मराठी

चिंतन 166: ख्रिस्ताशी तुमच्या ऐक्याचे सामर्थ्य

पोप लिओ आणि हूणांचा अटिला याचे निर्माते: निक थॉम्पसन, परवाना CC BY-NC-SA 2.0

व्हिडिओ

कल्पना करा की तुम्ही स्वतः सर्वशक्तिमान आहात किंवा एखाद्या सर्वशक्तिमान व्यक्तीचे जिवलग मित्र आहात. पाचव्या शतकात होऊन गेलेले संत पोप लिओ पहिले यांच्याविषयीची एक कथा देवाचे सामर्थ्य दाखवते. असे सांगतात की हूणांचा अटिला आणि त्याचे हिंसक सैन्य रोम शहर लुटण्याच्या बेतात होते. संत पोप लिओ अटिलाला भेटले आणि त्यांनी त्याला माघारी फिरण्यास “राजी केले”. नंतर त्याच्या सैनिकांनी त्याला माघार का घेतली असे विचारले. तेव्हा अटिलाने सांगितले की पोपांच्या शेजारी याजकाच्या वेशात उभ्या असलेल्या एका व्यक्तीला पाहून तो घाबरला होता. त्या व्यक्तीच्या हातात उपसलेली तलवार होती, आणि अटिला पुढे सरसावला तर ती व्यक्ती त्याला तलवारीच्या घावाने ठार करील, असे तिच्या पवित्र्यावरून वाटत होते. घाबरून अटिला माघारी फिरला आणि निघून गेला.

सर्व दुष्टतेपासून आपले रक्षण करण्याचे देवाचे सामर्थ्य या छोट्याशा कथेतून दिसून येते. एखादा देवदूत तुमच्या शेजारी प्रत्यक्ष रूपात दिसला नाही, तरी तुम्ही देवाच्या दयेत पूर्णपणे बुडालेले असाल, तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, याची खात्री बाळगा. स्वर्गातील सर्व शक्ती तुमच्या पाठीशी असतील. प्रभू सर्व अनिष्टांपासून तुमचे रक्षण करील आणि त्याचे गौरव करणारी सर्व कार्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बळ देईल (पाहा दैनंदिनी #858).

आज दोन गोष्टींवर चिंतन करा: 1) ख्रिस्ताशी तुमचे ऐक्य; 2) त्या ऐक्यातून मिळणारे सामर्थ्य. सर्व अनिष्टांपासून प्रभू तुमचे रक्षण करील, असा तुम्हाला भरवसा आहे का? तुमच्या ठायी श्रद्धा असताना आणि देवाच्या दयेचे कवच तुम्हाला लाभलेले असताना भीतीला काही अर्थ नाही, हे तुम्हाला उमगते का? या सत्यावर चिंतन करा आणि स्वतःला अधिक पूर्णपणे प्रभूच्या स्वाधीन करा. तोच तुमच्या जीवनाचा एकमेव सेनापती झाला पाहिजे.

हे माझ्या प्रभू, माझ्या एकमेव सेनापती, माझे जीवन मी भरवशाने तुझ्या हाती सोपवतो. मी माझे सर्वस्व तुझ्या स्वाधीन करतो, विशेषतः ज्या गोष्टींमुळे मला भीतीला बळी पडण्याचा मोह होतो त्या सर्व गोष्टी. तुझ्या दैवी दयेवर दृढ भरवसा ठेवण्याचे बळ मला दे आणि सर्व बाबतींत, काहीही राखून न ठेवता, तुझ्यावर विसंबून राहण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण