छायाचित्र फ्लिकरवरून
“भिऊ नका; फक्त श्रद्धा ठेवा” (मार्क 5:36). “भिऊ नका” हे शब्द पवित्र शास्त्रात असंख्य वेळा येतात. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. भीती आपल्याला खिळवून टाकू शकते आणि अनेक प्रकारचे अविचारी विचार व कृती करण्यास प्रवृत्त करू शकते. भीतीपोटी वागणारी व्यक्ती खरोखरच मूर्खासारखी वागते. हे प्रथम कठोर वाटेल, पण त्याचा अर्थ समजून घेतला तर ते कठोर नाही. याचा एवढाच अर्थ आहे की भीतीपोटी वागणाऱ्या व्यक्तीला विवेकाने वागता येत नाही. भीतीमुळे शांत राहण्याच्या, लक्ष केंद्रित करण्याच्या आणि स्पष्टपणे विचार करण्याच्या क्षमतेला मोठी बाधा येते. म्हणूनच या महत्त्वाच्या आध्यात्मिक मुद्द्याबद्दल पवित्र शास्त्र इतक्या थेटपणे बोलते. भीतीची जागा श्रद्धेने आणि देवावरील भरवशाने घेतली पाहिजे (पाहा दैनंदिनी #626-627).
कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला सर्वांत जास्त अस्वस्थता, चिंता आणि भीती वाटते? या संघर्षाला आपण सगळेच तोंड देतो. हे मान्य करण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. मग ती गोष्ट कोणती? कोणती गोष्ट तुम्हाला सर्वांत जास्त भेडसावते हे ओळखा. म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही त्याच्यावर भरवसा ठेवून त्याच्या हाती सोपवावी, अशी देवाची सर्वांत जास्त इच्छा आहे, हे तुम्हाला समजेल. त्या संघर्षाच्या मुळाशी जा. ती चिंता आणि भीती मनापासून देवाच्या हाती सोपवा आणि त्याच्यावर भरवसा ठेवा. देव सर्वशक्तिमान आहे आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्यास समर्थ आहे, असा भरवसा ठेवा. गोष्टी जशा बदलायला हव्यात असे तुम्हाला वाटते, तशा तो कदाचित बदलणार नाही. पण तो तुमचे ओझे हलके करेल आणि सहजपणे तुम्हाला खिळवून टाकणाऱ्या व गोंधळात पाडणाऱ्या भीतीशिवाय पुढे जाण्याचे बळ देईल. भीतीला तुमच्या जीवनावर राज्य करू देऊ नका. देवावर भरवसा ठेवा आणि त्या भरवशाने तुमचे जीवन बदलू द्या.
हे येशू, मला खरोखर तुझ्यावर भरवसा ठेवायचा आहे आणि माझी सगळी ओझी तुझ्या हाती सोपवायची आहेत. विशेषतः ही गोष्ट घेऊन मी तुझ्याकडे येत आहे (क्षणभर थांबा आणि ज्या गोष्टीमुळे सर्वांत जास्त भीती आणि चिंता वाटते ती सांगा). या ओझ्यात तू माझ्यासोबत राहा आणि तुझ्या कोमल हाताने ते दूर कर. त्याऐवजी मला शांती आणि गाढ मनःशांती दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.\
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




