वरील मुख्य छायाचित्र: मॅग्डा एलर्स (स्रोत: पेक्सेल्स)
सैतानाचे, म्हणजेच त्या दुष्टाचे, अस्तित्व मान्य करणे महत्त्वाचे आहे. त्याचा संताप आणि द्वेष किती तीव्र आहेत, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्याचा द्वेष इतका तीव्र आहे की त्याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. आपला द्वेष करणे आणि आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपला नाश करण्याचा प्रयत्न करणे थांबवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. हे जाणून घेणे का महत्त्वाचे आहे? कारण जेव्हा सैतान आपल्यावर थेट किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनात त्याने ‘भडकवलेल्या’ संतापातून हल्ला करतो, तेव्हा आपण घाबरतो, विचलित होतो किंवा स्वतःही संतापतो. आपल्यालाही उलट प्रतिकार करावासा वाटतो. पण सैतानाचा द्वेष किती तीव्र आहे हे समजले, तर आपल्या लक्षात येईल की त्याला आपल्यालाही त्याच्या द्वेषात आणि संतापात ओढायचे आहे. म्हणून त्याचा द्वेष कोणत्याही प्रकारे अनुभवास आला, तर त्याला आणि त्याच्या हल्ल्यांना पाठ फिरवून देवाच्या सान्निध्यात शांत राहणे, हाच सर्वोत्तम प्रतिसाद आहे. आपल्या आत्म्यातील शांती सैतानाला दूर लोटेल आणि तो आपल्याविरुद्ध जे काही करू पाहतो ते निष्फळ ठरवेल. त्याच्या संतापाकडे क्षणभरही लक्ष देण्याची किंवा त्यात गुंतण्याची गरज नाही (पाहा दैनंदिनी क्रमांक 713).
सैतानाला आणि त्याच्या हल्ल्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता? त्याचे कपटी आणि नीच डावपेच तुम्हाला ओळखता येतात का? तुमची शांती हिरावून घेण्याचे आणि तुमचे लक्ष श्रद्धेऐवजी भीतीकडे वळवण्याचे त्याचे प्रयत्न तुम्हाला ओळखता येतात का? आज क्रूसावरील येशूचे चिंतन करा आणि आपल्या तारणकर्त्याने आपल्या परिपूर्ण प्रेमातून केलेल्या या तारणदायी कृतीकडे दृष्टी लावा. प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रभूकडे वळलात, तर त्याची शांती तुमच्यात टिकून राहील आणि आपला द्वेष करणाऱ्या सैतानाचे अंधकारमय हल्ले तो परतवून लावील.
हे प्रभू, मी माझी दृष्टी तुझ्याकडे वळवतो आणि माझे मन, हृदय, भावना आणि तीव्र इच्छा केवळ तुलाच अर्पण करतो. अविवेकी भीतीपासून आणि सैतानाच्या सर्व हल्ल्यांपासून मला मुक्त कर. त्याचे दुष्ट डावपेच मला ओळखता येवोत आणि केवळ तुझ्यावरच विश्वास ठेवून त्यांचा माझ्यावर होणारा परिणाम मला दूर सारता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
शुक्रवार, 15 मे – शनिवार, 23 मे
आजचे संत – काशियाची संत रीटा




