मराठी

चिंतन 137: क्रूसाचे सामर्थ्य

प्रतिमा: peakpx.com वरून

व्हिडिओ

प्रार्थना करताना तुम्ही कधी बसून क्रूसावरील येशूची प्रतिमा न्याहाळता का? बाहेरून पाहणाऱ्याला ही प्रतिमा एक कोडे वाटू शकते. एवढ्या भयावह घटनेचे चिन्ह आपण उंच का उभारतो आणि त्याचा सन्मान का करतो? देवाच्या पुत्राचा इतक्या क्रूरपणे वध झाला, या घटनेकडे सुरुवातीला आपल्याला ओढ वाटेलच असे नाही. तरीही, जे श्रद्धेने क्रूसावरील येशूची प्रतिमा न्याहाळतात, त्यांना तिचे सामर्थ्य जाणवते आणि तिच्याकडे ओढ वाटते. कारण क्रूसावरील घटना हा केवळ एक भयावह आणि क्रूर वध नव्हता; सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तो पाप आणि मृत्यू यांच्यावर मिळवलेला संपूर्ण विजय होता. आपल्या प्रभूचे क्रूसावर खिळले जाणे ही आजवर ज्ञात असलेली प्रेमाची सर्वांत महान कृती होती. कारण त्या कृतीद्वारे, जे स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करून त्याच्याकडे वळतात, त्यांच्यासाठी त्याने मृत्यू आणि पाप यांचा कायमचा नाश केला. स्वतःचे दान करत जगण्यास आपल्याला पाचारण आहे, याचीही क्रूसावरील येशूची प्रतिमा आपल्याला आठवण करून देते. आपल्यापैकी प्रत्येकाला त्या क्रूसावर चढून ख्रिस्ताबरोबर मरण्यास आणि इतरांसाठी स्वतःला अर्पण करण्यास पाचारण आहे. कारण त्याच्याबरोबर मरण्यात आपल्या पापांचे प्रायश्चित्त होते आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या विजयात आपल्याला सहभागी होता येते. क्रूसावर खिळलेल्या आपल्या प्रभूला न्याहाळताना आपले अंतःकरण बदलते, कारण त्याच्या निःस्वार्थ प्रेमाच्या या कृतीने मिळवलेल्या दयेची दारे आपल्यासाठी उघडतात (पाहा दैनंदिनी #681).

क्रूसावरील येशूच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करून पाहा. शांतपणे बसून त्या प्रतिमेकडे एकाग्रतेने पाहा. असे ‘न्याहाळणे’ म्हणजे नुसते ‘पाहणे’ नव्हे. आपण ती प्रतिमा न्याहाळतो तेव्हा डोळ्यांना दिसणाऱ्या प्रतिमेपलीकडे जाऊन, ज्या प्रेमामुळे येशूने तो क्षण स्वीकारला त्या प्रेमाची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तिथे आपल्याला असीम प्रेम करणारा देव दिसतो. आपल्या पापांपासून आपल्याला तारण्यासाठी आणि आपल्यावर परिपूर्ण प्रेम करण्यासाठी तो शेवटपर्यंत जाण्यास तयार होता.

हे प्रभू, तुझ्या परिपूर्ण प्रेमाची ही कृती मला न्याहाळायची आहे आणि माझ्यावर व संपूर्ण जगावर दयेचा वर्षाव करणारे तुझे हृदय मला पाहायचे आहे. तुझ्या बलिदानाची अगाध देणगी समजून घेण्यास आणि त्या देणगीबद्दल सदैव कृतज्ञ राहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
शुक्रवार, 15 मे – शनिवार, 23 मे

प्रभूच्या स्वर्गारोहणाविषयी वाचा

पास्का काळातील प्रार्थना

दैवी दयेवरील आणखी चिंतने

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण