत कर. परिपूर्ण आराधनेत आणि स्तुतीत मला तुझा अनुभव घेऊ दे. तुझ्या वैभवाची एक झलक तरी मला लाभो आणि तिचा आनंद मला सदैव चाखता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 346: इतरांना लाभलेली वरदाने

इतरांच्या जीवनातील देवाची वरदाने ओळखणे आणि ती त्यांना लाभली आहेत याचा आनंद मानणे, हीसुद्धा त्यांच्याप्रती दया दाखवण्याची एक कृती आहे. खेदाची गोष्ट अशी की, इतरांचे नैसर्गिक गुण किंवा त्यांच्या जीवनातील देवाची कृपा पाहून अनेकदा त्यांचा मत्सर किंवा हेवा करण्याचा मोह होतो. पण तुम्ही त्यांच्याकडे नम्रतेने पाहिलेत, तर त्यांच्यात देव कसा कार्य करतो हे पाहण्याची ओढ तुमच्या मनात निर्माण होईल. त्यांचे नैसर्गिक गुण ही त्यांचे आत्मे निर्माण करताना देवाने दिलेली वरदाने आहेत, आणि त्यांची अलौकिक वरदानेही देवानेच आपल्या कृपेने दिली आहेत, हे तुम्हाला दिसेल. देवाच्या सर्व लेकरांमध्ये जिवंत असलेल्या त्याच्या चांगुलपणाचा आनंद मानण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्या जीवनात आणि तुमच्याही जीवनात या वरदानांची भर पडेल (पाहा दैनंदिनी #1671).

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीत नैसर्गिक प्रतिभा किंवा अलौकिक कृपा दिसते, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते?  तुम्हाला मत्सर किंवा हेवा वाटतो का?  की देवाचे कार्य पाहण्याचे वरदान तुम्हाला लाभले, याचा तुम्हाला आनंद होतो?  आज या प्रश्नावर प्रामाणिकपणे चिंतन करा आणि देवाचे कार्य पाहून आनंद मानण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रभू तुमच्या आणि इतरांच्या जीवनात आणखी आशीर्वाद देईल.

हे प्रभू, तू तुझ्या सर्व लेकरांमध्ये ज्या रीतीने कार्य करतोस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझे कार्य आणि तुझी अगणित वरदाने पाहताना मला आनंदी अंतःकरणाची कृपा दे, म्हणजे तू सर्वांना देत असलेल्या चांगल्या गोष्टींचा मला आनंद मानता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 347: पवित्र ख्रिस्तप्रसाद

या जगात पवित्र ख्रिस्तप्रसादाहून मोठे वरदान नाही. तरीही कित्येकदा आपण विचलित आणि बेसावध मनाने या संस्काराकडे येतो. ही विचलितता दूर करण्यासाठी, पवित्र ख्रिस्तप्रसादाच्या वास्तवाविषयीची गहन सत्ये तुम्ही प्रथम पूर्ण मनाने पटवून घेतली पाहिजेत. देव तेथे पडद्याआड असला तरी पूर्णपणे उपस्थित आहे आणि तुमच्याशी अत्यंत गाढ रीतीने एकरूप होण्यासाठी येतो, या सत्यापुढे तुम्ही दृढ श्रद्धेने नमले पाहिजे. मग या श्रद्धेतून तुम्ही जाणीवपूर्वक असा निर्णय घेतला पाहिजे की त्याला केवळ आपल्या शरीरात नव्हे, तर आपल्या संपूर्ण अस्तित्वात स्वीकारायचे. श्रद्धा ठेवा आणि मग त्याला स्वीकारण्याचा निर्णय घ्या. तुम्ही पवित्र ख्रिस्तप्रसाद योग्य रीतीने ग्रहण कराल, तेव्हा दयेचा प्रभू तुमचे जीवन बदलून टाकेल (पाहा दैनंदिनी #1676).

गेल्या काही वेळा पवित्र ख्रिस्तप्रसादात आपल्या प्रभूला ग्रहण करण्यासाठी तुम्ही पुढे गेलात, त्या प्रसंगांचे चिंतन करा.  त्या वेळी तुमच्या मनात कोणते विचार येत होते?  त्या क्षणी तुमचे हृदय कशात गुंतले होते?  या परममौल्यवान देणगीद्वारे देव तुमच्याकडे येतो, तेव्हा त्याच्यावरचा तुमचा पूर्ण भरोसा नव्याने दृढ करा. हा विशेष बहुमान पुन्हा लाभेल तेव्हा त्याला अधिक योग्य रीतीने ग्रहण करण्याचा संकल्प करा.

हे प्रभू, पवित्र ख्रिस्तप्रसादात तू माझ्याकडे येतोस, तेव्हा तुझ्यावरील माझे प्रेम नव्याने जागव. या अमूल्य वरदानातून माझ्याकडे येणाऱ्या तुला मला ओळखता येवो आणि मी माझ्या संपूर्ण इच्छाशक्तीने तुलाच निवडावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 348: देव जे प्रकट करतो ते पूर्णत्वास नेतो

दोन गोष्टींचा एकत्र विचार केला, तर आश्चर्य वाटते. पहिली गोष्ट अशी की, दरवर्षी पुनरुत्थानकाळातील दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा करावा, अशी अधिकृत घोषणा व्हावी आणि तो सण पाळला जावा, ही आपली इच्छा येशूने संत फॉस्टिनाला वारंवार सांगितली. मठाच्या एकांतात राहणाऱ्या या साध्या धर्मभगिनीला अखिल कॅथलिक धर्मसभेसाठी एवढे मोठे कार्य कसे साधणार होते? दुसरी गोष्ट अशी की, 2000 साली दैवी दयेच्या रविवारी संत योहान पॉल द्वितीय यांनी फॉस्टिनाला संतपद दिले आणि त्याच वेळी आपल्या पवित्र पित्याने दैवी दयेच्या रविवारचा सण संपूर्ण धर्मसभेत साजरा केला जावा, अशी अधिकृत घोषणा केली. 1931 ते 1938 या काळात, मौनात आणि एकांतात, देवाने ही गोष्ट संत फॉस्टिनाच्या हृदयाला पुन्हा पुन्हा सांगितली. साठहून थोडी अधिक वर्षे लोटल्यावर ती प्रत्यक्षात आली (पाहा दैनंदिनी #1680).

स्वतःच्या बळावर आपण जे काही करू शकू अशी कल्पना तुम्ही करता, त्याहून कितीतरी अधिक करण्यासाठी देव तुम्हाला अनेकदा बोलावतो, यावर चिंतन करा. त्याच्या स्पष्ट, सौम्य वाणीकडे तुम्ही लक्ष दिलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात, तर प्रभू तुमच्या जीवनातून किती अद्भुत गोष्टी घडवून आणेल, हे तुम्हाला हळूहळू उमगू लागेल. त्या गोष्टींना कदाचित मोठी प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्या सर्वांच्या नजरेतही येणार नाहीत. पण जे तुम्हाला कधी शक्य वाटले होते, त्याहून त्या कितीतरी मोठ्या असतील. तुमच्या जीवनासाठी देवाची जी इच्छा आहे तिचे आश्चर्य मानू नका, आणि तो जे करण्यास तुम्हाला बोलावतो ते शक्य आहे असा विश्वास ठेवण्यास कचरू नका. “हो” म्हणा आणि बाकीचे त्याच्यावर सोपवा.

हे प्रभू, तू मला जे काही करण्यास बोलावशील, त्याला माझा ‘होकार’ आहे. मी शांतपणे, कोणाच्या नजरेत न येता जीवन जगावे आणि माझी रोजची कर्तव्ये तुला यज्ञार्पण म्हणून अर्पण करावीत, अशी तुझी इच्छा असेल, तर माझा ‘होकार’ आहे. माझे जीवन लोकांसमोर यावे आणि ख्रिस्तसभेच्या भल्यासाठी तू अशा प्रकारे माझा उपयोग करावा, अशी तुझी इच्छा असेल, तरी माझा ‘होकार’ आहे. हे प्रभू, माझे जीवन तुझे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझे काय ते कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 349: अंतःकरणाची शांती गमावणे

तुमच्या अंतःकरणातील शांती आणि स्थिरता हिरावून घेण्याची ताकद कशात आहे? कोणी तुमचा अपमान केला, तुमची थट्टा केली, तुम्हाला चुकीने दोषी ठरवले, तुरुंगात टाकले, मारहाण केली किंवा तुमचा जीवही घेतला, तर काय? यांपैकी कशानेही तुमच्या अंतःकरणातील देवाची शांती हिरावून घेतली जाईल का? तुम्ही तसे होऊ दिले तरच. तुम्ही तसे होऊ दिले नाही, तर कोणतीही गोष्ट तुमच्या अंतःकरणाची शांती हिरावून घेऊ शकत नाही, हे जाणून घेणे आणि दृढ श्रद्धेने मानणे आवश्यक आहे. या जगातील सर्व गोष्टींच्या बंधनांतून मुक्त होणे, हे तुमचे ध्येय असले पाहिजे. धनसंपत्ती, मानमरातब, लोकांचा आदर, भीती आणि इतर सर्व गोष्टींपासून तुम्ही अलिप्त असले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे अलिप्त झालात, तर ख्रिस्ताशी पूर्णपणे एकरूप होण्यास तुम्ही मोकळे व्हाल. मग तुमच्यासमोर काहीही आले किंवा तुमच्या बाबतीत काहीही घडले, तरी तुम्ही तसे होऊ दिले नाही, तर आपला प्रभू आणि त्याची इच्छा यांच्याशी असलेले तुमचे हे एकमेव नाते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही (पाहा दैनंदिनी #1685).

भूतकाळात कोणत्या गोष्टींमुळे तुमची मनःशांती हिरावली गेली, यावर चिंतन करा. त्या गोष्टी ओळखल्या की तुमची आसक्ती कशात अयोग्य रीतीने गुंतली आहे, हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, चारचौघांत झालेल्या उपहासामुळे तुमची मनःशांती हरपली असेल, तर तुम्हाला आपल्या प्रतिष्ठेची अतोनात आसक्ती आहे. गरिबीमुळे तुम्ही खचून गेला असाल, तर तुम्हाला पैशाची अतोनात आसक्ती आहे. एखाद्या मित्राने किंवा कुटुंबातील व्यक्तीने तुम्हाला नाकारल्यामुळे तुम्ही संतापला असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीत फारच गुंतलेले होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पूर्ण अनासक्तीचे आध्यात्मिक ध्येय समजून घेणे फार कठीण आणि ते स्वीकारणे त्याहूनही कठीण असले, तरी ते घाईने बाजूला सारू नका. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींत गुंतलेले आहात, यावर चिंतन करा; वरकरणी चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचाही त्यात विचार करा. हे लक्षात घ्या की तुमचे मन केवळ देवाशीच जडलेले असेल, तर इतर सर्व चांगल्या गोष्टी त्यापाठोपाठ येतील.

हे प्रभू, माझ्या जीवनाचे एकमेव धन म्हणून मी तुला आणि तुझ्या इच्छेला निवडतो. बाकी सर्व क्षणभंगुर आहे आणि क्षणार्धात नाहीसे होऊ शकते. पण हे प्रभू, तू शाश्वत आहेस. मी तुला निवडले, तर कोणीही तुला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाही. प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशी आणि तुझ्या इच्छेशी दृढपणे जोडून राहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 350: आराधनेतील सौंदर्य

जग सुंदर आहे आणि त्यातून देवाचे सौंदर्य प्रकट होते. पण पवित्र युखरिस्तासारखी आध्यात्मिक सत्ये त्याहून कितीतरी अधिक सुंदर आहेत. परमपवित्र युखरिस्तात उपस्थित असलेल्या देवाचे सौंदर्य पाहण्यासाठी श्रद्धेची दृष्टी हवी. हे सौंदर्य अधिक स्पष्टपणे पाहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे आराधना. पवित्र प्रभुभोजन स्वीकारताना आपल्या प्रभूशी होणारे ऐक्य हा आपल्या अनुभवाचा सर्वोच्च बिंदू असला पाहिजे. पवित्र होस्टियात उपस्थित असलेल्या प्रभूची आराधना केल्याने त्याचे सौंदर्य तुम्हाला उलगडते आणि त्या भेटीसाठी तुमची तयारी होते. वेदीवरील दर्शनपात्रात आराधनेसाठी ठेवलेल्या पवित्र होस्टियामध्ये उपस्थित असलेल्या प्रभूची आराधना करा आणि त्याच्या सौंदर्याने तुमच्या आत्म्याची दृष्टी मोहित होऊ द्या (पाहा दैनंदिनी #1692).

परमपवित्र युकरिस्ताच्या आराधनेत तुम्ही कधी सहभागी होता का?  तुमच्या चर्चमध्ये नियमितपणे आराधना होत असेल, तर ही तुमच्यासाठी आशीर्वादाची गोष्ट आहे.  तसे नसेल, तर जवळच्या एखाद्या चर्चमध्ये आराधनेची संधी शोधा.  आराधनेने तुमच्या आत्म्याला पोषण मिळते आणि देवाचे सौंदर्य तुम्हाला उलगडते.  युकरिस्ताच्या आराधनेतील तुमच्या अनुभवावर मनन करा आणि या गौरवशाली कृतीत मनःपूर्वक सहभागी होण्याचा पुन्हा संकल्प करा.

हे प्रभू, परमपवित्र युखरिस्तात तू माझ्यासमोर उपस्थित आहेस. अंतःकरणाच्या गाभ्यातून मी तुझी आराधना करीत आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझे गुप्त सौंदर्य आणि वैभव मला जाणून घ्यायचे आहे. हे प्रिय प्रभू, तू गौरवशाली आहेस. तुझा गौरव न्याहाळताना मला तुझ्या परिपूर्ण दयामय हृदयात अधिकाधिक खोलवर घेऊन जा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 351: देवाला जाणणे की त्याचा अनुभव घेणे

देवाला जाणून घेणे हे तुमचे निरंतर ध्येय असले पाहिजे. पवित्र शास्त्राचा अभ्यास, ख्रिस्तसभेची शिकवण आणि संतांची जीवनचरित्रे या सर्वांची या प्रयत्नात मदत होते. पण देवाला जाणणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नाही. ज्ञान श्रद्धेतून येते आणि श्रद्धा ही देवाची देणगी आहे. पण प्रेमाने देवाशी पूर्णपणे एकरूप होणे याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे. देवाला जाणणे आणि प्रेमाने त्याच्याशी एकरूप होणे या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, पण त्या एकच नाहीत. खरे तर कधीकधी प्रभू एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीवर अंधार येऊ देतो आणि तिला स्वतःला समजूही देत नाही. त्याऐवजी तो तिच्या इच्छाशक्तीचे रूपांतर करतो, जेणेकरून तो पवित्र आत्मा श्रद्धेच्या अंधारातही प्रभूची निवड करील आणि देवावर व इतरांवर प्रेम करीत जगेल. हे एक गहन रहस्य आहे (पाहा दैनंदिनी #1697).

देव किंवा त्याचे मार्ग आपल्याला समजत नाहीत, असे तुम्हाला कधी वाटते का? तुमची दृष्टी धूसर झाली आहे आणि बुद्धी मंदावली आहे, असा अनुभव तुम्हाला येतो का? तसे असेल, तर ही कृपा तुम्हाला वाटते त्याहून कितीतरी अधिक मोलाची असू शकते. विशेषतः अशा क्षणी, जणू धुके दाटले असले तरी, देव तुम्हाला प्रेम करायला आणि त्याची इच्छा स्वीकारायला बोलावतो. त्याची इच्छा तुम्हाला पूर्णपणे समजत नसली तरी ती स्वीकारा आणि प्रेमाने जगा. मग प्रभू तुमच्याद्वारे विपुल दया प्रकट करील.

हे प्रभू, जीवनात ज्या वेळी मला गोष्टी स्पष्टपणे समजतात, त्या क्षणांसाठी मी तुझे आभार मानतो. पण माझ्या मनावर अंधार दाटल्यासारखे वाटते आणि मन गोंधळून जाते, तेव्हाही तुझ्या पवित्र इच्छेपुढे मी नतमस्तक होतो. अशा क्षणी तुझ्यावर आणि इतरांवर प्रेम करण्यास मला मदत कर, म्हणजे माझे जीवन तुझ्या निर्मळ दयेचे जिवंत साधन होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 352: शासन आणि अपराधभावना

देवाच्या शासनाचा विचार करणे कदाचित सुखद वाटणार नाही. पण देव खरोखरच शासन करतो आणि त्याचे शासन ही त्याच्या विपुल दयेची कृती आहे, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा आत्मे देवापासून दूर जातात आणि त्याची दया नाकारतात, तेव्हा त्याच्या हृदयाला खोलवर जखम होते. त्यामुळे त्यांना परत आणण्याचे अथक प्रयत्न देव, असे म्हणता येईल की, अधिक ‘तळमळीने’ करतो. त्यांची अंतःकरणे उघडण्यासाठी तो वापरतो त्या मार्गांपैकी एक म्हणजे शासन. उदाहरणार्थ, परुश्यांचा विचार करा. ते गर्वाने आणि अहंकाराने भरलेले होते, म्हणून प्रभूने त्यांना कठोर शब्दांत फटकारले. पण त्यांना परत मिळवण्यासाठी, मोठ्या दयेने त्याने असे केले. काहींच्या बाबतीत त्याचा परिणाम झाला, तर इतरांच्या बाबतीत झाला नाही (पाहा दैनंदिनी #1703).

देव आपले ताडन करतो, याची तुम्हाला जाणीव आहे का? उदाहरणार्थ, आपल्या पापांमुळे तीव्र अपराधभावनेची वेदना तुम्ही कधी अनुभवली आहे का? असेल, तर त्या अनुभवाकडे लक्ष द्या. हे लक्षात ठेवा: तुम्ही भरकटला असाल, विशेषतः गर्वामुळे, तर प्रभू तुमचा न्याय करील आणि तुम्हाला दंड देईल. तुम्ही त्याच मार्गावर हट्टाने चालत राहिलात, तर तो अधिक कठोरपणे दंड देईल. आत्मा हट्टीपणाने आपल्या मार्गाला चिकटून राहतो, तेव्हा देवाची दया त्याच्यात प्रवेश करू शकत नाही. पण या ताडनातून पाप केल्याची पवित्र खंत निर्माण झाली, तर तुमची सदसद्विवेकबुद्धी जागी आहे आणि तुम्ही बदलू शकता, याचे ते लक्षण आहे. अपराधभावना मनात धरून बसू नका, पण तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. देवाच्या दयेकडे धाव घ्या, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या पापातून मुक्त करील आणि तुमच्या हृदयात पुन्हा त्याची शांती नांदेल.

हे प्रभू, प्रत्येक गोष्टीत तुझ्याकडे वळण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. तुझ्या दयेतून येणाऱ्या कठोर शासनाची गरज मला कधीही पडू नये. पण या कृपेची मला गरज पडलीच, तर पापांपासून दूर होऊन तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 353: गौरवगीत

संगीतातून देवाच्या सृष्टीचे नैसर्गिक नियम उलगडतात आणि व्यक्त होतात. सृष्टीच्या रचनेतच असलेली सुव्यवस्था आणि लय हा संगीताचा आधार आहे. काही संगीतकृती या नैसर्गिक सुव्यवस्थेचा उपयोग सांसारिक गोष्टींचा गौरव करण्यासाठी करतात. संगीताचे काही प्रकार तर पाप आणि अव्यवस्थाही व्यक्त करतात. पण देवाच्या जीवनातील उदात्त सुव्यवस्था, सुसंवाद आणि सममिती सुंदर रीतीने व स्पष्टपणे व्यक्त करणारे संगीत सर्वश्रेष्ठ आहे. आपले आचरण देवाच्या इच्छेशी पूर्णपणे जुळते, तेव्हा आपले जीवन देवाला अर्पण केलेल्या गौरवगीतासारखे होते. तुमच्या आत्म्याचे ‘संगीत’ हे त्या गौरवाचे गीत झाले पाहिजे (पाहा दैनंदिनी #1708).

तुमचे जीवन एखाद्या स्तोत्रासारखे आहे, या कल्पनेवर चिंतन करा. तुमच्या ‘जीवनाचे स्तोत्र’ कसे ऐकू येते? त्यात सुसूत्रता आणि सौंदर्य आहे का? त्यात देवाच्या अंतरंग जीवनाचे प्रतिबिंब पडते का? की तुमच्या जीवनातून अव्यवस्था आणि आंतरिक विस्कळीतपणाच अधिक जाणवतो? स्वतःशी प्रामाणिक राहून तुमच्या जीवनातून उमटणाऱ्या ‘संगीतावर’ चिंतन करा. त्या परम संगीतकाराच्या हाती स्वतःला सोपवा, म्हणजे तुमच्या जीवनातून त्याच्या गौरवाला साजेसे स्तोत्र उमटेल.

हे प्रभू, माझे जीवन तुझ्या आराधनेचे गीत होवो. ते तुझ्या कृपेच्या तेजस्वी सिंहासनापर्यंत पोहोचो आणि त्यातून तुझ्या अंतरंगातील जीवनाची मधुर धून निनादो. हे प्रिय प्रभू, मला आपल्या हाती घे आणि या जगात तुझ्या दयेचे व कृपेचे साधन म्हणून माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 354: पापाच्या जाळ्यातून सोडवणे

एखादी व्यक्ती खोटे बोलू लागते आणि तिला त्याची सवय लागते, तेव्हा ती अखेर खोटेपणाच्या जाळ्यात अडकते. एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, आणि पाहता पाहता या जाळ्यातून कसे सुटावे हेच तिला कळेनासे होते. अशा वेळी तुम्ही तिच्याशी दयेने वागले पाहिजे. स्वतःच चुकीच्या वाटेला लागलेल्या व्यक्तीशी कठोरपणे वागणे फार सोपे असते. तिला दोष देणे आणि तिच्या पापाची बोचरी जाणीव करून देणेही सोपे असते. पण तुम्ही त्या व्यक्तीकडे प्रेमाने पाहावे आणि तिने स्वतः विणलेल्या जाळ्यातून बाहेर पडण्यास तिला मदत करावी, अशी प्रभूची इच्छा आहे. तिच्या चुका स्पष्टपणे आणि थेट सांगाव्यात, पण तिला दोष न देता आणि कठोरपणे न वागता. तुम्ही दयेने सत्य सांगत आहात हे तिला जाणवले, तर तिने जे बिघडवले आहे ते सुधारण्याचे तुमचे आमंत्रण कदाचित ती स्वीकारेल. हे तत्त्व अनेक प्रकारच्या पापांना लागू होते (पाहा दैनंदिनी #1712).

तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीचा विचार करा, जी पापाच्या जाळ्यात अडकली आहे आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही, असे तुम्हाला वाटते. त्या व्यक्तीला दोष न देता तिच्याविषयी तुमच्या हृदयात दया वाढू द्या. तिच्यावर प्रेम करा आणि तिला नम्र बनवणारे सत्य सांगण्याचा प्रयत्न करा. ते सौम्यपणे, पण स्पष्टपणे सांगा, जेणेकरून ती त्या जाळ्यातून मुक्त होऊ शकेल.

हे प्रभू, पाप आपल्याला जखडून ठेवते आणि जीवनात अनेक क्लेश निर्माण करते. मला दयाळू हृदयाची कृपा दे, जेणेकरून पापमय जीवनात अडकलेल्यांना मुक्त होण्यास मी मदत करू शकेन. हे प्रिय प्रभू, तुझ्या दयापूर्ण हृदयातील परिपूर्ण प्रेमाने त्यांच्यावर प्रेम करण्याची कृपा मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 355: निरर्थक बडबड, निष्क्रिय आत्म्याचे लक्षण

काही जण इतरांबद्दल बोलण्यात फार पटाईत असतात. जणू त्यांना सर्व काही समजले आहे अशा थाटात ते बेधडक बोलतात, सतत आपली मते मांडतात आणि इतरांबद्दल निकाल देतात. अशा लोकांसारखे होऊ नका. इतरांच्या हालचालींवरच ज्यांचे लक्ष असते आणि ज्यांच्या बोलण्यात सतत त्यांचाच विषय असतो, त्यांना स्वतःच्या आत्म्यात डोकावून आपण खरोखर कोण आहोत हे जाणून घेण्यास फारसा वेळ उरत नाही (पाहा दैनंदिनी #1717).

निरर्थक बोलणे टाळणे तुम्हाला कठीण जाते का? म्हणजेच, स्वतःच्या आत्म्याचे प्रामाणिकपणे परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही वारंवार आणि मोकळेपणाने इतरांबद्दल बोलता, त्यांच्याविषयी मते मांडता आणि त्यांना दोष देता का? तुम्ही असे करत असाल, तर ते कबूल करणे कदाचित कठीण जाईल. पण असे असेल, तर ते इथेच आणि आत्ताच कबूल करा. आपल्या प्रभूला सांगा की तुम्हाला या संघर्षाची जाणीव आहे आणि मदतीसाठी त्याची दया मागा. तुम्ही या संघर्षाबद्दल प्रामाणिक असाल तरच तो तुम्हाला मदत करील.

हे प्रभू, निरर्थक बडबड करण्याच्या आणि इतरांना दोष देण्याच्या माझ्या सवयीपासून मला मुक्त कर. त्याऐवजी मला खऱ्या अर्थाने अंतर्मुख होण्यास आणि स्वतःच्या जीवनाची व पापांची जाणीव ठेवण्यास मदत कर. तुझी दया किती विपुल आहे हेही मला जाणवू दे. त्या दयेवर मी विसंबून राहावे आणि तीच दया इतरांनाही दाखवावी. हे माझ्या प्रभू, मी माझ्या पापांचा पश्चात्ताप करतो आणि तुझ्याकडे वळतो. कृपया माझ्या मदतीला ये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 356: तुमच्या हृदयाचे ठोके

जीवनात एखादी गोष्ट तुम्हाला उत्साहित करते, तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. म्हणूनच, तुमचे हृदय कधी देवासाठी धडधडते का, याचा विचार करणे चांगले आहे. देवाच्या सान्निध्यात पवित्र विस्मयाने भारावून जाण्यास तुम्ही स्वतःला मोकळीक देता का? देवाने तुमच्यावर सोपवलेल्या कार्याबद्दल तुम्हाला उत्साह वाटतो का? आणि तसे असेल, तर त्याच्या प्रेमाच्या आणि दयेच्या महान रहस्यांचे चिंतन करताना तुमच्या हृदयाचे ठोके कधी जलद पडू लागतात का? आपल्या गौरवशाली देवाच्या प्रतापाला आणि वैभवाला तुमच्या संपूर्ण अस्तित्वाने प्रतिसाद दिला पाहिजे (पाहा दैनंदिनी #1728).

आज हे साधे आत्मपरीक्षण करून पाहा. देवाविषयी आणि त्याच्या पवित्र इच्छेविषयी मनात खरा उत्साह शेवटचा कधी दाटून आला, याचा विचार करा. तो उत्साह इतका तीव्र होता का, की तुमच्या हृदयाची धडधडही वाढली? तुमच्या जीवनात देव उपस्थित आहे याची ही खात्रीशीर खूण नसली, तरी तुम्हाला वाटते त्याहून बरेच काही ती उलगडून दाखवू शकते.

हे प्रभू, माझे हृदय दररोज तुझ्यासाठी धडधडावे, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या परिपूर्ण गौरवाचा आनंद आणि उत्साह मला अनुभवू दे. तुझी इच्छा पूर्ण व्हावी, अशी आस माझ्या मनात, आत्म्यात आणि शरीरातही असू दे. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे हृदय उत्कट प्रेमाने तुझ्यासाठी धडधडू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 357: कृपेच्या प्रेरणा

एखादी व्यक्ती अडचणीत असते, तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलणे टाळू शकता. तिच्याशी बोलायला गेलो तर आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल, असे सहज वाटू शकते. पण तुमच्या संभाषणाला प्रभू स्वतः दिशा देत असेल, तर थोड्याच वेळात तो अद्भुत गोष्टी घडवू शकतो. एखाद्याची काळजी घेण्यासाठी अनेक तास द्यावे लागतात, असे प्रसंग प्रेमापोटी स्वीकारावे लागतात, हे खरे. पण अनेकदा मोजके शब्द, लक्षपूर्वक ऐकून घेणे किंवा एखादे सौम्य हसू यांतून गरजू व्यक्तीला तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक मदत मिळू शकते (पाहा दैनंदिनी #1736).

तुमच्या अगदी थोड्याशा प्रयत्नांतून देव किती अद्भुत गोष्टी घडवू शकतो, यावर चिंतन करा. एखादा मायेचा शब्द बोलण्यासाठी, मनावर ओझे असलेल्या व्यक्तीचे ऐकून घेण्यासाठी किंवा प्रेमाने एखादे सेवाकार्य करण्यासाठी त्याच्या हृदयातून येणाऱ्या सौम्य प्रेरणांना मनापासून प्रतिसाद देणे, एवढेच आवश्यक आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेली अशी कृती आश्चर्य वाटावे इतकी सहज आणि आनंददायी असेल, आणि त्यासाठी घेतलेले श्रम सार्थकी लागतील. पवित्र आत्मा दररोज देत असलेल्या प्रेरणांकडे तुम्ही किती लक्ष देता, याचा विचार करा. पुढच्या वेळी अशी प्रेरणा मिळेल तेव्हा तिच्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करा.

हे प्रभू, तुझ्या दयेचे साधन म्हणून काम करण्याची तयारी आणि इच्छा माझ्यात सदैव असू दे, अशी मी प्रार्थना करतो. हे प्रिय प्रभू, तू मला देत असलेल्या प्रेरणांनुसार वागण्यास मला उद्युक्त कर आणि अगदी साध्या मार्गांनी तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 358: देवाची दुहेरी देणगी

देवाच्या दयेविषयी बोलताना आपण अनेकदा पापांच्या क्षमेविषयी बोलतो.  पापांची क्षमा करणे ही देवाच्या दयेची पहिली कृती आहे.  प्रत्येक पाप, अगदी लहानात लहान उणीवही, त्याच्या नजरेतून सुटत नाही. या पापांमुळे आपल्या प्रभूला दुःख सोसावे लागते, तरीही तो आपल्यावर विपुल दया करून आपल्याला क्षमा करतो.  ही क्षमा पूर्ण आणि कायमची असते.  ज्या पापांची क्षमा झाली आहे, ती देव पुन्हा उकरून काढत नाही.  पण देव एवढ्यावरच थांबत नाही.  क्षमेबरोबरच देव आपल्याला अनेक कृपादाने देतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.  त्यांपैकी एक कृपा अशी की, एखाद्या पापाची क्षमा केल्यावर देव त्या पापाचे असे रूपांतर करतो की त्यातूनही तो आपले भले घडवू शकतो.  आश्चर्य म्हणजे, शेवटी देव त्या पापाचाही उपयोग आपल्या गौरवासाठी करू शकतो (पाहा: दैनंदिनी #1745).

दोन गोष्टींवर चिंतन करा. प्रथम, तुमच्या पूर्वीच्या पापांबद्दल देवाने तुम्हाला दिलेल्या क्षमेचा विचार करा. त्यामुळे तुमचे मन नम्र कृतज्ञतेने भरून यावे. दुसरे म्हणजे, देवाने तुमच्या पूर्वीच्या पापांना क्षमा केल्यानंतर त्यांचाही उपयोग स्वतःच्या गौरवासाठी कसा केला आहे, हे पाहा. प्रभूची दया इतकी अपार आहे की आपण थक्क होऊन आदराने नतमस्तक होतो. या दयेमुळे तुमच्या मनात सदैव कृतज्ञता राहू द्या.

हे प्रभू, तू मला देऊ केलेल्या क्षमेबद्दल मी तुझे आभार मानतो; आणि क्षमा केल्यानंतर तू मला देत असलेल्या अपार कृपेबद्दल तर मी तुझा अधिकच ऋणी आहे.  या कृपादानांची जाणीव मला सदैव राहो आणि ती स्वीकारण्यासाठी मी निःसंकोचपणे माझे हृदय उघडे ठेवावे, अशी माझी प्रार्थना आहे.  हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि सर्व गोष्टींसाठी मी सदैव तुझा ऋणी आहे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

चिंतन 359: शाश्वत प्रेम

देवाला काळाचे बंधन नाही.  काळ ही केवळ या जगाशी निगडित गोष्ट आहे.  देवामध्ये सर्व काही आहे, नेहमीच होते आणि सदैव राहील.  या शाश्वत प्रेमाचा एक अर्थ असा की देवाचे तुमच्यावर अनादिकाळापासून प्रेम आहे.  जगाचा पाया घालण्यापूर्वीपासूनच तो तुम्हाला ओळखतो, आणि यापुढेही तो तुम्हाला सदैव ओळखत राहील व तुमच्यावर प्रेम करत राहील.  सर्वस्व व्यापून टाकणाऱ्या या प्रेमातून तुम्हाला मोठा दिलासा मिळायला हवा.  देवाने तुमच्यावर परिपूर्ण प्रेम केले नाही, असा एकही क्षण कधी नव्हता; आणि त्याचे प्रेम कमी पडेल, असा क्षण कधी येणारही नाही.  देवाचे प्रेम शाश्वत आहे. तुमची निर्मिती होण्यापूर्वीपासूनच तो तुम्हाला हे प्रेम देऊ करतो, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ते देऊ करतो आणि अनंतकाळ आणि त्याहीपलीकडे ते देऊ करत राहील (पाहा: दैनंदिनी #1754).

आज अनंतकाळाचे चिंतन करा. अनंतकाळ म्हणजे काय हे समजू शकते, पण त्याची अथांगता पूर्णपणे आकलनात येणे अशक्य आहे. देवाचे प्रेम शाश्वत आहे, या साध्या सत्याचेही चिंतन करा. म्हणूनच देवाच्या प्रेमाबद्दलही हेच खरे आहे. देवाचे प्रेम शाश्वत आहे हे तुम्हाला समजू शकते, पण त्या प्रेमाची खोली तुम्हाला कधीच पूर्णपणे समजणार नाही. हे जाणून मनाला मोठा दिलासा मिळतो.

हे सनातन देवा, तुझ्या परिपूर्ण प्रेमाबद्दल आणि त्या प्रेमाच्या अमर्याद स्वरूपाबद्दल व अथांग खोलीबद्दल मी तुझे आभार मानतो.  हे प्रेम स्वीकारताना मला कधीही शीण येऊ नये; या प्रेमात खोलवर बुडत आणि त्याच्या सौंदर्यात अधिकाधिक सामावून जात माझा अनंतकाळ जावो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 360: आध्यात्मिक संघर्ष

मोहात पाडणारा सैतान खरोखर अस्तित्वात आहे, पण त्याला भिण्याचे कारण नाही.  त्याच्याकडे लक्ष देऊ नका.  तो सुचवतो त्या विचारांच्या नादी लागू नका.  त्याच्याशी सौदेबाजी करू नका.  मोहांना सामोरे जाताना धैर्य धरा, देवाच्या दयेवर भरवसा ठेवा आणि आशा सोडू नका.  इतरांच्या पापांविषयी कुतूहल बाळगू नका, त्यांची चर्चा करू नका, कोणी तुमच्याशी वाईट वागले तर अस्वस्थ होऊ नका आणि तक्रार करू नका.  संभ्रमात असताना इतरांचा सुज्ञ सल्ला घ्या. तो सल्ला प्रभूकडून आलेला असेल आणि त्याने तुमच्या मनात शांती टिकून राहत असेल, तर तो ऐका.  आपल्या धारणांवर ठाम राहा आणि या जगातील संघर्षांची चिंता करू नका.  तुमचे मन आणि हृदय येशूवर केंद्रित ठेवा आणि त्याला तुमचे रक्षण करू द्या (पाहा: दैनंदिनी #1760).

दुष्टाचा जाच तुम्हाला जाणवतो, तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? तुम्ही भावनांच्या आहारी जाऊन राग, निराशा आणि संशय यांना मनात थारा देता का? मनात आध्यात्मिक लढा पेटतो, तेव्हा स्वतःचे रक्षण करण्याचा एकच मार्ग आहे. मोहांवर किंवा दुष्ट गोष्टींवर नव्हे, तर येशूवर तुमची दृष्टी लावा. त्याची शांती शोधा आणि त्याच्या दयेच्या आश्रयात राहा. हे तुम्हाला कितपत जमते, यावर चिंतन करा. हे कठीण जात असेल, तर प्रार्थना करण्याचा, पुन्हा प्रार्थना करण्याचा आणि आणखी प्रार्थना करण्याचा निर्धार करा.

हे प्रभू, त्या दुष्टाने घातलेले मोह तूच, केवळ तूच, परतवून लावू शकतोस.  माझी नजर तुझ्यावर खिळवून ठेवण्याची आणि तुझ्या विपुल दयेवर भरवसा ठेवण्याची कृपा मला दे.  संकटाच्या काळात मला तुझी शांती दे आणि जे काही सोसावे लागेल त्याला सामोरे जाण्याचे धैर्य दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 361: त्याग आणि प्रार्थना

हे समजून घेणे आणि त्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटले, तरी अंतःकरणात केलेला त्याग निर्मळ प्रार्थनेशी जोडला गेला की जगभर सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्याला विलक्षण बळ मिळते.  खरे तर, दररोज अंतःकरणातील त्याग आणि प्रार्थना अर्पण करणाऱ्या पवित्र आत्म्यांचे बळ धर्मप्रसारकांच्या पाठीशी नसते, तर त्यांच्या प्रयत्नांचा फारसा परिणाम झाला नसता.  देवाची कृपाच लोकांची मने हलवते; आणि ही कृपा विशेषतः अशा आत्म्यांद्वारे लाभते, ज्यांचे त्याग मौनात व गुप्तपणे केलेले, प्रेमाने ओतप्रोत भरलेले आणि प्रार्थनेने भारलेले असतात.  (पाहा: दैनंदिनी #1767).

आपल्या वैयक्तिक आणि अंतःकरणातील त्यागांद्वारे देवाच्या राज्याच्या उभारणीसाठी तुम्ही कितीतरी काही अर्पण करू शकता, यावर चिंतन करा. ज्या गोष्टी कठीण आहेत, इतकेच नव्हे तर ज्या करणे मनाला अगदी नकोसे वाटते, त्या स्वेच्छेने स्वीकारून तुम्ही ख्रिस्तसभेच्या कल्याणासाठी प्रभावी मध्यस्थी करू शकता. अशा त्यागात विलक्षण आध्यात्मिक सामर्थ्य असते. देव काही निवडक आत्म्यांना विशेष गहनतेने असा त्याग अर्पण करण्यासाठी निवडतो, पण प्रत्येकाने तसा प्रयत्न केला पाहिजे. अंतःकरणातील एखादा संघर्ष स्वीकारण्याची कोणती संधी आत्ता तुमच्यासमोर आहे, यावर चिंतन करा. तो संघर्ष स्वीकारून देवाला अर्पण केल्याने त्या दुःखाचे रूपांतर अशा कृपेत होते, जी केवळ प्रार्थनेने आणि श्रमाने कधीही प्राप्त झाली नसती.

हे प्रभू, मी अंतःकरणात केलेल्या त्यागांचे सामर्थ्य मला समजून घेण्यास मदत कर.  तुझी निवड करणे आणि माझी दुःखे तुझ्यासाठी स्वीकारणे, हे या जगात कृपेचा एक समर्थ स्रोत ठरते, याची मला जाणीव होऊ दे.  हे प्रिय प्रभू, हे समजताना माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला तर माझी नजर तुझ्यावर लावण्यास आणि तुझी परमपवित्र इच्छा जाणून घेण्यास मला मदत कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 362: दयेने भरलेली दोन हृदये

येशूचे हृदय म्हणजे निर्मळ दयाच.  तो एक असा झरा आहे, ज्यातून जगावर कृपा ओसंडून वाहते.  ही गोष्ट दिलासा देणारी आहे; पण आणखी एका हृदयालाही दयेचा झरा बनले पाहिजे, आणि ते म्हणजे तुमचे हृदय.  प्रभूच्या दयेत तुम्ही इतके बुडून जा की तुमच्या हृदयातून इतरांसाठी कृपेच्या नद्या वाहू लागतील.  विशेषतः अशाच रीतीने देव भरकटलेल्या आणि प्रार्थना न करणाऱ्या आत्म्यांना स्पर्श करतो.  तुम्ही त्यांच्याकडे जाता, मोठ्या समर्पणभावाने त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांच्यावर देवाच्या दयेचा वर्षाव करता, तेव्हा त्यांची हृदये प्रभूच्या हृदयाला भेटतात (पाहा: दैनंदिनी #1777).

इतरांसाठी ख्रिस्ताचे हृदयच बनण्याच्या तुमच्या पाचारणावर चिंतन करा.  त्याचे हृदय तुमच्या हृदयात धडधडले पाहिजे आणि त्याची दया तुमची स्वतःची झाली पाहिजे.  यासाठी पूर्ण समर्पण आणि मोठा वैयक्तिक त्याग आवश्यक आहे.  पण आपल्या प्रभूला त्याच्या दयेने तुमचे हृदय भरून टाकू दिलेत, तर तुमच्या हृदयातून ओसंडणारी दया असंख्य लोकांच्या जीवनाला स्पर्श करील.

हे प्रभू, माझे हृदय तुझ्या हृदयासारखे कर. प्रिय प्रभू, मी ते तुला अर्पण करतो, जेणेकरून तू त्याद्वारे या जगातील अनेकांच्या जीवनाला स्पर्श करशील. तुझ्यासमोर मी इतका नम्र होऊ दे की माझ्यातून दयेचा प्रवाह वाहून तो अनेकांच्या जीवनाला स्पर्श करील. प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या सर्व लेकरांवर उत्कट प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 363: देवाची वाणी ऐकणे

कल्पना करा की तुम्ही गर्दीने भरलेल्या, गोंगाट चालू असलेल्या एका खोलीत आहात आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाकडून कोणीतरी तुमच्याशी कुजबुजत आहे. ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे हे तुमच्या लक्षात येईल, पण तिचे बोलणे ऐकू येणे कठीण जाईल. देवाच्या वाणीचेही असेच आहे. देव बोलतो तेव्हा तो कुजबुजतो. तो सौम्यपणे, हळू आवाजात बोलतो. जे दिवसभर खरोखर अंतर्मुख राहतात, त्यांनाच त्याची वाणी जाणवते आणि तो काय सांगतो ते ऐकू येते. दिवसभर आपले लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी, जगाचा सततचा गोंगाट आणि त्याची प्रेमळ आज्ञा ऐकू येऊ न देणारे सर्व काही आपण दूर करावे, अशी प्रभूची इच्छा आहे. जगाचा गोंगाट शांत करून अंतर्मुख राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रभूची सौम्य वाणी तुम्हाला अगदी स्पष्ट ऐकू येईल (पाहा दैनंदिनी #1779).

देव तुमच्याशी बोलतो ते तुम्हाला ऐकू येते का? नसेल, तर कोणत्या गोष्टी तुमचे लक्ष विचलित करून स्वतःकडे खेचतात? आपल्या अंतःकरणात डोकावून पाहा आणि जाणून घ्या की देवाची सौम्य वाणी रात्रंदिवस तुमच्याशी बोलत असते. परिपूर्ण प्रेमाने भरलेल्या त्याच्या वाणीकडे पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करा आणि तो जे काही करायला सांगतो ते करा. केवळ आजच नव्हे, तर नेहमी त्याच्या वाणीवर मनन करा. लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावा, म्हणजे त्याचा एकही शब्द तुमच्या कानाआड जाणार नाही.

हे प्रभू, माझे तुझ्यावर उत्कट प्रेम आहे आणि तू माझ्याशी जे बोलतोस ते मला सदैव ऐकू यावे, अशी माझी इच्छा आहे. जीवनात माझे लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी दूर करायला मला मदत कर, म्हणजे तुझ्या सौम्य वाणीआड कधीही काही येणार नाही. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 364: मरणासन्न व्यक्तींसाठी प्रार्थना

तुमच्या शाश्वत तारणाच्या दृष्टीने तुमच्या मृत्यूची घटिका फार महत्त्वाची आहे. ‘नमो मरिये’ ही प्रार्थना म्हणताना तुम्ही खास या पवित्र घटिकेसाठी प्रार्थना करता. ही घटिका पवित्र आहे. पण याच घटिकेला तुमचा आत्मा कायमचा हिरावून घेण्यासाठी सैतान पुन्हा एकदा तुमच्यावर झडप घालेल. प्रार्थना, त्याग आणि प्रेमाची कृत्ये यांद्वारे आयुष्यभर या पवित्र घटिकेची तयारी करणे आवश्यक आहे. पण ज्यांची शेवटची घटिका जवळ आली आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणेही तितकेच आवश्यक आहे. काहींसाठी हा खऱ्या आध्यात्मिक संघर्षाचा क्षण असतो. अशा व्यक्तींची आपल्या प्रार्थनेत नियमितपणे आठवण ठेवणे हे ख्रिस्ती प्रेमाचे कर्तव्य समजा. स्वर्गात त्या तुमचे आभार मानतील (पाहा दैनंदिनी #1798).

आज आपल्या मृत्यूचे चिंतन करा आणि विशेषतः त्या घटकेसाठी जपमाळ म्हणण्याचा प्रयत्न करा. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी प्रार्थना करण्याचा संकल्पही करा. मृत्यूच्या वेळी भीतीसारखे अनेक मोह उद्भवतात आणि त्या वेळी देवाच्या कृपेची फार गरज असते. तुमच्या स्वतःच्या आत्म्यासह प्रत्येक आत्म्याने देवाच्या अपार दयेवर भरवसा ठेवून, धैर्याने आणि श्रद्धेने त्या घटकेला सामोरे जावे, अशी प्रार्थना करा.

हे प्रभू, या जीवनातील माझी शेवटची घटिका मी तुला अर्पण करतो आणि आज या क्षणाला सामोरे जाणाऱ्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. ती घटिका सुखद असो आणि त्या वेळी तुझे देवदूत व संत आमच्या सभोवती असोत. विशेषतः त्या क्षणी तुझी प्रिय माता आमच्यासाठी प्रार्थना करते, या जाणिवेने आम्हाला सांत्वन मिळो. मरिया माते, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 

चिंतन 365: दयेची राणी

हे शेवटचे चिंतन दयेच्या राणीला, परम गौरवशाली देवमातेला, समर्पित आहे. इतर कोणाहीपेक्षा ती देवाच्या दयेचे परिपूर्ण साधन होती आणि आजही आहे. देवदूताच्या संदेशाच्या वेळी तिने दिलेल्या संमतीने, तिच्या त्या ‘होकाराने’, तिने साक्षात दयेलाच या जगात जन्म दिला. आपल्या पुत्राला इतक्या क्रूर यातना सहन करताना पाहून तिलाही अपार दुःख झाले. त्याच्या हृदयाला सांत्वन मिळावे आणि तिच्या त्यागाद्वारे जगाला विपुल कृपा लाभावी म्हणून तिने आपले मातृप्रेम अर्पण केले. तिला शरीर व आत्म्यासह स्वर्गात घेण्यात आले आणि तिच्या पुत्राने तिला गौरवाचा मुकुट दिला, जेणेकरून स्वर्गातील आपल्या गौरवशाली सिंहासनावरून ती जगावर दयेचा वर्षाव करत राहील. तिला तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करा, तिच्या मध्यस्थीवर भरवसा ठेवा, स्वतःला तिच्या मायेच्या देखरेखीला समर्पित करा आणि तुमच्यावर तिचे परिपूर्ण प्रेम आहे हे जाणा. ती आपल्या लेकरांना कधीही सोडणार नाही, म्हणून ती तुम्हालाही कधीही सोडणार नाही.

हे परमप्रिय माते, माझ्या राणी, माझे तुझ्यावर अतिशय गाढ प्रेम आहे आणि तुझ्या निष्कलंक हृदयाला स्वतःला समर्पित करण्याची माझी इच्छा आहे. प्रिय माते, तुझे हृदय तुझ्या पुत्राच्या दयेने ओसंडून वाहते. त्याने तुला सर्व कृपा दिली आहे आणि ती कृपा जगाला देण्याचे कार्य तुझ्यावर सोपवले आहे. तुझ्या मातृसुलभ काळजीविषयी आणि मध्यस्थीविषयी माझ्या मनात कधीही शंका येऊ नये. प्रिय माते, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला तुझ्या पुत्राकडे, येशूकडे, नेशील म्हणून मी स्वतःला पूर्णपणे तुला अर्पण करतो. मरिया माते, माझ्या राणी, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका

माझे कॅथलिक जीवन! यांची दैनंदिन चिंतनाची आणखी पुस्तके


ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध

दैवी दया

अ‍ॅमेझॉन – बार्न्स अँड नोबल – गूगल प्ले – आयट्यून्स