संत पौलांचा दिव्य परमानंद — चित्रकार: निकोलास पुसँ
प्रेमात पडल्यावर माणूस ‘मंत्रमुग्ध’ होऊ शकतो. अशा मानवी प्रेमात तुम्ही काहीसे निःशब्द होऊ शकता. तुम्हाला नेमके काय वाटते, हे सांगण्याची गरज भासत नाही, किंबहुना ते सांगणे शक्यही वाटत नाही. पण देवाचे प्रेम मानवी प्रेमाच्या कोणत्याही अनुभवापलीकडचे आहे. म्हणून जेव्हा त्याचा खोलवर अनुभव येतो, तेव्हा ज्या देवावर तुम्ही प्रेम करता, त्याच्याकडे तुम्ही विस्मयाने आणि आदराने शांतपणे पाहत राहता. ज्या देवावर प्रेम करण्याकडे तुमचे मन ओढले गेले आहे, त्याचे गौरव आणि वैभव पाहून तुम्हाला वाटणारा आदर आणि विस्मय कोणत्याही शब्दांत मावणार नाही. तुमचे मौन आणि विस्मय यातून जे व्यक्त होईल, ते तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारे व्यक्त करता येणार नाही (पाहा दैनंदिनी #729).
तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का? अधिक नेमकेपणाने विचारायचे तर, तुम्ही आपल्या देवाच्या प्रेमात पडला आहात का? देवाच्या ‘प्रेमात पडणे’ म्हणजे केवळ एखादी उत्कट मानवी भावना नव्हे. ती अशी आध्यात्मिक ओढ आहे, जी तुमच्या आत्म्याला पूर्णपणे व्यापून टाकते आणि देवाच्या सान्निध्यात तुम्हाला समाधान लाभते. जीवनात परिपूर्णता लाभण्यासाठी देवाशी असलेल्या या आध्यात्मिक ऐक्याचा अनुभव पुरेसा आहे. जीवनात तुम्ही जे काही कराल, त्याचा उगम या अनुभवात असेल, कारण तुमची प्रत्येक कृती तुमच्या प्रिय देवावरील प्रेमासाठीच असेल. देवावरचे तुमचे प्रेम किती खोल आहे, यावर चिंतन करा. हे प्रेम तुमच्या जीवनात जिवंत असल्याचे जाणवत नसेल, तर तुम्हाला असे प्रेम हवे आहे, हे प्रभूला सांगा आणि सर्व शक्तीनिशी त्याचा शोध घ्या.
हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझे प्रेम मला लाभावे, अशी माझी इच्छा आहे. माझे प्रेम अजून परिपूर्णतेपासून कितीतरी दूर आहे, हे मला ठाऊक आहे. हे प्रभू, तुझ्याशी अधिक जवळीक साधत तुझा शोध घेण्यास आणि अत्यंत जिव्हाळ्याने तुझी भेट घेण्यास मला मदत कर. माझा आत्मा तुझ्या ओढीने भरून जावो आणि तुझी भेट होताच तुझे गौरव आणि वैभव मला न्याहाळता येवो. हे माझ्या देवा, तुझ्याविषयीच्या गाढ आदरात आणि विस्मयात मी खरोखर ‘हरवून’ जावो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
25 मे – ख्रिस्तसभेची माता धन्य कुमारी मरिया हिचा स्मृतिदिन




