मराठी

चिंतन 178: केवळ स्वतःच्या बळावर पवित्रता कधीच साधता येत नाही

संत मार्क यांच्या उपस्थितीत उपदेश करताना संत पेत्र, चित्रकार: फ्रा अँजेलिको

व्हिडिओ

तुम्हाला पवित्र जीवन जगण्याची आकांक्षा आहे का? असेल, तर केवळ स्वतःच्या बळावर तुम्हाला ते साधता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची, किंबहुना अनेकांची मदत लागते. इतरांकडून प्रेमळ मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूने आपल्यासाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. काही जणांना अनेक वर्षांपासून अशा आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभते, जो ख्रिस्ताच्या मनाशी आणि हृदयाशी सुसंगत असे मार्गदर्शन करतो. पण बहुतेकांना ख्रिस्त आपल्या चर्चद्वारे सर्वांना देत असलेल्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवण्याचे आवाहन आहे. ज्या धर्मगुरूकडे आपण नियमितपणे आपल्या पापांचा स्वीकार करू शकतो, असा धर्मगुरू शोधून आपण हे मार्गदर्शन स्वीकारतो. संतांच्या जीवनाचा अभ्यास करून आणि त्यांच्या ज्ञानातून शिकूनही आपण ते स्वीकारतो. आपला प्रभू आपल्याला जे सांगू इच्छितो ते मनात खोलवर रुजावे म्हणून मिस्साबलिदानात लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हाही आपण ते स्वीकारतो. तसेच, खरोखर पवित्र जीवन जगणाऱ्या व्यक्तींना आपण आपले अंतरंग जाणून घेऊ देतो, जेणेकरून त्या आपल्याला नम्रपणे सल्ला देऊ शकतील (पाहा दैनंदिनी #938).

प्रभूला तुम्ही तुमच्या आत्म्याला मार्गदर्शन करू देता का? पापस्वीकाराच्या संस्कारात तो तुमच्याशी बोलतो, तेव्हा तुम्ही त्याचे ऐकता का? मिस्साबलिदानात, संतांच्या ज्ञानातून आणि चर्चच्या शिकवणीतून तो जे सांगतो, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकता का? तुमच्या वाटचालीत तुम्हाला मदत करावी म्हणून देवाने तुमच्या जीवनात आणलेल्या व्यक्तींची तुम्ही मदत घेता का? तुमचे जीवन पवित्रतेच्या दिशेने नेण्यासाठी देव इतरांची मदत तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे देऊ इच्छितो, यावर आज चिंतन करा. त्याच्या विपुल दयेतून मिळालेली ही देणगी स्वीकारा.

हे प्रभू, तूच माझा मार्गदर्शक आहेस; तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. तरीही तू इतरांच्या माध्यमातून मला मार्गदर्शन करायचे ठरवतोस. जीवनाच्या या वाटचालीत तू मला अनेक प्रकारे देऊ केलेली मदत स्वीकारण्यासाठी मी स्वतःला नम्र करायला सदैव तयार असावे. तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या या साधनांकडे मी कधीही पाठ फिरवू नये, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

27 जून – अलेक्झांड्रियाचे संत सिरिल, बिशप व चर्चचे धर्मपंडित

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण