क्रूसारोपण, जाकोपो टिंटोरेत्तो यांचे चित्र
‘अपमान’ या शब्दातून चारचौघांत झालेली नाचक्की, बदनामी, मानहानी आणि ओशाळवाणेपणा असे अर्थ व्यक्त होऊ शकतात. पण येशूच्या बाबतीत या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. ‘अपमानाचे वस्त्र’ म्हणजे क्रूसामुळे येशूला लोकांसमोर जो अपमान सहन करावा लागला तो. त्याला पापी आणि खोटारडा ठरवून दोषी ठरवण्यात आले. लोकांची दिशाभूल केल्याचा आणि नागरी सत्ताधाऱ्यांचा अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्या काळच्या धर्मनेत्यांनी त्याचा टोकाचा द्वेष केला आणि त्याचा अत्यंत क्रूर छळ केला. हा एक निर्दयी आघात होता. येशूच्या ठायी गर्वाचे पाप असते, तर त्यांचा तिरस्कार आणि दुर्वागणूक त्याला नक्कीच सहन झाली नसती. आपला छळ करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी त्याने असंख्य देवदूतांना बोलावले असते. पण त्याने तसे केले नाही. उलट, त्याने प्रत्येक अपमान आत्मविश्वासाने आणि सचोटीने सहन केला. येशूने इतके दुःख सोसले, तरी त्याच्या मनात द्वेषाची किंवा सूडाची भावना एकदाही उठली नाही. उलट, क्रूसावरूनच त्याने मोठ्याने म्हटले, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही.” येशूच्या या प्रभावी साक्षीचा तुमच्यावर परिणाम झाला पाहिजे आणि इतरांनी तुमच्याविषयी केलेल्या चुकीच्या न्यायनिवाड्यांकडे मुळीच लक्ष न देण्याचे बळ तुम्हाला तिच्यातून मिळाले पाहिजे. अशा चुकीच्या न्यायनिवाड्यांना किंवा त्यांमुळे चारचौघांत होणाऱ्या अपमानाला देव महत्त्व देत नाही. ‘अपमानाचे वस्त्र’ स्वीकारणे म्हणजे अखेरीस देवाच्या दयेसमोर आणि सत्यासमोर जगाकडून झालेला प्रत्येक अपमान विरून जाऊ देणे (पाहा दैनंदिनी 1418).
तुमच्या मनात चाललेल्या या संघर्षावर चिंतन करा. चुकीच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मोठी नम्रता लागते. ती नम्रता अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा आणि सत्याला तुम्हाला मुक्त करू द्या. येशूचे ते ‘वस्त्र’ तुम्हाला पांघरावे लागेल, कारण शेवटी ते त्याच्या कृपेचे आणि दयेचे वस्त्र आहे.
हे प्रभू, मी तुझे अपमानाचे वस्त्र अंगावर घेतो. ते मी आत्मविश्वासाने आणि तुझ्यावर भरवसा ठेवून परिधान करतो. तुझ्या सत्याचीच कास धरायला आणि त्याच्या विरोधात असलेली इतर सर्व मते सोडून द्यायला मला मदत कर. हे प्रिय प्रभू, माझे सुख केवळ तुझ्यातच आहे आणि माझी सारी आशा तुझ्यावरच आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
14 ऑक्टोबर – संत कॅलिस्टस पहिले, पोप आणि रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मृतिदिन
सदस्य व्हा आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रसिद्ध झाल्यावर सूचना मिळवा.
ऑक्टोबर हा महिना पवित्र जपमाळीला समर्पित आहे




