अल्कांताराचे संत पेत्र यांची भावसमाधी, चित्रकार: फ्रान्चेस्को फोन्तेबास्सो
‘सौंदर्य’ पाहणाऱ्याच्या नजरेत असते, असे म्हणतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सौंदर्य कशाला म्हणायचे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून असते, असे काहींचे मत आहे. वरवर पाहता यात काही अंशी तथ्य असेलही; पण अधिक खोलवर पाहिले तर खरे सौंदर्य देवाकडून येते आणि ते सर्वार्थाने वस्तुनिष्ठ असते. ते आपल्या वैयक्तिक आवडीवर नव्हे, तर देवावर अवलंबून असते. एखाद्या गोष्टीत किंवा व्यक्तीत देवाचे आणि त्याच्या दयेचे प्रतिबिंब जितके अधिक दिसते, तितकी ती गोष्ट किंवा व्यक्ती अधिक सुंदर असते. आपल्या आत्म्याच्या दृष्टीने हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. इतरांनी आपल्याला ‘सुंदर’ मानावे, असे आपल्या सर्वांनाच वाटते. पण पवित्र जीवन जगल्यानेच हे शक्य होते, हेही आपण समजून घेतले पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य अनोखे असते. स्वर्गात आपण सगळे सारखे नसू; उलट, प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणातून देवाचे तेज अशा खास रीतीने झळकेल, जी केवळ त्या व्यक्तीचीच असेल. देवाचे सौंदर्य आणि वैभव तुमच्या जीवनातून झळकू द्या, जेणेकरून तुम्ही त्याच्या गौरवाचे साधन व्हाल (पाहा दैनंदिनी #1251).
आपण सुंदर असावे, असे तुम्हाला वाटते का? कदाचित पुरुषांपेक्षा स्त्रियांना या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे जाईल, कारण ‘सुंदर’ हा शब्द स्त्रियांच्या बाबतीत अधिक वापरला जातो. पण या प्रश्नावर चिंतन करा. चिंतन करताना सौंदर्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. अगदी खोलवर विचार केला तर सौंदर्य म्हणजे केवळ नैसर्गिक शारीरिक आकर्षण नव्हे. खरे सौंदर्य म्हणजे देवाच्या गौरवात सहभागी होणे आणि जसा प्रकाश लोलकातून झळकतो, तसा तो गौरव आपल्या आत्म्यातून झळकू देणे. देवाचे तेज तुमच्यातून झळकू द्या, जेणेकरून त्याचे सौंदर्य इतरांना त्याच्या दयेने अनोख्या आणि सखोल रीतीने आशीर्वादित करील.
हे प्रभू, तूच माझ्या आत्म्याचा गौरव आणि वैभव आहेस. तुझे सौंदर्य विस्मयचकित करणारे आणि सर्वार्थाने तेजस्वी आहे. ये, माझ्यात वास कर आणि माझ्यातून झळक, म्हणजे तुझे रूपांतर घडवणारे सौंदर्य इतरांना माझ्या जीवनात दिसेल. हे प्रिय प्रभू, तुझ्या गौरवाचे साधन म्हणून मी स्वतःला तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




