कल्पना करा, एखाद्या गूढ रीतीने तुम्हाला पवित्र गुरुवारच्या त्या रात्रीत जाता आले, तर ते कसे असेल? येशूने जे काही सोसले, ते सर्व तुम्हाला पाहता आणि अनुभवता आले, तर? बागेत येशूला झालेल्या मरणयातना, त्याची झालेली टवाळी, त्याला मिळालेली निर्दयी वागणूक, त्याची केलेली विटंबना, तुरुंगात त्याने एकट्याने घालवलेली रात्र, त्याच्यावर चालवलेला खटला, त्याला मारलेले चाबकाचे फटके, त्याने वाहिलेला क्रूस आणि त्याला क्रूसावर खिळले जाणे—या सगळ्याची कल्पना करा. हे सारे सहनशक्तीच्या पलीकडचे ठरेल. येशूला आणि त्याच्या सर्व अंतर्बाह्य दुःखांना सामोरे जाण्याने मन भारावून जाईल. पण तुम्हाला हे जमले आणि त्याने सोसलेल्या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही सामोरे गेलात, तर तुमचे जीवन बदलेल. ख्रिस्ताच्या दुःखांकडे दुर्लक्ष करू नये. त्यांच्याकडे पाठ फिरवू नये किंवा ती टाळू नयेत. आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या दुःखभोगांना सामोरे जावे, ते समजून घ्यावेत, प्रेमाने जवळ करावेत आणि आपल्या जीवनात जगावेत. असे केल्याने आपण कायमचे बदलून जाऊ (पाहा दैनंदिनी #1054).
आज थोडा वेळ काढा आणि येशूच्या गूढ आणि गहन दुःखांच्या चिंतनात स्वतःला खोलवर गुंतू द्या. प्रभूने जे सोसले, त्याची थोडीशी अनुभूती त्याला तुम्हाला देऊ द्या. त्याच्या दुःखांना सामोरे जाणे म्हणजे केवळ एका मोठ्या अनिष्टाला सामोरे जाणे नव्हे; तर प्रेमाच्या सर्वांत निर्मळ रूपाला सामोरे जाणे होय. क्रूस आणि त्याच्याशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे म्हणजे जगाने आजवर अनुभवलेल्या सर्वांत धक्कादायक घटनेतून प्रकट झालेल्या प्रेमाच्या सर्वश्रेष्ठ कृतीला सामोरे जाणे होय. देवाच्या दुःखात त्याचे प्रेम आपल्याला उमगते, तेव्हा आपण पवित्र विस्मयाने भरून जातो. आज याचे चिंतन करा, ते हृदयात जपून ठेवा, हे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याद्वारे देवाला तुमचे जीवन बदलू द्या.
हे प्रभू, तुझ्या क्रूसरूपी सिंहासनावर असलेल्या तुझ्याकडे वळण्याची आणि आता व अनंतकाळ तुझ्याकडे नजरा लावून राहण्याची कृपा मला दे. तुझ्यावर आणि तू सोसलेल्या सर्व दुःखांवर माझी दृष्टी स्थिर ठेवताना, प्रेमाचे सर्वांत निर्मळ रूप मला उमगू दे. हे माझ्या दुःखभोगी प्रभू येशू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे.
20 जुलै – संत अपोलिनारिस, बिशप आणि रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मृतिदिन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





