मराठी

चिंतन 305: देवाच्या प्रेमाची अगाध खोली

छायाचित्र: रामा, Cc-by-sa-2.0-fr, विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून

व्हिडिओ

कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्यासाठी स्वतःचा जीव दिला. त्या व्यक्तीसमोर अशी परिस्थिती आली की, आपण स्वेच्छेने स्वतःचा जीव दिला नाही, तर तुमचा जीव जाईल, हे तिला माहीत होते. म्हणून ती व्यक्ती न डगमगता पुढे आली आणि तिने तुमच्या जीवाच्या बदल्यात स्वतःचा जीव दिला. असे करण्यासाठी त्या व्यक्तीचे तुमच्यावर विलक्षण खोल प्रेम असावे लागेल—इतके की तिला स्वतःच्या जीवापेक्षा तुमचा जीव अधिक मोलाचा वाटेल. असे प्रेम क्वचितच आढळत असेल, पण ते खरोखर आहे आणि ते शोधायला फार दूर जावे लागत नाही. हे सत्य लक्षात यायला क्रूसावरील येशूच्या प्रतिमेकडे पाहणे पुरेसे आहे. आपल्या प्रभूला क्रूसावर खिळण्यात आले, ही गोष्ट आपल्या इतकी अंगवळणी पडते की त्याच्या परिपूर्ण प्रेमाचे मूलभूत सत्य सहजच आपल्या नजरेआड होते. त्याने स्वतःच्या जीवनापेक्षा तुमचे जीवन अधिक मोलाचे मानले. तुम्हाला जीवन मिळावे म्हणून भयंकर मृत्यू पत्करण्यास तो कचरला नाही. या सत्याचे भान तुम्हाला रोज असले पाहिजे. ही काही आपल्या जीवनापासून दूर असलेली उदात्त कल्पना नाही; हे तुमच्या जीवनावर निर्णायक परिणाम करणारे वास्तव आहे. येशूचा मृत्यू हेच तुम्हाला स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळू शकण्याचे एकमेव कारण आहे. दयेच्या या कृत्याबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे (पाहा दैनंदिनी #1485).

आज आपल्या प्रभूच्या क्रूसावरील बलिदानावर चिंतन करण्यासाठी थोडा वेळ द्या. खूप पूर्वी घडलेली आणि आपल्या जीवनाला केवळ प्रेरणा देणारी घटना म्हणून त्याकडे पाहू नका. उलट, त्या घटनेचा खरा अर्थ लक्षात घ्या. येशूने क्रूसावर स्वतःचे जीवन विनामूल्य अर्पण केले नसते, तर तुमचा अनंतकाळासाठी नाश झाला असता. गोष्ट इतकी सरळ आहे. त्या प्रेमकृत्यात त्याने तुमच्या जीवनाच्या बदल्यात स्वतःचे जीवन दिले. त्याचे तुमच्यावरचे प्रेम इतके खोल आहे की तुम्हाला त्याचा पूर्ण थांग कधीच लागणार नाही. आज या सत्यावर चिंतन करा आणि तुमच्यावर इतके निःसीम प्रेम केले जाते याचा आनंद माना.

हे प्रभू, तुझ्या परिपूर्ण प्रेमाची खोली मला कधीच पूर्णपणे समजणार नाही. माझ्या परीने मी मनापासून तुझे आभार मानतो आणि क्रूसावरील तुझ्या मृत्यूद्वारे तू केलेल्या संपूर्ण आत्मदानाचा स्वेच्छेने स्वीकार करतो. हे प्रिय प्रभू, माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनात कधीही शंका येऊ देऊ नकोस आणि मलाही तुझ्यावर प्रेम करायला शिकव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

1 नोव्हेंबर – सर्व संतांचा महासण

सदस्य व्हा आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रसिद्ध झाल्यावर सूचना मिळवा.

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण