अन्स्प्लॅशवरील छायाचित्र: बॉबी जॉन्सन
व्हिडिओ
तुम्ही द्राक्षारसाची पारख करण्यात निष्णात असता, आणि तुमच्यासमोर एक उत्कृष्ट व एक स्वस्त अशा दोन द्राक्षारसांच्या बाटल्या असत्या, तर साहजिकच तुम्ही उत्कृष्ट द्राक्षारस निवडला असता. दोन्हींमधला फरक तुम्हाला कळला असता आणि चांगला द्राक्षारस मिळू शकतो हे माहीत असल्याने स्वस्त द्राक्षारसाचा आस्वाद घेताना तुम्हाला फारसा आनंद झाला नसता. आपल्या आत्म्यांचेही असेच आहे. देवाच्या दयेचा आस्वाद घेतल्यावर आणि त्याच्या सान्निध्याचा गोड आनंद अनुभवल्यावर, आपल्याला तो आणखी अनुभवण्याची ओढ लागेल. जीवनातल्या इतर कोणत्याही ‘आनंदाची’ त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही, हेही आपल्याला उमजू लागेल. त्यांतून देवाच्या गौरवाची अगदी थोडीशीच ‘चव’ कळते. देवाच्या दयेचा उत्तम द्राक्षारस प्या आणि त्याची गोडी लावून घ्या. असे केलेत तर त्यापुढे जीवनातले इतर सारे आनंद फिके पडतात, हे तुम्हाला दिसेल (पाहा, दैनंदिनी क्र. 1026).
प्रभूच्या गोडीचा आस्वाद तुम्ही घेतला आहे का? त्याच्या दयेचा आणि तुमच्या जीवनातील त्याच्या सान्निध्याचा सुगंध तुम्हाला जाणवला आहे का? हे तुम्ही अनुभवले असेल, तर त्या अनुभवाची ओढ म्हणजे काय हे तुम्हाला कळले असेल, आणि दररोज तुम्ही त्याला शोधू लागाल. पण तो अनुभव तुम्हाला आला नसेल, तर तुम्ही कशाला मुकत आहात हे तुम्हाला कळणार नाही. आणि आपण कशाला मुकतो आहोत हेच माहीत नसेल, तर त्याची उणीवही जाणवत नाही. पण हे लक्षात ठेवा: देवाच्या दयेला मुकणे तुम्हाला परवडणार नाही. आज या प्रश्नावर चिंतन करा: मी माझ्या प्रभूच्या गोडीचा आस्वाद घेतला आहे का? देवाला त्याच्या सान्निध्याच्या आनंदाने तुम्हाला अगदी भरून टाकायचे आहे. त्याला तसे करू द्या, म्हणजे जीवनातल्या स्वस्त द्राक्षारसाच्या शोधात तुम्ही पुन्हा कधीही जाणार नाही.
हे प्रभू, तुझ्या दयेने मला खरोखरच धुंद व्हायचे आहे. तुझ्या विपुल कृपेचा सुगंध या दयेने माझ्या अंतरंगात भरून टाकावा, अशी माझी इच्छा आहे. तुझ्यावरच्या प्रेमाची भूक माझ्यात इतकी प्रबळ होऊ दे, की माझ्या जीवनाचा एकमेव आनंद तूच आहेस हे जाणून मी तुझ्याकडे वळावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
14 जुलै – संत कातेरी तेकाक्विथा, कुमारिका — स्मृतिदिन [अमेरिकेच्या धर्मप्रांतांमध्ये]
संत कामिलस दे लेलिस, याजक — ऐच्छिक स्मृतिदिन
(अमेरिकेत हा स्मृतिदिन 18 जुलैला साजरा केला जातो)
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




