धाकटा दावीद – दयेची सात शारीरिक कृत्ये
देवाच्या अथांग दयेचे साधन व्हावे, अशी तुमची इच्छा आहे का? असेल, तर तुम्ही तुमच्या कृती, शब्द आणि प्रार्थना यांद्वारे तसे होऊ शकता. सर्वप्रथम, आपल्या कृतींतून दया दाखवण्याच्या संधींकडे तुम्ही सतत लक्ष ठेवले पाहिजे. पण अनेकदा अशी संधी मिळाली (उदाहरणार्थ, एखाद्याला क्षमा करण्याची संधी), तरी आपण तिकडे पाठ फिरवतो. मात्र आपण जागरूक राहून अशा संधी जाणीवपूर्वक शोधल्या पाहिजेत आणि त्या मिळाल्यावर आनंद मानला पाहिजे. दुसरे म्हणजे, तुमच्या शब्दांतून कृपा आणि दया इतरांपर्यंत पोहोचू शकतात; पण तेच शब्द इतरांना दुखवूही शकतात, त्यांचे नुकसानही करू शकतात. कठोरपणे बोलून आपण इतरांचे नुकसान करतो; बोलायला हवे तेव्हा गप्प राहूनही आपण नुकसान करतो. आपण प्रेमाने सत्य बोलतो, तेव्हा आपल्या शब्दांतून दया प्रकट होते. आपले शब्द स्वीकारायला कठीण असले तरी त्यांतून देवाचे सत्य प्रकट व्हावे, हा आपला हेतू असावा. आणि तिसरे म्हणजे, इतरांसाठी प्रार्थना करण्यात आणि त्यांच्यासाठी त्याग अर्पण करण्यात किती सामर्थ्य आहे, हे आपण अनेकदा विसरतो. संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः एखाद्या व्यक्तीसाठी देवाकडे मध्यस्थी करणे म्हणजे जणू किल्ली फिरवून देवाच्या कृपेची दारे उघडणे. दयेच्या या अत्यावश्यक कृतीकडे दुर्लक्ष करू नका (पाहा दैनंदिनी #742).
तुमच्या कृती, शब्द आणि प्रार्थना यांवर चिंतन करा. आपल्या प्रभूने तुमच्याद्वारे त्याची दया इतरांपर्यंत कशी पोहोचवली, याची ठोस उदाहरणे तुम्हाला सांगता येतील का? अशी काही उदाहरणे आठवण्याचा प्रयत्न करा. हे आत्मपरीक्षण करताना तुम्हाला अडचण आली, तर ते एक चांगले चिन्ह आहे: प्रभूला दररोज तुमच्याद्वारे आपली दया अधिक विपुलपणे ओतायची आहे.
हे प्रभू, माझे शब्द, माझ्या कृती आणि माझे प्रार्थनामय जीवन मी तुला समर्पित करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर आणि तू दररोज देत असलेल्या प्रेरणेकडे लक्ष द्यायला मला मदत कर. या जगात तुझे परिपूर्ण प्रेम पसरवण्याच्या संधी दररोज, दिवसभर, मनापासून शोधायला मला मदत कर. हे प्रिय प्रभू, मी स्वतःला तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
27 मे – कँटरबरीचे संत ऑगस्टीन, बिशप — ऐच्छिक स्मृतिदिन




