मराठी

चिंतन 307: दैवी मित्राशी संवाद

प्रार्थनेत मग्न एक एकांतवासी, गेरिट डाऊ यांच्या चित्रशाळेतील कलाकृती

व्हिडिओ

तुम्ही प्रार्थना कशी करता? प्रार्थना करण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. त्यांपैकी काही नेहमीचे मार्ग असे: पवित्र मिस्साबलिदानात किंवा इतर उपासना विधीत सहभागी होणे, जपमाळ किंवा इतर भक्तिमाळा म्हणणे, पवित्र शास्त्राचे चिंतनपूर्वक वाचन करणे, सुंदर रचलेल्या प्रार्थना म्हणणे, आपल्या प्रभूसमोर शांतपणे बसणे, विशेषतः पवित्र युखारिस्तात उपस्थित असलेल्या प्रभूपुढे साष्टांग दंडवत घालणे, इत्यादी. प्रार्थनेचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या प्रभूशी संवाद साधणे आणि मनातले सगळे त्याला सांगणे. तुमच्या सर्व गरजा आणि तुमचे सर्व विचार त्याला माहीत आहेत, हे खरे आहे. तुम्ही स्वतःला जितके ओळखता, त्याहून कितीतरी अधिक तो तुम्हाला ओळखतो. तरीही, काही वेळा त्याच्याशी बोलणे ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे, असे तुम्हाला जाणवेल. तुम्ही आपल्या जीवनाकडे पुन्हा एकदा पाहू शकता आणि आपल्या सगळ्या चिंता, प्रश्न आणि मनातला गोंधळ यांविषयी थेट प्रभूशी बोलू शकता. बोलत असतानाच प्रभूचेही ऐकण्याचा प्रयत्न केलात, तर या प्रकारच्या प्रार्थनेमुळे तुमचे जीवन तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू लागेल. आपल्या सगळ्या चिंता प्रभूपुढे मांडणे ही एक सुंदर कृती आहे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगात तुम्ही देवाला आमंत्रित करता, तेव्हा ही कृती फार उपयोगी ठरते (पाहा दैनंदिनी #1485-1489).

तर मग, तुम्ही प्रार्थना कशी करता? आज तुम्ही ज्या निरनिराळ्या पद्धतींनी प्रार्थना करता, त्यांवर चिंतन करा आणि त्यांत आणखी कोणत्या पद्धतींची भर घालता येईल, याचा विचार करा. विशेषतः, एखाद्या मित्राशी बोलावे तसे निवांत बसून आपल्या प्रभूशी बोलण्याचा विचार करा. मनातले सगळे देवाला सांगितल्याने, प्रत्येक चिंता त्याच्यापुढे मांडल्याने आणि मनातला प्रत्येक प्रश्न त्याला विचारल्याने मनालाही कसा दिलासा मिळतो, याचा विचार करा. अशा संवादाला स्वतःचे मोल आहे. त्याची उत्तरे तुम्हाला पूर्णपणे समजतीलच असे नाही. पण तुम्हाला कशाची गरज आहे हे देवाला माहीत आहे. तुम्ही मनातले सर्व काही घेऊन त्याच्याकडे आलात, तर तो तुमचे ऐकेल आणि तुम्हाला उत्तर देईल, याची खात्री बाळगा.

हे प्रभू, मला प्रार्थना करायला शिकव. तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि माझ्या आत्म्यावरचे प्रत्येक ओझे मी तुला सांगावे अशी तुझी किती इच्छा आहे, हे मला समजू दे. प्रिय प्रभू, सर्व काही तुझ्याकडे आणून तुझ्या चरणी ठेवावे आणि स्वतःला तुझ्या मृदू हातांत सोपवावे, अशी माझी इच्छा आहे. माझे नेहमी ऐकून घेतोस, त्याबद्दल तुझे आभार. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

3 नोव्हेंबर – संत मार्टिन दे पोरेस, व्रतस्थ धर्मबंधू

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण