मराठी

चिंतन 349: अंतःकरणाची शांती गमावणे

एदुआर माने, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून

व्हिडिओ

तुमच्या अंतःकरणातील शांती आणि स्वस्थता हिरावून घेण्याची ताकद कशात आहे? तुमचा अपमान झाला, तुमची खिल्ली उडवली गेली, तुमच्याविषयी चुकीचा निर्णय दिला गेला, तुम्हाला तुरुंगात डांबले, मारहाण केली किंवा अगदी ठार मारले, तर काय? यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या अंतःकरणातील देवाची शांती हिरावून घेऊ शकेल का? तुम्ही तसे होऊ दिले तरच. तुम्ही तसे होऊ दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्या अंतःकरणाची शांती हिरावून घेऊ शकत नाही, हे जाणणे आणि दृढ श्रद्धेने मानणे अत्यावश्यक आहे. या जगातील सर्व गोष्टींच्या बंधनांतून मुक्त होणे, हे तुमचे ध्येय असले पाहिजे. धनसंपत्ती, मानसन्मान, आदर, भीती आणि इतर सर्व गोष्टींच्या बंधनांतून तुम्ही मुक्त झाले पाहिजे. तुम्ही पूर्णपणे अनासक्त असाल, तर तुम्ही ख्रिस्ताशी पूर्णपणे जोडले जाण्यास मोकळे असता. मग तुमच्यासमोर काहीही आले, तुमच्या बाबतीत काहीही घडले, तरी तुम्ही तसे होऊ दिल्याशिवाय आपल्या प्रभूशी आणि त्याच्या इच्छेशी असलेले तुमचे हे एकमेव नाते तुमच्यापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही (पाहा दैनंदिनी #1685).

भूतकाळात कोणत्या गोष्टींमुळे तुमची मनःशांती हिरावली गेली, यावर चिंतन करा. त्या गोष्टी ओळखल्या की तुमची आसक्ती कशात अयोग्य रीतीने गुंतली आहे, हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, चारचौघांत झालेल्या उपहासामुळे तुमची मनःशांती हरपली असेल, तर तुम्हाला आपल्या प्रतिष्ठेची अतोनात आसक्ती आहे. गरिबीमुळे तुम्ही खचून गेला असाल, तर तुम्हाला पैशाची अतोनात आसक्ती आहे. एखाद्या मित्राने किंवा कुटुंबातील व्यक्तीने तुम्हाला नाकारल्यामुळे तुम्ही संतापला असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीत फारच गुंतलेले होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पूर्ण अनासक्तीचे आध्यात्मिक ध्येय समजून घेणे फार कठीण आणि ते स्वीकारणे त्याहूनही कठीण असले, तरी ते घाईने बाजूला सारू नका. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींत गुंतलेले आहात, यावर चिंतन करा; वरकरणी चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचाही त्यात विचार करा. हे लक्षात घ्या की तुमचे मन केवळ देवाशीच जडलेले असेल, तर इतर सर्व चांगल्या गोष्टी त्यापाठोपाठ येतील.

हे प्रभू, माझ्या जीवनाचे एकमेव धन म्हणून मी तुला आणि तुझ्या इच्छेला निवडतो. बाकी सर्व क्षणभंगुर आहे आणि क्षणार्धात नाहीसे होऊ शकते. पण हे प्रभू, तू शाश्वत आहेस. मी तुला निवडले, तर कोणीही तुला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ शकत नाही. प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशी आणि तुझ्या इच्छेशी दृढपणे जोडून राहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

संत आंद्रेय यांची नाताळची नोव्हेना
परंपरेनुसार ही प्रार्थना 30 नोव्हेंबरपासून नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंत दररोज 15 वेळा म्हटली जाते.

आगमनकाळासाठी साहित्य

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण