व्हिडिओ
प्रभूची शांती एका किल्ल्यासारखी आहे. दुष्टाकडून बाहेरून होणाऱ्या सर्व हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपण या किल्ल्यात आश्रय घेतला पाहिजे. या किल्ल्याबाहेर आपण या सर्व द्वेषपूर्ण हल्ल्यांना उघडे पडतो. देवाच्या शांतीचे पवित्र संरक्षण नसेल, तर क्रोध, दडपशाही, फसवणूक आणि मत्सर यांचे बाण आपली मोठी हानी करू शकतात. पण या किल्ल्याच्या तटांच्या आत, आपली हानी करू पाहणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून प्रभू आपले रक्षण करतो. प्रभूच्या दयेत आश्रय घ्या आणि त्या दयेला तुमच्याभोवती शांतीचे असे कवच उभे करू द्या, जे जगातील अनिष्ट गोष्टींपासून तुमचे रक्षण करील. या हल्ल्यांना ते कवच भेदू देऊ नका. त्याऐवजी प्रभूच्या सहवासात समाधानी राहा आणि त्याच्या सुरक्षित आश्रयात त्याला तुमच्यामध्ये कार्य करू द्या (पाहा दैनंदिनी #1067).
तुमची शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न कशामुळे होतो? कोणती गोष्ट तुम्हाला आतून हादरवते आणि अस्वस्थ करते? लक्षात ठेवा, प्रभूला तुमचे रक्षण करायचे आहे आणि तुम्हाला आश्रय द्यायचा आहे. त्याच्या शांतीचा शोध घ्या. त्याचा शोध घ्या, म्हणजे तो तुम्हाला आपली शांती देईल. शांती ही अशी देणगी आहे की तिचे वर्णन शब्दांत करता येत नाही आणि ती मानवी आकलनापलीकडची आहे. ती असा सुरक्षित आश्रय आहे, जिथे तुमच्या आत्म्याचे दुष्टाच्या रोजच्या कुप्रवृत्तींपासून आणि हल्ल्यांपासून रक्षण होते. प्रभूची शांती तुम्ही अनुभवली आहे का? त्याच्या दयेच्या या देणगीवर तुमची नजर स्थिर आहे का? पूर्ण अंतःकरणाने येशूचा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची शांती नक्कीच अनुभवायला मिळेल. आणि तुम्ही त्याला वाव दिलात, तर त्या शांतीच्या आश्रयात प्रभू तुमच्यामध्ये महान कार्ये करील.
हे प्रभू, माझ्या आत्म्याच्या रक्षणाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. माझ्या अंतःकरणातील सर्व ओढी, आशा, इच्छा आणि दुर्बलता मी तुला अर्पण करतो. कृपया ये आणि माझ्याभोवती संरक्षणाचे कवच उभे कर, म्हणजे माझ्या अंतःकरणातील या पवित्र स्थानी मला तुला भेटता येईल. तुझ्या दयेतून प्रकट होणाऱ्या प्रेमाबद्दल मी तुझे आभार मानतो. ते प्रेम मला वेढून टाकते आणि माझ्या अंतःकरणात गोडवा व बळ निर्माण करते. हे माझ्या प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी स्वतःला तुझ्या परिपूर्ण सांभाळावर सोपवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
24 जुलै – संत शार्बेल मखलूफ, याजक व एकांतवासी — ऐच्छिक स्मृतिदिन





