मराठी

चिंतन 246: पवित्र परमप्रसाद ग्रहण केल्यानंतर

G.dallorto, श्रेयनिर्देश, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने

व्हिडिओ

पवित्र परमप्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्ही काय करता? मन इकडे तिकडे भटकत असताना तुम्ही आपल्या बाकाकडे परतता का? आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष गेल्यामुळे आपल्या प्रभूशी खरी आध्यात्मिक भेट होण्याची संधी तुम्ही गमावता का? की तो क्षण खऱ्या प्रार्थनेचा आणि देवाशी एकरूप होण्याचा क्षण होऊ देता? जर पहिली गोष्ट खरी असेल, तर स्वतःशी आणि देवाशी प्रामाणिक राहा. या जाणिवेचा उपयोग या परमपवित्र देणगीकडे पाहण्याच्या आपल्या वृत्तीचा पुन्हा विचार करण्यासाठी करा! पवित्र परमप्रसाद ग्रहण केल्यानंतरचा क्षण अनमोल आहे. त्या क्षणी प्रत्येक आत्म्याला आमंत्रण आहे की, ज्याला त्याने नुकतेच ग्रहण केले, त्या प्रभूने त्याला पूर्णपणे आपल्यात सामावून घ्यावे. दुसऱ्या शब्दांत, पवित्र परमप्रसाद ग्रहण करणे ही केवळ आपल्या शरीराने केलेली कृती नाही; त्या क्षणी देवानेही आपल्यामध्ये कार्य केले पाहिजे. आपण केवळ आपल्या प्रभूला ग्रहण करण्याचे ठरवू नये, तर त्याने आपल्या दयेने आपल्याला पूर्णपणे व्यापून टाकावे, यासाठीही त्याला वाव द्यावा. ही अमूल्य देणगी ग्रहण केल्यानंतरच्या क्षणांपेक्षा यासाठी अधिक योग्य वेळ नाही. आपले जीवन देवाला अर्पण केल्याने हे घडते. ‘अर्पण’ म्हणजे देवाला वाहिलेली भेट. पवित्र परमप्रसाद ग्रहण करताना आपण स्वतःला आपल्या दैवी प्रभूला पूर्णपणे अर्पण केले पाहिजे (पाहा दैनंदिनी #1264).

तुम्ही शेवटच्या वेळी पवित्र परमप्रसाद ग्रहण केला, त्या क्षणाचे चिंतन करा. तो अनुभव कसा होता? त्या वेळी तुम्ही जे करत होतात त्याकडे तुमचे पूर्ण लक्ष होते का? तुम्ही स्वतःला प्रेमार्पण म्हणून आपल्या प्रभूला अर्पण केले का? त्यागभावनेने तुम्ही स्वतःला आपल्या प्रभूच्या हाती सोपवले का? आपल्या प्रभूच्या दयामय प्रेमाने तुम्हाला पूर्णपणे व्यापून टाकावे, यासाठी तुम्ही त्याला वाव दिला का? या प्रश्नांवर मनन करा आणि अशा अंतःकरणपूर्वक समर्पणाचा निश्चय करा. असे केल्यास, पवित्र परमप्रसाद ग्रहण करणे ही तुमच्या जीवनातील दयेची सर्वांत महान कृती ठरेल.

माझ्या प्रभू, माझ्या देवा, मी सर्वस्व तुझ्या हाती सोपवून तुला पूर्णपणे शरण येतो. प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. काहीही राखून न ठेवता मी स्वतःला प्रेमार्पण म्हणून तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

3 सप्टेंबर – संत ग्रेगरी महान, पोप व चर्चचे धर्माचार्य—स्मरणदिन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण