प्रार्थनेत मग्न असलेले संत पेत्र — चित्रकार: मथियास स्टोम
आपल्या बोलण्याने आपण इतरांना उभारी देऊ शकतो किंवा त्यांचे खच्चीकरण करू शकतो. आपल्या बोलण्याचा थेट परिणाम आपल्या स्वतःच्या आत्म्यावरही होतो. देवाच्या प्रेरणेने आपण बोलतो तेव्हा आपण पवित्रतेत वाढतो. पण देवाकडून न आलेले शब्द आपण बोलतो तेव्हा आपण स्वतःच्या आत्म्याची आणि इतरांची मोठी हानी करतो. केवळ बाहेरून मौन पाळणे हे आपले मुख्य ध्येय नाही; खरे ध्येय आहे अंतःकरणातील मौन. अंतःकरणातील मौन म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करणे आणि प्रार्थना करणे. म्हणजेच, अंतर्मुख होऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीत निःशब्दपणे आणि अलगद बोलणाऱ्या देवाच्या आवाजाकडे कान देणे. योग्य वेळी आणि योग्य रीतीने इतरांशी दयेचे शब्द बोलण्यास आपण तयार व्हावे, यासाठी अंतःकरणात देवाचे स्मरण राखणे आवश्यक आहे (पाहा दैनंदिनी #118).
आज आपल्या सदसद्विवेकबुद्धीत ऐकू येणाऱ्या देवाच्या आवाजाशी सतत अनुरूप राहण्याचा प्रयत्न करा. देवाची वाणी खरी आहे आणि ती आपल्यात परिवर्तन घडवते. देव आपल्याशी निःशब्दपणे, पण स्पष्टपणे संवाद साधतो. देव सतत बोलत असतो; तुम्ही ऐकत आहात का? आज स्वतःचे विचार आणि कल्पना शांत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून देवाला तुम्हाला जे सांगायचे आहे, तेवढेच तुम्हाला ऐकू येईल.
हे प्रभू, आज मी माझे शब्द तुला अर्पण करतो. तू जे बोलण्याची प्रेरणा देशील, तेच माझ्या मुखातून निघो. मी जे ऐकावे अशी तुझी इच्छा आहे, तेवढेच माझ्या कानी पडो. हे प्रभू, तुझे सखोल आणि अखंड स्मरण राखण्यास मला मदत कर. माझ्या अंतःकरणाच्या मौनात मला तुझ्या दैवी सान्निध्याचा अनुभव लाभो, जेणेकरून मी इतरांना तुझी आणि तुझ्या दयेची ओळख करून देऊ शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
17 फेब्रुवारी: सर्व्हाइट धर्मसंघाचे सात पवित्र संस्थापक
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य





