मराठी

चिंतन २४५: कठोर न्याय तूर्त रोखून ठेवला आहे

टोबी हडसन, CC BY-SA 3.0, विकिमीडिया कॉमन्समार्फत

व्हिडिओ

येशूला इथे आणि आत्ताच आपला न्याय अमलात आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या पापांमुळे आपल्याशी कठोरपणे वागण्याचा आणि आपल्यावर शाश्वत न्यायाचा निकाल देण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याच्या दयेमुळे या सत्याचा अनेकदा विसर पडतो. पण आपण हे सत्य कधीही विसरू नये. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण जगाचा तात्काळ आणि अपरिवर्तनीय न्याय करण्याचा देवाला पूर्ण अधिकार आहे, हे जोपर्यंत आपल्याला उमगत नाही, तोपर्यंत तो स्वतःला आवर घालतो, ही त्याच्या अमाप दयेची कृती आहे, हेही आपल्याला उमगणार नाही. देवाच्या दयेसाठी प्रार्थना करण्याची आणि आपल्या पुत्राचा कोप रोखला जावा म्हणून आपल्या वतीने विनवणी करण्याची जबाबदारी देवमातेवर विशेष रीतीने सोपवण्यात आली आहे. देवाने तिला आपल्यासाठी मध्यस्थी करण्याची ही जबाबदारी दिली आहे आणि तो तिच्या प्रार्थना ऐकतो. जगाला दया लाभावी म्हणून प्रार्थना करण्यास तो आपल्यापैकी प्रत्येकालाही बोलावतो. आपल्या प्रार्थना देवमातेच्या प्रार्थनांइतक्या सामर्थ्यवान नसल्या, तरी त्या तिच्या निष्कलंक हृदयात ठेवल्या तर त्यांनाही तेवढे सामर्थ्य लाभू शकते. आपल्या धन्य मातेकडे आपल्या प्रार्थना सोपवल्याने त्यांचे सामर्थ्य वाढते आणि त्या अथांग कृपेचे साधन बनतात; अशा रीतीने न्याय करण्यास पुढे झालेला देवाचा हात रोखला जातो (पाहा दैनंदिनी #1261).

तुमच्यावर अचानक कठोर न्यायाचा निकाल देण्याचा देवाला जो अधिकार आहे, तो तुम्हाला समजतो का? असा विचार करणे कदाचित सुखावह नसेल, पण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज या सत्यावर चिंतन करा. हे सत्य माना आणि लक्षात ठेवा की देव आपल्या दयेमुळे न्यायाचा निकाल रोखून ठेवतो. आज आपल्या धन्य मातेला तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करा आणि तुमच्याही प्रार्थना तिला अर्पण करा. तिच्या मध्यस्थीने अर्पण केलेल्या तुमच्या प्रार्थनांमुळे देवाचा न्याय रोखला जातो आणि आपल्या काळात आपल्याला त्याची दया लाभेल.

हे परमप्रिय माते, आज मी माझ्या सर्व प्रार्थना, कर्मे आणि त्याग तुला अर्पण करतो, जेणेकरून तू ते तुझ्या पुत्राला अर्पण करावेस. माझ्यासाठी आणि तुझ्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना कर, की तुझ्या पुत्राच्या दयेचा वर्षाव होत असताना त्याचा न्याय रोखला जावा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण