व्हिडिओ
भीती अनेक कारणांनी उद्भवते. एखादा धोका अगदी जवळ असल्याची जाणीव होताच अचानक भीती वाटते. स्वतःचे रक्षण करण्यासाठी शरीर आणि मन देत असलेली ही एक प्रतिक्रिया आहे. उदाहरणार्थ, एखादी गाडी अचानक तुम्ही ज्या मार्गिकेतून जात आहात त्या मार्गिकेत घुसली, तर ही प्रतिक्रिया तुमचा जीवही वाचवू शकते. अचानक वाटणारी भीती तुम्हाला लगेच काहीतरी करायला लावते, त्यामुळे धडक टाळता येते. पण काही धोके तात्काळ नसले, तरी त्यांच्यामुळे आपल्या भल्याला बाधा येईल असे वाटते आणि त्यातूनही भीती निर्माण होते. उदाहरणार्थ, आर्थिक मंदीमुळे किंवा व्यवसायातील नफा कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला भीती सतावू शकते. ‘मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू?’ अशी भीती तिला वाटू शकते. किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीला भविष्याची अधिकाधिक भीती वाटू शकते. अशी आणखी कितीतरी उदाहरणे देता येतील. काही प्रकारची भीती हितकारक असते (उदाहरणार्थ, अपघात टाळण्यासाठी गाडी झटकन बाजूला वळवण्यास प्रवृत्त करणारी भीती), पण बहुतेक प्रकारची भीती तशी नसते. विशेषतः, भीतीमुळे चिंता आणि काळजी वाढून देवावरचा व त्याच्या दैवी व्यवस्थेवरचा विश्वास ढळतो, तेव्हा ती अडचण ठरते. पण देव तुमच्या हृदयात जिवंत असेल, तेथे तो वास करत असेल आणि राज्य करत असेल, तर आपण कोणत्याही संघर्षाला सामोरे जात असलो तरी त्याची उपस्थिती आपल्यात अलौकिक धीर आणि विश्वास निर्माण करते (पाहा दैनंदिनी #1001).
सध्या तुम्ही ज्या विशिष्ट भीतीशी झुंज देत आहात, तिच्यावर चिंतन करा. कशामुळे तुम्हाला इतकी काळजी आणि अस्वस्थता वाटते? कारण काहीही असो, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवावा, अशी त्याची इच्छा आहे. होय, एक प्रकारची ‘पवित्र’ भीती आपल्याला प्रत्येक परिस्थितीचे योग्य आकलन करून घेण्यास आणि दक्षतेने व जबाबदारीने वागण्यास मदत करू शकते. पण अनेकदा आपली खरी अडचण ही असते की आपण देवावर पुरेसा विश्वास ठेवत नाही. आपल्या भीतीवर आणि देवावर आपण किती विश्वास ठेवतो यावर चिंतन करा. ख्रिस्ताला आपल्या हृदयात अधिक खोलवर स्थान द्या, म्हणजे त्याची उपस्थिती सर्व निरर्थक भीती दूर करील आणि तो घेत असलेल्या काळजीवर, त्याच्या दैवी व्यवस्थेवर आणि त्याच्या दयेवर तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवता येईल.
हे प्रभू, माझा तुझ्यावर खरोखर विश्वास आहे. तुझ्यावर आणखी अधिक विश्वास ठेवायला मला मदत कर. जे काही मला भीतीच्या आहारी नेऊ पाहते, ते सर्व मी तुला समर्पित करतो. तुझ्या परिपूर्ण प्रेमावर माझा विश्वास आहे आणि माझ्या जीवनात तुझ्या दयेवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची माझी इच्छा आहे. हे प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझे जीवन घडव आणि मला सदैव मार्ग दाखव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





