माझ्या आत्म्यातील दैवी दया: संत मारिया फौस्तिना कोवाल्स्का यांची दैनंदिनी हा ग्रंथ लवकरच आध्यात्मिक साहित्यातील एक अभिजात ग्रंथ ठरेल. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तो एकदा तरी वाचावा, असे आवर्जून सुचवले जाते. पण हे आमंत्रण स्वीकारणे अनेकांना कठीण वाटते. याचे कारण केवळ ग्रंथाचा मोठा आकार नाही, तर संत फौस्तिनांच्या वह्यांतील प्रत्येक नोंदीतून उलगडणाऱ्या दैवी दयेच्या संदेशाची खोलीही आहे. संत फौस्तिनांची दैनंदिनी आणि त्यांच्या चिंतनाच्या सहा वह्या वाचताना तुम्हाला मार्गदर्शन मिळावे, या आशेने दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन हे पुस्तक लिहिले आहे. थोडे थांबून येशूने त्यांना दिलेल्या संदेशांच्या सौंदर्यावर चिंतन करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक स्वतंत्रपणे वाचू शकता. किंवा संत फौस्तिनांची दैनंदिनी वाचताना त्यासोबतही हे पुस्तक वापरू शकता.
दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन या पुस्तकात संत फौस्तिनांच्या दैनंदिनीतील पानांवर आधारित ३६५ दिवसांसाठी शिकवण, चिंतन आणि प्रार्थना दिल्या आहेत. या पुस्तकाचा क्रमाने उपयोग करण्याची पद्धत अगदी सोपी आहे: दररोज एका पानावर चिंतन करावे. पण काहींना क्रम सोडून मधली एखादी चिंतने वाचावीशी वाटतील, तर काहींना एकाच वेळी काही चिंतने वाचावीशी वाटतील. ज्या चिंतनातून देव तुमच्याशी बोलला, त्या चिंतनाकडे पुन्हा वळावेसेही वाटू शकते. म्हणून वर्षाच्या प्रत्येक दिवसासाठी एक चिंतन देण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिले असले, तरी ज्या पद्धतीने ते वापरण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते आणि ज्या पद्धतीने देवाशी तुमचे नाते सर्वाधिक दृढ होते, तीच पद्धत तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
प्रत्येक दिवसाच्या पहिल्या परिच्छेदात संत फौस्तिनांचे शब्द आणि शिकवण यांतून या लेखकाला काय उमगले, ते मांडले आहे. त्या दिवसाच्या शिकवणीसाठी त्यांच्या दैनंदिनीतील कोणता भाग वापरला आहे, हे नमूद केले आहे. त्यामुळे त्या दिवसाच्या चिंतनाची प्रेरणा लेखकाला ज्या मूळ उताऱ्यातून मिळाली, तो वाचकाला त्यांच्या दैनंदिनीत स्वतः वाचता येतो. दैनंदिनीतील मूळ मजकूर कुठेही थेट उद्धृत केलेला नाही आणि या पुस्तकातील चिंतने ही दैनंदिनीची तंतोतंत पुनर्मांडणीही नाहीत. तरीही दैनंदिनीतील हे उतारे प्रत्येक चिंतनात दिलेल्या आध्यात्मिक संदेशाचा पाया आहेत.
प्रत्येक दिवसाच्या दुसऱ्या परिच्छेदात वाचकाला स्वतःला विचारता येईल अशा प्रश्नाच्या रूपात एक छोटेसे चिंतन दिले आहे. त्या दिवसाचा संदेश अधिक खोलवर समजून घेता यावा म्हणून पहिल्या परिच्छेदातील विचार इथे वेगळ्या रूपात मांडला आहे.
शेवटी, प्रत्येक दिवसाच्या चिंतनाची सांगता त्या दिवसाच्या संदेशावर आणि चिंतनावर आधारलेल्या प्रार्थनेने होते. वाचकाने ही प्रार्थना अनेकदा म्हणावी, असे सुचवले आहे. शक्यतो सकाळी उठल्यावर सर्वप्रथम, मग दिवसभरात पुन्हा आणि रात्री आणखी एकदा ही प्रार्थना म्हणावी. रात्री प्रार्थना करताना, त्या दिवसाचा संदेश आपण कितपत मनापासून स्वीकारला, याचे आत्मपरीक्षण करावे.
आपण ज्या जगात राहतो, तिथे तग धरताना ही पाने तुमच्यासाठी देवाकडून वाहणारा दयेचा झरा ठरू द्या. देवाच्या दैवी दयेला तुमच्या हृदयात खोलवर शिरू द्या, म्हणजे त्याच्या प्रेमाची विपुलता तुम्हाला कळेल आणि ते प्रेम इतरांना देण्यासाठी तुम्ही अधिक तयार व्हाल.
हे प्रभू, तुझ्या दैवी दयेकडे माझी वाटचाल सुरू करताना, तुला मला जे काही द्यायचे आहे ते स्वीकारण्यासाठी माझे हृदय उघडे ठेवण्यास मला मदत कर. तू माझ्याशी बोलतोस ते ऐकण्यास, तुला स्वतः भेटण्यास आणि माझ्या जीवनात तुला पूर्णपणे प्रवेश देण्यास मला मदत कर. तुझ्या दैवी दयेचा अनुभव घेताना प्रत्येक गोष्टीत तुझ्यावर विश्वास ठेवायला मला शिकू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध

अॅमेझॉन – बार्न्स अँड नोबल – गूगल प्ले – आयट्यून्स
