आत्मत्याग म्हणजे स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याचा सराव, जेणेकरून या जगातील क्षणभंगुर गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होत जाईल. देव आणि त्याची पवित्र इच्छा यांव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींच्या आसक्तीतून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आवडते किंवा हवेसे वाटते ते सर्वच वाईट असते असे नाही. पण आपल्याला खरे पावित्र्य हवे असेल, तर देवाची ओढ आपल्या इतर प्रत्येक इच्छेला नवे रूप आणि योग्य दिशा देणारी ठरली पाहिजे. आंतरिक आत्मत्याग म्हणजे स्वतःच्या विचारांचा आग्रह सोडणे किंवा स्वतःच्या इच्छेला मुरड घालणे. उदाहरणार्थ, मन नसतानाही एखादा प्रेमळ शब्द बोलणे किंवा गप्प राहणे कठीण असतानाही जिभेला आवर घालणे. बाह्य आत्मत्याग म्हणजे आवडते पदार्थ न खाणे किंवा प्रायश्चित्तकाळात आणि वर्षभरातही काही गोष्टींचा त्याग करणे. देवाशी असलेले नाते तुम्ही गांभीर्याने घेत असाल, तर तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी हे आचरण आवश्यक आहे (पाहा दैनंदिनी #565).
तुम्हाला सर्वांत जास्त आसक्ती कशाची आहे? तुमच्यावर सर्वाधिक ताबा कशाचा आहे आणि तुमच्या इच्छांना सर्वाधिक दिशा कशामुळे मिळते, असे तुम्हाला वाटते? ती एखादी पापाकडे नेणारी प्रवृत्ती असू शकते किंवा एखाद्या साध्या छंदाची विशेष आवड असू शकते. प्रथम तुमच्या पापाकडे नेणाऱ्या प्रवृत्तींकडे लक्ष द्या. त्या पापांवर मात करण्याचे बळ मिळावे म्हणून त्या इच्छांना आवर घालण्याचे मार्ग शोधा. तुमच्या स्वाभाविक आवडी-निवडींकडेही लक्ष द्या. वेळोवेळी, काही प्रमाणात, स्वेच्छेने त्यांचा त्याग करणे हा पवित्रतेत वाढण्याचा एक चांगला आणि पवित्र मार्ग आहे. असे करण्याचे मार्ग शोधा, म्हणजे देवाची दया अधिक विपुलतेने वाहू लागेल.
हे प्रभु, इतर सर्व इच्छांपेक्षा माझ्या मनात केवळ तुझीच ओढ असावी, अशी माझी इच्छा आहे. मला शुद्ध कर आणि या जीवनातील माझ्या अनेक आसक्तींपासून मला मुक्त कर. तुझी दया स्वीकारण्यासाठी माझे मन आणि माझी इच्छाशक्ती अधिक तयार व्हावी म्हणून रोज तुझ्यासाठी काही त्याग करण्याचे धैर्य मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
29 एप्रिल – सिएनाची संत कॅथरीन, कुमारी आणि ख्रिस्तसभेची धर्मपंडिता—स्मृतिदिन
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने





