मराठी

चिंतन 175:  जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टींत प्रेम सापडते

विहिरीजवळ येशू आणि शोमरोनी स्त्री — चित्रकार: लॉरेन्स ओपी, परवाना: CC BY-NC-ND 2.0.

व्हिडिओ

आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट विश्वासाने सांगता येईल असा मित्र असणे किती छान आहे!  इतरांना जाणून घ्यावे आणि त्यांनीही आपल्याला जाणून घ्यावे, अशी आपल्याला आस असते.  अगदी किरकोळ अडचणही ज्याला विश्वासाने सांगता येते किंवा अगदी छोटासा आनंदही ज्याच्याजवळ व्यक्त करता येतो, अशी व्यक्ती भेटली की तुम्हाला खरा मित्र सापडला असे समजा.  तुमचा सर्वांत जवळचा मित्र व्हावे, अशी प्रभूची इच्छा आहे.  जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टीही त्याच्याशी वाटून घेत तुम्ही त्याच्याशी असलेले नाते जपले पाहिजे.  त्याला सर्व काही माहीत आहे. तुम्ही स्वतःला जितके ओळखता, त्याहून अधिक तो तुम्हाला ओळखतो.  पण म्हणून त्याच्याजवळ मन मोकळे करायला संकोच करू नका.  मनातली अगदी लहानशी चिंताही त्याला सांगा आणि अगदी छोटासा आनंदही त्याच्यासोबत साजरा करा.  जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी देवाला सांगितल्याने त्याच्या हृदयाला आनंद होतो (पाहा दैनंदिनी #921).

देवाशी बोलताना तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक असता का?  तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का?  तुमच्या जीवनाची प्रत्येक बाजू तुम्ही त्याच्यासमोर उघड करता का आणि त्याच्या उपस्थितीत तिला सामोरे जाता का?  प्रभूला सर्व काही माहीत आहे, पण प्रार्थनेत तुम्ही स्वतः त्याला ते सांगावे, अशी त्याची इच्छा आहे.  आज त्याच्याशी बोला.  अगदी लहानशी चिंता किंवा अगदी छोटासा आनंद घेऊन तुम्ही किती वेळा त्याच्याकडे जाता, यावर मनन करा.  तुमच्या जीवनातला सर्वांत जवळचा मित्र, ज्याच्यापाशी तुम्ही मन मोकळे करू शकता, अशा नात्याने आज त्याच्याशी बोला आणि त्याला आनंद द्या.

हे प्रभू, तुला सर्व काही माहीत आहे आणि तू मला आतून-बाहेरून ओळखतोस.  हे जाणून तुझ्याशी नेहमी पूर्णपणे प्रामाणिक राहण्यास मला मदत कर.  माझ्या प्रार्थनेतून माझ्या मनातले सत्य नेहमी व्यक्त होऊ दे.  माझ्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुला सांगतो, तेव्हा माझ्या जीवनात येण्यासाठी, मला मदत करण्यासाठी व बरे करण्यासाठी आणि तू जे काही उलगडून दाखवतोस त्या सर्वांत आनंद मानण्यासाठी मी तुला माझ्या जीवनात जागा देतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

24 जून – संत योहान बाप्तिस्त यांच्या जन्माचा महोत्सव

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण