कालवारी, पाऊ व्हेर्गोस यांचे चित्र
व्हिडिओ
“मला तहान लागली आहे.” या साध्या उद्गारांत किती गहन अर्थ दडला आहे! आपल्या प्रभूने क्रूसावरून हे उद्गार काढले. एका सैनिकाने त्याची तहान शमवण्यासाठी द्राक्षारसापासून बनलेल्या शिऱ्यात भिजवलेला स्पंज त्याला देऊन थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. द्राक्षारसाचा झालेला शिरका हा पापामुळे आंबट झालेल्या आत्म्याचे प्रतीक आहे. तो आंबट द्राक्षारस घेतल्यावर येशू मोठ्याने म्हणाला, “पूर्ण झाले!” आणि मग त्याने प्राण सोडला. येशूला कशाची तहान आहे? तुम्ही पापी असलात, तरी त्याला तुमचीच तहान आहे. तुमच्या पापांमुळे आणि त्यांनी तुमच्या आत्म्यावर केलेल्या परिणामांमुळे तो तुमच्याकडे पाठ फिरवत नाही; तरीही त्याला तुमची तहान आहे. त्याला तुमच्या प्रेमाची तहान आहे. तुमची पापे असूनही, तुम्ही जसे आहात तसेच त्याच्यावर प्रेम करून त्याची तहान शमवावी, अशी त्याची इच्छा आहे. पापांमुळे तुमच्या आत्म्याला आलेल्या मलिनतेकडे लक्ष देऊ नका. आपल्या प्रभूने द्राक्षारसाचा झालेला शिरका समाधानाने स्वीकारला. जणू तो सांगत होता की तुम्ही आपल्या पतित अवस्थेत त्याच्याकडे आलात, तरी तो तुम्हाला आनंदाने स्वीकारतो (पाहा दैनंदिनी #1032).
क्रूसावर खिळलेल्या येशूच्या प्रतिमेवर चिंतन करा. विदीर्ण अवस्थेत वेदना सोसत क्रूसावर लटकलेल्या येशूचा विचार करा. अशा घोर अपमानाच्या अवस्थेत, आपल्या दुःखात दिलासा मिळावा म्हणून येशू तुम्हाला हाक मारतो. तो तुमचे प्रेम मागतो. तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल का? ‘पूर्ण झाले!’ असे त्याला म्हणता यावे म्हणून तुम्ही स्वतःला त्याला अर्पण करू शकाल का? जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि आपले जीवन त्याला अर्पण करता, तेव्हा ते पूर्ण होते. आज प्रार्थनेत आपल्या प्रभूकडे जा. त्याला सांगा की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि हे जीवन तसेच संपूर्ण अनंतकाळ त्याच्यासोबत घालवण्याची तुमची इच्छा आहे. असे केल्याने तुम्ही त्याची तहान शमवाल.
हे प्रभू, स्वतः दुःख आणि वेदना सोसत असतानाही तुला माझी तहान होती, याबद्दल मी तुझे आभार मानतो. क्रूसावर लटकत असताना तू काहीही राखून न ठेवता आपले जीवन माझ्यासाठी दिलेस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. शेवटी केवळ तुझे प्रेमच माझ्या तहानलेल्या आत्म्याची तहान शमवू शकते. माझ्या विदीर्ण अवस्थेत आणि पापांसकट तुझ्याकडे येण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे, म्हणजे तुझी तहान शमवण्यासाठी माझ्याजवळचे सर्व काही मी तुला अर्पण करू शकेन. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर अधिक प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
16 जुलै – कार्मेल पर्वताची आमची माता—ऐच्छिक स्मरणदिन




