संत पेत्राचा पश्चात्ताप — चित्रकार: जेरार्ड सेघर्स
आपल्या पापांची जाणीव झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. आपण उदासीन राहू शकतो किंवा देवाच्या न्यायाच्या भीतीने पश्चात्ताप करू शकतो. पण सर्वांत योग्य प्रतिसाद म्हणजे प्रेमाने देवाकडे वळणे आणि त्या प्रेमामुळे आपल्या पापांबद्दल मनापासून दुःख वाटणे. आपल्या मनात देवाविषयी उत्कट प्रेम असेल, तर आपले अगदी लहान पापही आपल्या लक्षात येईल. आणि आपल्या लक्षात येणाऱ्या प्रत्येक पापापासून मुक्त व्हावे, अशी इच्छा आपल्याला होईल. हे उत्कट प्रेम आपल्याला परिपूर्ण पश्चात्तापाकडे नेते. अशा पश्चात्तापात देवावरचे आपले प्रेम आपल्या आत्म्यावरील पापाचा अगदी सूक्ष्म डागही धुऊन टाकते (पाहा दिनदर्शिका #852).
तुम्हाला तुमचे पाप दिसते का? दिसत असेल, तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? पापाला तुम्ही कसा प्रतिसाद देता, यावरून देवावर तुमचे किती प्रेम आहे आणि त्याच्या दैवी दयेवर तुमचा किती भरवसा आहे, हे कळते. तुम्ही उदासीन राहिलात, तर तुमचे प्रेम कमी पडते. अपराधीपणाच्या भावनेने आणि शिक्षेच्या भीतीने प्रतिक्रिया दिलीत, तरीही तुमचे प्रेम कमी पडते. पण तुम्ही देवावर भरवसा ठेवून स्वतःला पूर्णपणे त्याच्या दैवी दयेच्या स्वाधीन केलेत, तर तुमच्या जीवनातील प्रेमच तुमच्यावर आणखी विपुल दया ओतली जाण्याचे कारण ठरेल. आपल्या पापाला आपण कसा प्रतिसाद देतो, याचा प्रामाणिकपणे विचार करा. प्रभूकडे अशी प्रार्थना करा की त्याने तुमच्या हृदयात त्याच्याविषयी इतके विपुल प्रेम भरावे की कोणत्या पापांबद्दल तुम्हाला पश्चात्ताप करायला हवा, हे दिसल्यावर तुम्हाला अपार आनंद व्हावा.
हे प्रभू, माझे तुझ्यावरचे प्रेम इतके परिपूर्ण होऊ दे की तुला न आवडणाऱ्या माझ्या आत्म्यातील प्रत्येक पापाची मला जाणीव व्हावी. माझी पापे, अगदी लहानात लहान पापेसुद्धा, मला दिसतील तेव्हा भरवशाने तुझ्याकडे धाव घेण्याची कृपा मला दे, म्हणजे तुझी दया मला शुद्ध आणि पवित्र करील. माझ्या प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




