या जगात देवाची इच्छा पूर्ण करावी आणि त्याच्यासाठी अद्भुत कार्ये करावीत, अशी आपली इच्छा असते. तरीही कधीकधी आपण आपल्या पद्धतीने आणि आपल्याला योग्य वाटेल त्या वेळी ती कार्ये करण्याचा प्रयत्न करतो. पण देवाची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण करायची असेल, तर तुम्ही कळकळीने प्रार्थना केली पाहिजे, त्याच्या पवित्र इच्छेला स्वतःला समर्पित केले पाहिजे आणि मग तिची पूर्तताही त्याच्यावर सोपवली पाहिजे. तुम्हाला जे सर्वांत योग्य वाटते ते तुम्हाला योग्य वाटेल त्या वेळी करणे, एवढाच हा प्रश्न नाही. उलट, देव सांगेल त्या पद्धतीने आणि तो सांगेल त्या वेळी त्याची पवित्र इच्छा पूर्ण करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्याहून अधिक काही नाही आणि कमीही नाही. ही त्याच्यावरच्या विश्वासाची कृती आहे. तिचे फळ असे की, देव स्वतः आखलेल्या परिपूर्ण योजनेनुसार आणि त्याने ठरवलेल्या वेळी मोठी कार्ये घडवून आणील (पाहा दैनंदिनी #916).
देवासाठी मोठी कार्ये करावीशी तुम्हाला वाटतात का? तसे असेल, तर त्याला तसे सांगा आणि त्याच्या इच्छेला स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. मग वाट पाहा, पुन्हा वाट पाहा आणि वाट पाहत राहा. त्याच्यावर विश्वास ठेवत राहा आणि स्वतःला त्याच्या इच्छेला समर्पित करत राहा. योग्य वेळ येईल तेव्हा तो तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देईल, असा विश्वास बाळगा. देवाची इच्छा पूर्ण होण्याची वाट तुम्ही किती धीराने पाहता, यावर आज चिंतन करा. तुम्हाला कृती करण्याची प्रेरणा देण्यासाठी देव नेहमी अगदी योग्य क्षणाची वाट पाहतो. तुम्ही धीराने त्याची वाट पाहिलीत, तर स्वर्गातून दया विपुल प्रमाणात वाहताना तुम्हाला दिसेल.
हे प्रभू, मी स्वतःला तुला समर्पित करतो आणि तुझ्या गौरवासाठी एक साधन म्हणून स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. माझी प्रार्थना हीच आहे की, तू सांगशील तेव्हाच आणि तू सांगशील त्याच पद्धतीने माझ्याकडून कृती घडो. तुझे ज्ञान परिपूर्ण आहे आणि तू सर्व गोष्टींची सुंदर व सुसंवादी जुळवाजुळव करतोस, याची मला नेहमी जाणीव राहू दे. तुझ्या इच्छेवर माझा विश्वास आहे आणि आज व सदैव मी माझ्या इच्छेपेक्षा तुझ्या इच्छेला प्राधान्य देतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





