मराठी

चिंतन 270: देवाच्या इच्छेतील बारकावे

गरीबांना सोन्याच्या मूर्ती देताना संत ख्रिस्तिना

व्हिडिओ

तुम्ही आपल्या जीवनात देवाची इच्छा स्वीकारायला तयार आहात का? तसे असेल, तर तिच्यातील प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष देण्याची तुमची तयारी हवी. देवाची इच्छा ही काही भव्य पण मोघम कल्पना नाही. ‘मी प्रभूच्या मार्गाने चालेन’ असे सर्वसाधारणपणे म्हणणे म्हणजे त्याची इच्छा निवडणे नव्हे. उलट, त्याची इच्छा निवडणे म्हणजे प्रभू देत असलेल्या प्रत्येक सूक्ष्म संकेताला आणि प्रत्येक प्रेरणेला पुन्हा पुन्हा ‘हो’ म्हणणे. देव छोट्या छोट्या मार्गांनी तुमच्याशी बोलतो, हे लक्षात घेण्याची सवय लावून घेणे, हाच त्याचा अर्थ आहे. दया या बारकाव्यांतही असते, कारण दया आणि देवाची इच्छा या एकच आहेत. देवाच्या दयेसाठी मन खुले करणे म्हणजे, तुमच्या जीवनातील अगदी ‘क्षुल्लक’ वाटणाऱ्या बाबींमध्येही देवाला प्रवेश करायचा आहे, हे उमगणे. खरे तर आपल्या प्रभूसाठी तुमच्या जीवनात काहीही क्षुल्लक नाही. म्हणून, ज्या बाबी तुम्हाला क्षुल्लक वाटतात, त्या त्याला फार प्रिय आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्या काळजीला मर्यादा नाहीत: तुमचे जीवन गुंतागुंतीचे भासवणाऱ्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची तो प्रत्येक क्षणी काळजी घेतो. हे उमगल्यावर त्याच्या पवित्र इच्छेतील सूक्ष्म बारकावे जाणून घेण्याची ओढ तुम्हालाही लागेल. शक्य त्या प्रत्येक प्रकारे त्याची सेवा करावी असे तुम्हाला वाटेल, आणि तसे करताना तुम्ही त्याच्या दयामय इच्छेनुसार जगाल (पाहा दैनंदिनी #1356).

आज आपल्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींवर चिंतन करा. पहिल्या विचारात कोणती गोष्ट देवाच्या इच्छेशी संबंध नसल्यासारखी वाटते? आपल्या जीवनातील प्रत्येक लहानसहान तपशील आपल्या प्रभूसाठी महत्त्वाचा आहे आणि तो नेहमीच प्रभूच्या दृष्टीसमोर असतो, याची जाणीव झाल्यावर तुम्हाला नवी दृष्टी मिळेल. ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचे जीवन घडते, त्यांवर चिंतन करताना त्या देवाच्या इच्छेला सोपवा आणि त्या प्रत्येक गोष्टीत त्याच्या दयेचा प्रवेश होऊ द्या. असे केल्याने तुम्ही खऱ्या आनंदाच्या मार्गाने वाटचाल कराल.

हे प्रभू, आज मी माझ्या जीवनाचा प्रत्येक भाग तुला अर्पण करतो. तुझ्या परिपूर्ण प्रेमाबद्दल आणि तू घेत असलेल्या काळजीबद्दल मी तुझे आभार मानतो. जीवनातील लहानसहान गोष्टींतही तुझ्यावर प्रेम करण्यास आणि सर्व बाबतींत तुझी परिपूर्ण इच्छा स्वीकारण्यास मला मदत कर. तुझ्या दयेला माझ्या जीवनात प्रवेश देण्याचा मला कधीही कंटाळा येऊ नये, जेणेकरून प्रेमाची अगदी छोटी छोटी कृत्येही माझ्या हातून घडतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

‘छोटे फूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिझ्येच्या संत तेरेझ यांची नोव्हेना
22-30 सप्टेंबर

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण