संत पीटर हुतात्म्याचा मृत्यू, चित्रकार बहुधा बेर्नार्दिनो दा आसोला
आपली दुःखे, झालेले अपमान आणि इतरांची चुकीची मते यांत मन अडकून राहणे ही एक सामान्य प्रवृत्ती आहे. बहुतेकांना या मोहाशी झुंज द्यावी लागते. यांपैकी एखादे ओझे किंवा अनेक ओझी आपल्याला वाहावी लागतात, तेव्हा त्यांनाच आपल्या जीवनाचे केंद्र बनवण्याचा मोह होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमचा अन्यायाने अपमान झाला आणि इतरांचे तुमच्याविषयी चुकीचे मत असेल, तर सतत त्याचाच विचार करत राहणे टाळणे फार कठीण जाऊ शकते. त्याचप्रमाणे, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख किंवा वेदना होतात, ती सहजच तुमच्या जीवनाचे केंद्र बनू शकते. या प्रवृत्तींवर मात करण्यासाठी या अडथळ्यांपलीकडे पाहण्याचा आणि केवळ सत्यावर दृष्टी स्थिर ठेवण्याचा निश्चय केला पाहिजे. सत्य म्हणजे काय? देवाच्या मनात जे आहे तेच सत्य. त्याहून कमी नाही, अधिक नाही, आणि त्यापेक्षा वेगळेही काही नाही. जीवनातील संघर्षांपलीकडे पाहून केवळ सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला देवाची गौरवशाली इच्छा उमगेल. जीवनात पुढे जाताना त्याची इच्छा आपल्याला नेहमी आशा, आत्मविश्वास आणि आनंद देते (पाहा दैनंदिनी #1360).
तुमचे बहुतेक लक्ष कशाकडे असते? दिवसेंदिवस तुम्हाला सर्वांत जास्त जाणीव कशाची असते? जीवनातील गोंधळात तुम्ही सहज गुरफटत असाल, तर आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी केवळ देवाच्या इच्छेकडे पाहा. त्याची इच्छा गौरवशाली आहे; ती प्रेरणा, आशा आणि नवी उभारी देते. त्याच्या दैवी इच्छेत ज्याला स्थान नाही, अशा कशाकडेही लक्ष देऊ नका. मग तुम्हाला भेडसावणारा गोंधळ, मनाला झालेल्या जखमा आणि अपमानाचे दुःख देवाच्या दयेत हळूहळू विरून जाईल.
हे प्रभू, तुझ्या जागरूक नजरेला जे सत्य दिसते आणि तुझ्या परिपूर्ण मनाला जे सत्य ज्ञात आहे, त्यावर माझे लक्ष स्थिर राहू दे. मला जाणून घ्यायचे एकमेव सत्य म्हणजे तुझी इच्छा, हे मला उमगू दे; आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वाने ती स्वीकारण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
लिझियेची संत थेरेस – ‘छोटे फूल’ – हिची नोवेना
सातवा दिवस – 28 सप्टेंबर




