प्रीतीच्या सात कृती — चित्रकार: पीटर ब्रूगेल धाकटे
या जगात काहीतरी अद्भुत करून दाखवावे, असे तुम्हाला वाटते का? कधी तुमच्या मनात भव्य कल्पना आणि स्वप्ने येतात का? कधी आपण संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवण्याची लौकिक स्वप्ने पाहतो, तर कधी देवासाठी आणि ख्रिस्तसभेसाठी काहीतरी असामान्य करण्याची स्वप्ने पाहतो. पण ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहायला हवीत असे नाही, कारण आपल्यापैकी प्रत्येकाला असामान्य गोष्टी करण्याचे पाचारण आहे. अडचण अशी की, ‘असामान्य’ म्हणजे नेमके काय, याचा आपण अनेकदा चुकीचा अर्थ लावतो. मग त्याचा खरा अर्थ काय? तो विशेषतः छोट्या गोष्टी विलक्षण प्रेमाने करण्यात आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला हे दररोज, दिवसभर करता येते. आपल्या जीवनात अशा ‘छोट्या गोष्टी’ करण्याच्या कितीतरी संधी असतात. स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, मुलांना इकडून तिकडे ने-आण करणे, अंगणाची देखभाल करणे, कामाच्या ठिकाणी आपली कामे पूर्ण करणे किंवा इतरांशी रोजच्या सहज गप्पा मारणे, अशा कितीतरी गोष्टी असतात. यांपैकी प्रत्येक काम आपल्याला विलक्षण प्रेम दाखवण्याची संधी देते. तुम्ही प्रत्येक छोटी कृती मोठ्या प्रेमाने केलीत, तर तुमचे प्रेमही मोठे होईल आणि देव तुमच्या जीवनातून असामान्य गोष्टी घडवेल व अनेकांवर आपली दया करील (पाहा दैनंदिनी #1310).
आज तुम्हाला करायच्या छोट्या छोट्या कामांचा विचार करा. ही साधी कामे तुम्ही विलक्षण प्रेमाने कशी करू शकाल? अनेक कामे आपण नाखुशीने किंवा उदासीनतेने करतो. रोजच्या छोट्या, एकसुरी कामांचे मोल आपल्या लक्षात येत नाही. ही चूक आहे. प्रत्येक काम प्रेमाची कृती म्हणून आणि देवाला अर्पण म्हणून कसे करता येईल, याचा विचार करा. प्रत्येक संधीचा भक्तिभावाने आणि जाणीवपूर्वक उपयोग करा. मग तुमच्या जीवनातून देवाची दया झळकेल आणि महान कार्ये करण्याची तुमची स्वप्ने साकार होतील.
हे प्रभू, आज मी करत असलेली प्रत्येक छोटी कृती तुला अर्पण करतो. अगदी छोट्यात छोट्या सेवेतही मोल आणि अर्थ शोधायला मला मदत कर. असंख्य छोट्या कृतींतून तुझ्यावरील माझे प्रेम वाढत जावे आणि तुझ्या विपुल दयेचे पवित्र साधन होण्याची संधी मला लाभावी, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
17 सप्टेंबर – संत रॉबर्ट बेलार्मिन, बिशप व ख्रिस्तसभेचे धर्मपंडित — ऐच्छिक स्मृतिदिन
बिंगेनच्या संत हिल्डेगार्ड, कुमारी व ख्रिस्तसभेच्या धर्मपंडिता — ऐच्छिक स्मृतिदिन




