डाव्या हातावर बाल येशूला घेतलेले संत योसेफ — चित्रकार: पीटर व्हान लिंट
व्हिडिओ
मूल घाबरते किंवा त्याला दुखापत होते, तेव्हा आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत त्याला सहज दिलासा मिळतो. रडणारे मूल सर्वप्रथम हाच आधार शोधते. आपलेही असेच असले पाहिजे. आपल्याला आधाराची गरज असते तेव्हा आपण स्वर्गातील आपल्या पित्याच्या आणि आपला तारणारा येशू याच्या कुशीत धाव घेतली पाहिजे. प्रत्येक बाबतीत देवाकडे वळण्यास आपण संकोच करू नये, विशेषतः निराशेला शरण जाण्याचा मोह होतो तेव्हा किंवा आपले दुर्बलपण आणि पाप आपल्याला जाणवते तेव्हा (पाहा दैनंदिनी #505).
ओझ्यांनी तुम्ही दबून जाता, तुम्हाला राग येतो किंवा निराशेला शरण जाण्याचा मोह होतो, तेव्हा तुम्ही कोणाकडे वळता? काही जण देहाला सुख देणाऱ्या पापमय गोष्टींचा आधार घेतात, काही जण कठोर शब्द बोलतात, तर काही जण देवाकडे धाव घेतात. प्रत्येक क्षणी देवाकडे धाव घ्या! जीवन सुरळीत असताना आणि मन आनंदाने व सांत्वनाने भरून आलेले असताना आपण त्याच्याकडे धाव घेणे उत्तमच. पण जीवन कठीण होते तेव्हाही आपण ताबडतोब त्याच्याकडे धाव घ्यावी, अशी देवाची इच्छा आहे. तुम्हाला आधाराची गरज भासेल तेव्हा सर्वप्रथम देवाच्या कुशीची आठवण होऊ द्या.
हे प्रभू, मी खरोखरच तुझ्याकडे धाव घेतो. प्रत्येक बाबतीत तुझ्याकडे धाव घेण्याची सवय दिवसेंदिवस माझ्या अंगी बाणावी, अशी मी प्रार्थना करतो. माझी प्रत्येक गरज घेऊन मी तुझ्याकडे वळावे, अशी मी प्रार्थना करतो. हे दैवी प्रभू, मी तुला घट्ट धरून राहतो आणि सदैव तुझ्याच आधाराने जगण्याचा प्रयत्न करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पास्का काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतने




