छायाचित्र: रेनियर रिदाओ, अनस्प्लॅश
आपल्या जीवनासाठी आणि देवाच्या गौरवासाठी एखादी उत्तम योजना आपण आखली आहे, असे आपल्याला सहज वाटू शकते. आपण विचार करतो, योजना आखतो आणि त्यानुसार सर्व गोष्टी ठरावीक पद्धतीने उभ्या करतो व त्यांची जुळवाजुळव करतो; पण शेवटी आपल्या मनात जे होते, ते देवाच्या मनात नव्हते, असे आपल्याला उमगते. काही जणांची चूक अशी होते की ते देवाचे बोलणे मनापासून ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवनासाठी आणि त्याचा गौरव करण्याच्या त्यांच्या सत्कार्यासाठी त्याने आखलेली परिपूर्ण योजना त्यांना उलगडून दाखवण्याची संधी ते त्याला देत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की एखादी गोष्ट देवाच्या इच्छेनुसार नसेल, तर ती घडणार नाही. देवाच्या इच्छेमुळे आपल्या योजना विफल होतात. आणि हे चांगलेच आहे. इतरांनी देवाच्या इच्छेविरुद्ध असलेली एखादी कल्पना आपल्यावर लादण्याचा प्रयत्न केला, तरी हेच खरे ठरते. आपण प्रभूवर विश्वास ठेवतो तेव्हा तो अशा गोष्टींपासून नेहमी आपले रक्षण करतो. काही वेळा प्रभू आपल्यावर अनिष्ट गोष्टी ओढवू देतो, हे खरे आहे. पण त्याने दिलेली ही अनुमती आपल्याला पवित्र बनवण्याच्या त्याच्या योजनेचाच भाग आहे, असे आपण समजले पाहिजे. यातून तो ज्या प्रकारे आपली काळजी घेतो, त्यावर अधिक दृढ विश्वास ठेवायला आपण शिकतो (पाहा दैनंदिनी #1180).
स्वतःची योजना आखण्याआधी किंवा एखादी कल्पना विकसित करण्याआधी तुम्ही देवाची इच्छा काय आहे, हे मनापासून जाणून घेण्याचा प्रयत्न करता का, यावर चिंतन करा. यासाठी संयम आणि समर्पण आवश्यक आहे. आपल्या मनातील आवेगांना आणि आवडीनिवडींना बाजूला ठेवून प्रभूला बोलू दिले पाहिजे आणि कार्य करू दिले पाहिजे. तुमच्या जीवनासाठी तुम्ही आखलेल्या पण प्रत्यक्षात न आलेल्या योजनांवरही चिंतन करा. असे घडण्याचे कारण एकतर तुम्ही देवावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, किंवा तुमची योजना देवाच्या इच्छेशी जुळत नव्हती, हे लक्षात घ्या. तुम्ही अनुभवलेले भूतकाळातील कोणतेही ‘अपयश’ प्रभूच्या हाती सोपवा आणि केवळ देवाची इच्छा जाणून घेण्याचा तुमचा निर्धार पुन्हा दृढ करा.
हे प्रभू, तुझ्या परिपूर्ण ज्ञानाने तू माझ्या जीवनाला दिशा देशील आणि तुझा पूर्णपणे गौरव करण्यास मला मार्गदर्शन करशील, असा मला विश्वास आहे. माझ्या अनावर आवेगांना आणि आवडीनिवडींना नकार देण्यास मला मदत कर, जेणेकरून तू, केवळ तूच, माझ्या जीवनात यावेस आणि त्याची सूत्रे हाती घ्यावीस. हे प्रिय प्रभू, मी माझे सर्वस्व तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
15 ऑगस्ट – धन्य कुमारी मरियेचे सदेह स्वर्गग्रहण




