मराठी

चिंतन 177: पवित्र आज्ञापालन

एक्स व्होटो, चित्रकार: फिलिप द शांपान्य

व्हिडिओ

देवाच्या इच्छेऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यापासून आपल्याला जपणाऱ्या सर्वांत प्रभावी साधनांपैकी एक म्हणजे पवित्र आज्ञापालन. व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून आज्ञापालन करण्याचे वरदान लाभते. हे बाह्य आचरण ते अंतःकरणात रुजवू शकतात आणि अशा रीतीने आपण देवाच्या इच्छेनुसार जगत आहोत, याची त्यांना खात्री होते. पण आज्ञापालन केवळ व्रतस्थ जीवनापुरते मर्यादित नाही; प्रत्येकाने ते आपल्या जीवनात आचरले पाहिजे. आज्ञापालन अनेक प्रकारे करता येते. कुटुंबात आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा इतरांच्या पसंतीला मान देतो, तेव्हा ते एक प्रकारचे आज्ञापालन ठरते. अशा रीतीने आपण प्रेम आणि एकता वाढवतो. आपल्या ख्रिस्तसभेची वाणी आणि शिकवण यांना आपण आपली इच्छा नम्रपणे अधीन करतो, तेव्हा आपण अधिक सखोल रीतीने आज्ञापालन करतो. प्रभू आपल्या ख्रिस्तसभेद्वारे जे सांगतो, त्याचे पवित्र आज्ञापालन करताना आपली कधीही चूक होणार नाही. आपण असे आज्ञापालन करतो, तेव्हा देवाची इच्छा आपल्यावर बाहेरून लादली जाणार नाही. उलट, तो आपल्याशी बोलतो हे प्रथम आपल्याला अंतःकरणात ऐकू येईल आणि नंतर त्याला बाहेरून पुष्टी मिळेल (पाहा दैनंदिनी #932-933).

दुसऱ्याच्या पसंतीला मान द्यावा म्हणून देव तुम्हाला हळुवारपणे, नकळत साद घालत आहे, हे तुम्हाला जाणवते का? देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या गोष्टींना तुम्ही मान देऊ नये. पण स्वतःचा त्याग करून दुसऱ्याची इच्छा ‘आज्ञाधारकपणे’ स्वीकारण्याच्या अनेक संधी दररोज मिळतात. देव आपल्या ख्रिस्तसभेद्वारे जी इच्छा व्यक्त करतो, ती तुम्ही नेहमी अशा रीतीने स्वीकारलीत, तर दयेची द्वारे उघडलेली तुम्हाला दिसतील आणि तुमचे नम्र आज्ञापालन तुम्हाला मोठ्या पवित्रतेकडे नेईल.

हे प्रभू, कधीकधी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्याची इच्छा स्वीकारणे फार कठीण जाते. या छोट्या कृती म्हणजे खऱ्या प्रेमाची आणि तुझ्यापुढे पवित्र भावाने नतमस्तक होण्याची कृत्ये आहेत, हे मला समजू दे. पवित्र आज्ञापालन करताना, विशेषतः त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो तेव्हा, माझी इच्छा तुझ्या इच्छेनुसार घडवण्यास मी तुला वाव देऊ दे. तुझ्या ख्रिस्तसभेद्वारे प्रकट होणारी तुझी इच्छाही मी स्वीकारतो आणि माझ्या स्वतःच्या विचारांपेक्षा तू जे प्रकट करतोस त्यालाच नेहमी मान देतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

26 जून – संत होसेमारिया एस्क्रिवा, धर्मगुरू – ऐच्छिक स्मृतिदिन
(विविध ख्रिस्तसभेच्या प्रांतांमध्ये)

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण