मराठी

चिंतन 80: आपल्या मृत्यूच्या घटकेला

येशू आणि मरिया, needpix.com वरून

व्हिडिओ

तुम्ही ‘नमो मरिये’ ही प्रार्थना म्हटली असेल, तर या जगातील तुमच्या शेवटच्या घटकेसाठीही तुम्ही प्रार्थना केली आहे: “आता आणि आमच्या मृत्यूच्या घटकेला आमच्यासाठी प्रार्थना कर.”  अनेकांना मृत्यूची भीती वाटते, आणि आपल्या मृत्यूच्या घटकेचा विचार करावासा सहसा आपल्याला वाटत नाही.  पण ‘आपल्या मृत्यूची घटका’ हा असा क्षण आहे, ज्याची आपण सर्वांनी अत्यंत आनंदाने आणि आतुरतेने वाट पाहायला हवी.  आपल्या आत्म्यात देवाशी सलोखा असेल, तरच आपण त्या क्षणाची अशी वाट पाहू.  आपण नियमितपणे आपल्या पापांची कबुली दिली असेल आणि आयुष्यभर देवाच्या सान्निध्याचा शोध घेतला असेल, तर दुःख आणि वेदना असल्या तरी आपली शेवटची घटका मोठ्या सांत्वनाची आणि आनंदाची असेल (पाहा दैनंदिनी #321). 

त्या घटकेचा विचार करा.  त्या घटकेची तयारी अनेक महिने आधीच करण्याची कृपा देवाने तुम्हाला दिली, तर तुम्ही कशी तयारी कराल?  या जगातून अखेरचा निरोप घेण्यास तयार होण्यासाठी तुम्ही काय वेगळे कराल?  जे काही तुमच्या मनात येईल, तेच बहुधा तुम्ही आज करायला हवे.  मृत्यूतून नव्या जीवनात प्रवेश करण्यासाठी आपले हृदय तयार करा; त्यासाठी शेवटची घटका जवळ येईपर्यंत थांबू नका.  ती ‘घटका’ परम कृपेची घटका आहे, असे समजा.  त्या घटकेसाठी प्रार्थना करा, तिची आतुरतेने वाट पाहा आणि सजग राहा: एके दिवशी तुमच्या पृथ्वीवरील जीवनाच्या गौरवशाली समाप्तीच्या वेळी देव तुमच्यावर आपल्या दयेचा वर्षाव करू इच्छितो.

हे प्रभू, मृत्यूच्या सर्व भीतीतून मुक्त होण्यास मला मदत कर.  या जगातील जीवन म्हणजे पुढच्या जीवनाची केवळ तयारी आहे, याचे मला सतत स्मरण राहू दे.  त्या क्षणावर माझे लक्ष राहू दे आणि तू माझ्यावर करशील त्या दयेच्या वर्षावाची मी नेहमी आतुरतेने वाट पाहू दे.  हे मरियामाते, माझ्यासाठी प्रार्थना कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अठ्ठाविसावा दिवस – चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण