ग्वीदो रेनी यांचे चित्र «पश्चात्तापदग्ध माग्दालेना»
कल्पना करा, देव तुमच्या आत्म्याकडे जसा पाहतो, तसा तुम्हालाही तो पाहता आला तर? तुम्हाला काय दिसेल? देव तुमच्या आत्म्याकडे कसा पाहत असेल? तुम्ही त्याचे अनमोल लेकरू आहात, हे तो नक्कीच पाहतो आणि तो तुमच्याकडे अपार प्रेमाने पाहतो. पण त्याला तुमचे पापही दिसते, अगदी क्षुल्लक पापसुद्धा. त्याच्या ज्वलंत प्रेमाने ही पापे आणि अगदी लहानात लहान दोषही तुमच्या अंतरातून नाहीसे झाले पाहिजेत. देवाची दया आपले शुद्धीकरण करते तेव्हा ती आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय “वेदनादायक” ठरते. पण हे शुद्धीकरण आवश्यक आहे आणि ते आपल्याला मुक्त करते. शुद्धीकरण एकतर आताच झाले पाहिजे किंवा शुद्धिस्थानात झाले पाहिजे. देवाच्या दयाळू प्रेमाने होणारे शुद्धीकरण आताच स्वीकारा; त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही (पाहा दैनंदिनी #36).
आज यावर चिंतन करा: तुमच्या आत्म्यातील प्रत्येक पाप आणि अगदी लहानात लहान दोषही दूर करून तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देवाचे प्रेम तुमच्यापर्यंत येते. ही देवाच्या विपुल दयेची कृती आहे, हे ओळखा. या शुद्धीकरणाची गोड वेदना अनुभवण्यास तयार राहा आणि ती टाळण्यासाठी पळ काढू नका. तुमच्या शुद्धीकरणाने आपल्या प्रभूचे हृदय अपार आनंदाने भरून जाते!
हे प्रभू, माझा आत्मा तुला जसा दिसतो तसा मलाही पाहता येऊ दे. तुझ्या दयाळू दृष्टीने माझे प्रत्येक पाप धुऊन जावे, यासाठी मला स्वतःला तुझ्या दृष्टीसमोर उघडे करता येऊ दे. हे प्रिय प्रभू, तुझ्या करुणेने माझ्या जीवनातील पाप दूर करून त्याची जागा तुझ्या दयेने भरून टाक. मी तुझ्यापासून कधीही दूर पळू नये म्हणून मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
2 फेब्रुवारी: प्रभूचे मंदिरातील समर्पण—सण




