मराठी

चिंतन 241: आपल्या विशिष्ट पापांवर उपाय

मोशे दहा आज्ञा घेऊन सीनाय पर्वतावरून उतरतो, फर्डिनांड बोल यांचे चित्र

व्हिडिओ

तुम्ही आपल्या पापांवर मात कशी कराल?  प्रत्येक पाप वेगळे असते आणि त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्यासाठी विशिष्ट प्रार्थना व त्याग आवश्यक असतात.  देहवासनेची, क्रोधाची आणि गर्वाची पापे ही तीन सामान्य प्रकारची पापे आहेत.  यांपैकी प्रत्येक पापावर मात करता येते, पण त्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागू शकते.  देहवासनेच्या पापांशी तुमचा संघर्ष असेल, तर उपवास करण्याचा प्रयत्न करा.  वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ किंवा पेये वर्ज्य करून देहाला सुखावणाऱ्या गोष्टींचा त्याग करा.  क्रोधाच्या पापांवर उपाय म्हणून, ज्या व्यक्तीवर तुम्ही रागावलेले आहात, तिच्यासाठी एखादे चांगले काम करा किंवा तिच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करा.  त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा आणि येशूने क्रुसावर उच्चारलेले शब्द म्हणा: “हे पित्या, त्यांना क्षमा कर; ते काय करीत आहेत हे त्यांना ठाऊक नाही.”  गर्वाच्या पापांवर उपाय म्हणून, नम्रपणे प्रार्थना करत आपल्या प्रभूसमोर साष्टांग दंडवत घालण्याचा आणि त्याच्यासमोर स्वतःला रिकामे करण्याचा प्रयत्न करा.  ज्या पापांशी तुमचा संघर्ष आहे, त्यांच्यासाठी हे विशिष्ट उपाय आचरणात आणून प्रभूला अर्पण करण्याचा प्रयत्न करा; मग देवाची दया तुमच्यावर विपुल प्रमाणात ओतली जाईल (पाहा दिनदर्शिका #1248).

कोणत्या विशिष्ट पापांशी तुमचा संघर्ष चालू आहे?  दहा आज्ञांपैकी प्रत्येक आज्ञेचा सविस्तर विचार करून किंवा सात प्रमुख पापांच्या प्रकाशात तुम्ही नियमितपणे सखोल सदसद्विवेकपरीक्षण कराल याची काळजी घ्या.  ज्या मुख्य पापांशी तुमचा संघर्ष आहे, विशेषतः जी पापे सवयीची झाली आहेत, ती ओळखल्यावर त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय शोधा.  पापांसाठी केलेले प्रायश्चित्त औषधासारखे असते.  प्रत्येक आजारासाठी योग्य औषध लागते.  देव तुमच्या आत्म्यासाठी ही “औषधे” कोणकोणत्या मार्गांनी दाखवून देतो, त्याकडे लक्ष द्या आणि ती घेण्यास कचरू नका.  तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रायश्चित्तामुळे तुमच्या जीवनात दयेचे दार नव्या रीतीने उघडेल आणि तिचा अधिक सखोल अनुभव तुम्हाला येईल.

हे प्रभू, माझ्या अनेक पापांमुळे मी आजारी आहे, हे मला ठाऊक आहे.  मी दुर्बळ आहे आणि मला बरे होण्याची गरज आहे.  माझी पापे मला दिसू दे आणि तुझ्या दयेच्या आधाराने त्यांना सामोरे जाण्यास मला मदत कर.  त्यांच्यावर मात करण्याचे उपाय मला दे, म्हणजे मला तुझ्या अधिक जवळ येता येईल.  हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यापासून दूर ठेवणाऱ्या सर्व गोष्टींपासून मला मुक्त कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

29 ऑगस्ट – संत बाप्तिस्ता योहान यांचे दुःखसहन व साक्षीमरण—स्मृतिदिन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण