मराठी

चिंतन 151: आध्यात्मिक नाते

संत बेनेडिक्ट यांच्यासोबत संत स्कोलास्टिका — लॉरेन्स ओ. पी., परवाना CC BY-NC-ND 2.0.

व्हिडिओ

एखाद्या व्यक्तीशी खऱ्या अर्थाने जवळीक साधण्यासाठी आणि तिला सखोलपणे समजून घेण्यासाठी सतत बोलत राहणे आणि आपल्या मनातले व हृदयातले सारे काही सांगणे आवश्यक आहे का?  दोघांचेही आत्मे देवाशी घनिष्ठपणे जोडलेले असतील, तर तसे करण्याची गरज नाही.  अशा वेळी, आपल्यात असलेले ऐक्य ओळखण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी दोघांनाही फारसे बोलावे लागत नाही.  दोघांच्याही अंतःकरणात देव जिवंत असतो, तेव्हा त्याची उपस्थितीच त्यांना एकत्र आणते आणि एकमेकांना जाणून घेण्यास मदत करते.  यातून आध्यात्मिक नात्याचा असा आशीर्वाद लाभतो, जो इतर कोणत्याही मार्गाने मिळू शकत नाही—वर्षानुवर्षे सतत बोलून आणि मनातले एकमेकांना सांगूनही नाही.  दोघांनाही देवाची ओळख असल्यामुळे त्यांच्यात जे ऐक्य निर्माण होते, ते इतर कोणत्याही मार्गाने साधलेल्या ऐक्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असते आणि सुंदर मैत्री घडवण्यासाठी अधिक परिणामकारक ठरते (पाहा दैनंदिनी #768).

तुमच्या मैत्रीच्या नात्यांचा विचार करा.  त्या नात्यांचा पाया काय आहे?  तुमची मैत्री तुमच्या श्रद्धामय जीवनावर आणि देवावरील प्रेमावर आधारलेली असेल, अशी आशा आहे.  मित्रमैत्रिणींशी आपल्या श्रद्धेविषयी किती सहजपणे बोलता येते, यावर चिंतन करा.  सर्वांशी मैत्रीने आणि प्रेमाने वागणे चांगले आहे; पण ज्यांच्याशी आध्यात्मिक नाते जुळू शकते, अशा व्यक्तींना शोधणेही हिताचे आहे.  ज्यांच्याशी असे गहिरे प्रेम आणि आध्यात्मिक मैत्रीचे नाते जुळू शकेल, अशा व्यक्तींकडे पवित्र आत्म्याला तुम्हाला नेऊ द्या. त्यांच्याद्वारे प्रभू तुम्हाला आपल्या दयेचा विपुल आशीर्वाद देईल.

हे प्रभू, तुझ्यावर दृढ श्रद्धा असलेल्या व्यक्तींची देणगी तू माझ्या जीवनात दिलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो.  त्या मैत्रीच्या नात्यांचा आधार घेण्यास आणि त्यांत तुझे दयाळू हृदय ओळखण्यास मला मदत कर.  तू माझ्या जीवनात आणलेल्या सर्वांसाठी मला तुझ्या दयेचे साधन बनव.  हे प्रभू, तू माझा सर्वांत जवळचा मित्र आहेस. तुझी मैत्री आणि माझ्यावरचे तुझे प्रेम या अमूल्य देणगीबद्दल मी तुझे आभार मानतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

31 मे – परमपवित्र त्रैक्याचा महोत्सव

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत आणि सण