आरी शेफर यांनी रंगवलेले ‘संत लुईंचा मृत्यू’ हे चित्र
‘नमो मरिये’ ही प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा प्रत्येक वेळी आपण आपल्या मृत्यूच्या पवित्र घटकेसाठी प्रार्थना करतो. अशा रीतीने ती घटका आपण आपल्या धन्य मातेकडे सोपवतो, जेणेकरून आपल्याला सर्वांत जास्त गरज असेल त्या क्षणी तिने आपल्यासाठी मध्यस्थी करावी. त्या घटकेच्या तयारीसाठी म्हणण्यासारखी आणखी एक पवित्र प्रार्थना म्हणजे दैवी दयेची जपमाळ. पुष्कळदा आपल्याला आपल्या मृत्यूच्या क्षणाची भीती वाटते. ही भीती काही अंशी समजण्यासारखी असली, तरी त्या क्षणाचे महत्त्व आणि पावित्र्य आपल्या प्रभूने आपल्याला उलगडून दाखवावे, यासाठी आपण त्याला वाव दिला पाहिजे. या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या पृथ्वीवरील जीवनाच्या या शेवटच्या घटकेची तयारीच असली पाहिजे. आपण आयुष्यभर देवाची विपुल दया मागितली असेल, तर या जीवनातून पुढच्या जीवनात जाताना त्याची दया आपल्याला मिळेल, अशी खात्री बाळगता येईल. आपण तसे केले नसेल, तरी त्याची दया अमर्याद आहे, असा भरवसा आपण ठेवला पाहिजे. आपल्या देहात प्राण आहे आणि श्वास चालू आहे तोपर्यंत, तो आपल्याला आपल्या या पवित्र देणगीने भरून टाकण्यास तयार आहे (पाहा दैनंदिनी #811).
तुम्हाला तुमच्या मृत्यूच्या घटकेची भीती वाटते का? की आपल्या प्रियजनांच्या मृत्यूच्या घटकेची भीती वाटते? अशी भीती वाटणे स्वाभाविक आणि समजण्यासारखे आहे. तरीही, त्या घटकेकडे देवाच्या अपार दयेची घटका म्हणून पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवनाच्या या अखेरच्या घटकेत असलेल्या आत्म्यावर देवाचे गाढ प्रेम असते. देवाशी पूर्ण ऐक्य आता अगदी जवळ आले आहे; त्या ऐक्याची आस बाळगणाऱ्या आत्म्याकडे देव पवित्र उत्कंठेने पाहतो. तुमच्या मृत्यूच्या त्या पवित्र घटकेचे चिंतन करा. तुमच्या अंतःकरणात आपली दया सतत वाढवत या क्षणासाठी तुमची तयारी आजपासूनच सुरू करण्याची आपल्या प्रभूची इच्छा आहे, हे लक्षात घ्या. ती दया तुमच्यातून वाहू द्या. आपल्या प्रभूला समोरासमोर पाहण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल, त्या क्षणासाठी तुमचे अंतःकरण तयार करू द्या.
हे धन्य माते, आता आणि माझ्या मृत्यूच्या घटकेला माझ्यासाठी प्रार्थना कर. प्रिय येशू, तू मला तुझ्याकडे बोलावशील, त्या क्षणासाठी माझे अंतःकरण सदैव तयार असावे, अशी माझी इच्छा आहे. या जीवनात मी जे काही करीन, ते सर्व या जगातून जाण्याच्या क्षणाची तयारी ठरो आणि त्या घटकेला मला तुझी दया विपुल प्रमाणात लाभो. हे प्रभू, इतरांनाही या पवित्र घटकेसाठी तयार होण्यास मदत करण्याची आणि ती वेळ आल्यावर त्यांच्यासाठी कळकळीने प्रार्थना करण्याची कृपा मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या पवित्र हृदयाची नोवेना
नोवेनेसाठी सुचवलेला कालावधी: 3 ते 11 जून 2026
येशूच्या परमपवित्र हृदयाचा महोत्सव 12 जून 2026 रोजी आहे




