मराठी

चिंतन 130: इतरांची चूक प्रेमाने दुरुस्त करणे

येशू मंदिरातून सराफांना हाकलून देतो — कार्ल ब्लॉक यांचे चित्र

व्हिडिओ

आपल्यापैकी प्रत्येकाला अधूनमधून दुसऱ्या कुणाच्या पापाला सामोरे जावे लागते, यात फारशी शंका नाही. ते पाप त्यांच्या बोलण्यात, कृतीत किंवा जे करायला हवे ते न करण्यात दिसून येऊ शकते. पापामुळे दुखापत होते आणि ते दुरुस्त करणे गरजेचे असते. जेव्हा कोणी आपल्याविरुद्ध पाप करते, तेव्हा बरेचदा आपल्याला राग येतो. पण आपला राग नेहमीच “पवित्र संताप” असतो असे नाही आणि म्हणूनच तो नेहमी देवाकडून येतो असेही नाही. आपला अहंकार दुखावला की त्या भावनेच्या भरात आपण दुसऱ्याची चूक कठोरपणे दाखवून देऊ शकतो किंवा अगदी सूचकपणे त्याला टोचू शकतो. अशा वेळी ते आपलेच पाप ठरते. पण पापाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कधीकधी इतरांची चूक दुरुस्त करण्यास देव आपल्याला बोलावतो. त्यासाठी आपल्याला कठोरपणेही बोलावे लागू शकते. पण देवाच्या पवित्रतेतून मिळणाऱ्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आपण एखाद्याची चूक दाखवून दिली, तर त्यामुळे त्या व्यक्तीचे मन दुखावणार नाही; उलट ती दयेची कृती ठरेल. त्या व्यक्तीशी कठोरपणे वागण्याची गरज असू शकते आणि तसे करण्याची प्रेरणा देव आपल्याला देऊ शकतो. तरीही, आपली कृती मुळात देवाच्या दयेतूनच घडते आहे, याची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे (पाहा: दैनंदिनी #633).

अलीकडे तुम्हाला ज्या प्रसंगी वादाला सामोरे जावे लागले, त्यांवर चिंतन करा. त्या वेळी काही शब्द किंवा कृती प्रेमापेक्षा मनातील अयोग्य भावनांतून अधिक उमटल्या का? दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले, तर तुमची प्रतिक्रिया काय असते, हे तपासून पाहा. तुम्ही त्या व्यक्तीकडे दयेने पाहता का? त्या क्षणी देवाची दया दाखवण्यासाठी देवाच्या प्रेरणेने तिला खडसावावे लागले, तरी तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न करता का? अशा प्रकारे दया दाखवण्यासाठी देवाला तुमचा उपयोग करू देण्यास घाबरू नका. अशा कानउघाडणीत आणि क्रोधाच्या पापातला फरक ओळखणे कठीण असू शकते. तरीही, ज्यांच्यावर प्रेम करण्यास आपल्याला बोलावले आहे, त्यांच्या भल्यासाठी आपण अशी दया दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

हे प्रभू, मी स्वतःला तुला अर्पण करतो, जेणेकरून तू मला तुझ्या दैवी दयेचे साधन बनवू शकशील. कोणी माझ्याविरुद्ध पाप केले, तर त्या व्यक्तीला लगेच क्षमा करण्यास मला मदत कर. इतरांच्या पापांना सर्वांत योग्य रीतीने कसे सामोरे जावे, हेही मला समजू दे. त्यांच्या भल्यासाठी त्यांची चूक प्रेमाने कशी दुरुस्त करावी, हे मला शिकव. हे प्रिय प्रभू, मला धैर्य आणि सुज्ञपणा दे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

10 मे – या वर्षी हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनेत या स्मृतिदिनाचे पालन केले जात नाही

मोलोकाईचे संत दामियन द व्ह्यूस्टर, धर्मगुरू

आव्हिलाचे संत योहान, धर्मगुरू आणि कॅथलिक चर्चचे धर्मविद्यापंडित

पास्का काळातील प्रार्थना

पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण