मराठी

चिंतन 218: देवाची एक अनुभूती

ख्रिस्त आणि श्रीमंत तरुण अधिकारी, चित्रकार: हाइनरिख होफमान

व्हिडिओ

देवाला आणि त्याच्या मार्गांना समजून घेणे महत्त्वाचे आहे; पण समजून घेणे म्हणजे ओळखणे नव्हे. देवाला ओळखणे म्हणजे एका व्यक्तीशी भेट होणे. ती व्यक्ती काय सांगते ते समजून घेण्यापुरते आपण थांबत नाही; तर आपण तिच्याशी संवाद साधतो, तिला भेटतो, तिचा अनुभव घेतो आणि तिच्याशी नाते जोडतो. खरे तर, देवाची एकदाही अनुभूती येणे हा या जीवनात आपल्याला लाभू शकणाऱ्या सर्वांत मोठ्या आशीर्वादांपैकी एक आहे. त्याची एकच अनुभूती, त्याच्याशी झालेली एकच भेट, त्याला ओळखण्याचा एकच क्षण—यांपैकी एकही गोष्ट आपले जीवन कायमचे बदलून टाकण्यास पुरेशी आहे. देवाला खऱ्या अर्थाने ओळखणे हे जीवनात आपण करू शकणाऱ्या इतर कोणत्याही कृतीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे (पाहा दैनंदिनी #1133).

जगातली सगळी संपत्ती आणि कीर्ती, मोठे यश आणि प्रतिष्ठा तुम्हाला देऊ केली, तर तुम्ही ती स्वीकाराल का? बहुधा स्वीकाराल. यशस्वी, श्रीमंत किंवा प्रसिद्ध व्हावे, आपला मोठा सन्मान व्हावा, असे अनेकदा आपल्याला वाटते. यांपैकी कोणतीही गोष्ट मुळात वाईट नाही. पण देवाला ओळखण्याच्या इच्छेपेक्षा या इच्छा आपल्याला जास्त महत्त्वाच्या वाटू लागतात, तेव्हा त्यांत मोठा धोका असतो: त्या आपले लक्ष आपल्या अंतिम ध्येयापासून दूर नेतात. स्वतः देवाला ओळखण्यापेक्षा जगातल्या गोष्टी आपल्याला अधिक हव्या आहेत, असे लक्षात येते, तेव्हाच आपल्या जीवनात कशाला पहिले स्थान द्यायचे याबद्दल आपली गल्लत झाली आहे, हे समजते. आपल्या दयाळू देवाशी एकदाच का होईना, भेट घडावी म्हणून प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल की त्याच्याशी झालेली ही ओळख जग तुम्हाला देऊ शकेल अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मोलाची आहे.

हे माझ्या प्रभू, तुला ओळखण्याची माझी इच्छा आहे. माझ्या आत्म्यात ही इच्छा अशी वाढव की ती माझ्या जीवनातल्या इतर सर्व इच्छांपेक्षा प्रबळ होईल. हे प्रिय प्रभू, एकदाच का होईना, मला तुझी अनुभूती दे, तुझी ओळख होऊ दे आणि त्या ओळखीतून माझे जीवन बदलून टाक, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

6 ऑगस्ट  – प्रभूच्या रूपांतराचा सण

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण