मराठी

चिंतन 261: इतरांमध्ये दडलेला येशू

लायरा वाद्य घेतलेला भिकारी, स्विश्चेव-पाओला यांची कलाकृती

व्हिडिओ

कल्पना करा की येशू दीन अवस्थेत, उपाशीपोटी आणि थंडीने कुडकुडत तुमच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला त्याची काळजी घ्यायला सांगितले.  अशा अनुभवाने तुम्ही दचकून जाल आणि ‘ही व्यक्ती खरोखर येशू आहे का?’ असा प्रश्न तुम्हाला पडेल.  पण तो येशूच आहे.  येशू दररोज गरजू व्यक्तीच्या रूपाने आपल्याकडे येतो.  कदाचित आपल्याला अशी एखादी व्यक्ती भेटेल जिला घर नाही, जी उपाशी आहे आणि जिला कपड्यांची गरज आहे.  अशी व्यक्ती भेटली, तर त्या व्यक्तीच्या रूपाने आपल्याला येशूच भेटतो.  पण रोज भेटणाऱ्या अनेकांना वेगळ्याच प्रकारची भूक आणि तहान असते.  प्रेम, समजूतदारपणा, सहानुभूती आणि आपुलकीने दिलेले लक्ष यांसाठी अनेक जण आसुसलेले असतात.  वरवर पाहता त्यांच्याशी जवळीक साधावीशी वाटणार नाही; पण त्यांच्या ठायी आपला प्रभू आहे, तुमच्या अंतःकरणातल्या दयेची आस धरून.  भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत आपला प्रभू आहे हे पाहण्यास संकोच करू नका.  त्या सर्वांवर, विशेषतः सर्वांत दयनीय अवस्थेत असलेल्या व्यक्तीवर, मनापासून भरभरून दया करा.  असे केल्याने तुम्ही स्वतः येशूवरच भरभरून प्रेम केले असे होईल (पाहा दैनंदिनी #1312).

गरीब आणि भिकारी यांच्याशी तुम्ही कसे वागता?  अन्न-वस्त्रासारख्या शारीरिक गरजा असलेल्यांचा विचार आधी करा; पण तेवढ्यावर थांबू नका. इतर प्रकारच्या गरजा असलेल्या सर्वांचाही विचार करा.  कठोर मनाचे लोक, पापी, गर्विष्ठ, उद्धट, रागाने भरलेले लोक अशा सगळ्यांचा विचार करा.  तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रूपाने आपला प्रभू तुमच्या अंतःकरणातल्या दयेचा थोडासा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे येतो.  यांच्यातल्या सर्वांत लहान व्यक्तीसाठी तुम्ही जे काही करता, ते ख्रिस्तासाठीच करता.  यावर तुमचा विश्वास आहे का?  असेल, तर तो तुमच्या कृतीत दिसला पाहिजे: तुम्ही प्रत्येकाशी दयेने वागले पाहिजे, विशेषतः ज्यांच्यावर प्रेम करणे तुम्हाला सर्वांत कठीण वाटते त्यांच्याशी.  आज आपल्या वागण्याशी निगडित या प्रश्नावर चिंतन करा आणि यापुढे भेटणाऱ्या पहिल्याच ‘भिकाऱ्या’मध्ये आपल्या प्रभूला शोधण्याचा निश्चय करा, मग ती व्यक्ती तुम्हाला कितीही अप्रिय वाटली तरीही.

हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत मी तुला शोधले पाहिजे, याची मला जाणीव आहे.  तुला पाहण्यासाठी मला दृष्टी दे आणि तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मला हृदय दे.  हे प्रिय प्रभू, इतरांच्या ठायी असलेल्या तुझ्यावर मी प्रेम करतो, तेव्हा माझ्या अंतःकरणातल्या दयेने तुला गोड आनंद लाभू दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण