मराठी

चिंतन 262: प्रेमाचा नियम की न्यायाचा नियम?

प्रतिमा: पिक्साबेच्या सौजन्याने

व्हिडिओ

देवाच्या हातातून आपण निसटू शकत नाही.  तोच विश्वाचा आधार आहे आणि सर्व गोष्टींचे अस्तित्व टिकवून ठेवतो.  त्याची सततची काळजी नसती, तर आपले अस्तित्वच उरले नसते.  पण आपला सांभाळ करणाऱ्या त्याच्या हाताखाली आपण दोनपैकी एका प्रकारे राहतो.  आपल्याला एकतर ‘प्रेमाचा नियम’ मार्ग दाखवतो किंवा ‘न्यायाचा नियम’.  आपण देवापासून दूर जातो, तेव्हा न्यायाच्या नियमाद्वारे तो आपल्या जीवनाला दिशा देतो.  या जीवनात किंवा मृत्यूच्या वेळीही आपण त्याचा न्याय टाळू शकत नाही.  जेव्हा आपण पाप करतो, विशेषतः गंभीर पाप करतो, तेव्हा देवाच्या न्यायामुळे आपण आपल्या पापाचे गुलाम बनतो.  आपल्या अपार दयेमुळे तो आपल्याला पापाच्या कैदेचा अनुभव घेऊ देतो.  यातही त्याची दयाच दिसते: आपण पश्चात्ताप करून देवाकडे वळावे म्हणून तो आपल्याला त्याच्या न्यायाचे कटू परिणाम भोगू देतो.  पण प्रेमाच्या नियमानुसार जगणाऱ्यांना एका अगदी नव्या प्रकारचे जीवन जगण्याचा आशीर्वाद मिळतो.  हे पवित्र जीव देवाच्या दयेत न्हाऊन निघतात आणि पापाच्या परिणामांतून मुक्त होतात.  ते पवित्र आत्म्याची अनेक फळे अनुभवतात आणि देवाच्या पवित्र इच्छेनुसार वागतात (पाहा दैनंदिनी #1315).

तुम्ही कोणत्या नियमानुसार जगता?  तुम्ही वारंवार देवाची कृपा गमावून आपल्या जीवनात त्याच्या न्यायाचा अनुभव घेता का?  की त्याच्या प्रेमाच्या नियमानुसार जगण्याचा प्रयत्न करता?  आज तुम्ही ज्या स्थितीत असाल, ती देवाच्या दयेची देणगी आहे, हे लक्षात ठेवा.  तुम्ही पापात पडता तेव्हा त्याच्या न्यायाला तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ द्या आणि त्याच्या दयेचा विपुल वर्षाव पूर्णपणे स्वीकारण्याचा प्रयत्न करा.  प्रभू तुम्हाला कधीही सोडणार नाही; पण त्याची दया तुम्ही कशी अनुभवाल, हे तुमच्यावर अवलंबून आहे.

हे माझ्या प्रभू, तुझ्या दयाळू सान्निध्याने माझे जीवन भरून जावे, अशी माझी इच्छा आहे.  मी दररोज पापापासून दूर वळावे आणि तुझ्या प्रेमाच्या नियमानुसार जगण्यातून मिळणारे स्वातंत्र्य व आनंद अनुभवावा, अशी मी प्रार्थना करतो.  हे प्रिय प्रभू, माझ्या जीवनात नेहमी योग्य निवड करण्यास मला मदत कर, जेणेकरून तू माझ्यासाठी राखून ठेवलेल्या विपुल जीवनाकडे मी ओढला जाईन.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

19 सप्टेंबर – संत जानुआरियस, बिशप व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मृतिदिन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण