मराठी

चिंतन 161: तुम्हाला लाभलेले अनन्य प्रेम

संत पेत्राची सुटका — बार्तोलोमे एस्तेबान मुरियो

व्हिडिओ

देवाच्या प्रेमाचे आणि दयेचे चिंतन करताना, त्याचे प्रेम म्हणजे जणू सर्वांना सारख्याच रीतीने आणि समान प्रमाणात वाटलेली देणगी आहे, असे मानण्याचा मोह होऊ शकतो. पण देवाचे तुमच्यावरचे प्रेम हे सर्वांना दिलेल्या अशा एखाद्या देणगीपेक्षा कितीतरी अधिक आहे. ते अगदी वैयक्तिक आणि अनन्य आहे. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तो ही देणगी खास तुम्हालाच देतो. देवाच्या दृष्टीने तुम्ही अनेकांपैकी केवळ एक नाही; उलट, जणू तुम्हीच त्याच्या प्रेमाचे एकमेव केंद्र आहात. देव प्रत्येक व्यक्तीवर असेच अनन्य आणि आगळे प्रेम करतो. अशा रीतीने, जणू तुम्ही त्याचे एकुलते एक अनमोल लेकरू आहात आणि तुमच्यासाठी त्याने आपले जीवन अर्पण केले आहे. हे लक्षात ठेवा: तुम्ही जसे आहात तसेच देव तुमच्यावर प्रेम करतो. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला ठाऊक आहे आणि तो तुमच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करतो (पाहा दैनंदिनी #824).

देव तुमच्यावर किती खास आणि अनन्य प्रेम करतो, याची तुम्हाला कितपत जाणीव आहे? दयेने धगधगणाऱ्या त्याच्या हृदयातील प्रेम खास तुमच्यासाठी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले अनमोल लेकरू मानून, ती जशी आहे तशी, तिच्या पापांसकट, तिच्यावर अशा प्रकारे प्रेम करणे देवाला पूर्णपणे शक्य आहे. देवाचे हे खास आणि विपुल प्रेम आज तुमच्या जीवनात अनुभवा. ते तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत आधार देईल आणि देव तुमच्यावर सर्वांहून अधिक प्रेम करतो, याची जाणीव तुम्हाला सदैव करून देईल.

हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझी आराधना करतो आणि तू माझ्यावर परिपूर्ण प्रेम करतोस म्हणून तुझे आभार मानतो. तुझे अनमोल लेकरू म्हणून तू मला देत असलेली तुझ्या अनन्य प्रेमाची देणगी स्वीकारायला मला मदत कर. तूच माझा एकमेव प्रभू आणि देव आहेस, हे मान्य करून मला तुझ्या प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद देता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

येशूच्या पवित्र हृदयाची नोवेना
नोवेनेसाठी सुचवलेला कालावधी: 3 ते 11 जून 2026
येशूच्या परमपवित्र हृदयाचा महोत्सव 12 जून 2026 रोजी आहे

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण