“प्रार्थना करताना प्रेषित पेत्र” — हेंड्रिक ब्लूमार्ट
आपण दररोज मनापासून देवाचा शोध घेत असलो, तर अगदी योग्य वेळी आपल्याला सांत्वनाचा एखादा क्षण लाभतो. कधी अनपेक्षितपणे शांती किंवा आनंद मिळतो, कधी नवी समज आणि धीर मिळतो, तर कधी आपल्या जीवनात देवाची उपस्थिती आहे, एवढेच जाणवते. अनुभव कोणताही असो, तुम्हाला लाभलेले सांत्वनाचे क्षण लक्षात ठेवा. असे क्षण आपल्याला रोज लाभत नाहीत; पण देव आपल्या सोबत आहे, याची आठवण करून देण्यासाठी ते आपल्याला ठरावीक वेळी दिले जातात. विशेषतः अडचणींशी झुंज देताना ते क्षण आठवा (पाहा दैनंदिनी #27).
आज त्या क्षणाचे चिंतन करा, जेव्हा तुम्हाला अगदी अलीकडे देवाची कृपा किंवा त्याच्याकडून सांत्वन अनुभवायला मिळाले. त्या अनुभवातून देव तुम्हाला काय सांगत होता? त्यावर मनन करा, त्या अनुभवासोबत थोडा वेळ शांतपणे घालवा, त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तो लक्षात ठेवा. अशा अनुभवांतून देवाला तुमच्याशी बोलू द्या आणि तो जे सांगतो ते कधीही विसरू नका.
हे प्रभू, तू माझ्यावर परिपूर्ण प्रेम करतोस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा मला तुझी सर्वांत जास्त गरज असते, तेव्हा तू माझ्याकडे येतोस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. त्या क्षणांचा आनंद नेहमी मनात जपायला आणि जीवन कठीण होते तेव्हा ते क्षण आठवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




