फ्रेडरिक आर्थर ब्रिजमन – प्रार्थना [1877], सौजन्य: गँडाल्फ्स गॅलरी, CC BY-NC-SA 2.0
निरखून पाहण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी निवडता आल्या, तर तुम्ही कोणत्या निवडाल? खरे तर, त्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे देवाची दया आणि तुमचे स्वतःचे दुःख. देवाची दया ही निरखून पाहण्यासारख्या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे, हे बहुधा तुम्हाला लगेच पटेल; पण स्वतःच्या दुःखाकडेही असे पाहणे का शहाणपणाचे आहे, हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही. या दोन्हींपैकी फक्त एकीकडेच पाहण्यात धोका आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. स्वतःच्या दुःखाकडे न पाहता तुम्ही केवळ देवाच्या दयेवर लक्ष केंद्रित केले, तर तुमच्या जीवनात जिथे त्या दयेची सर्वांत जास्त गरज आहे, तिथे तिला तुम्ही आमंत्रण देऊ शकणार नाही. आणि देवाची दया न पाहता तुम्ही केवळ स्वतःच्या दुःखाकडे पाहत राहिलात, तर तुम्ही निराशेत बुडाल. प्रत्येक पाप, मनाची जखम, संभ्रम, संघर्ष आणि अशा इतर अडचणींवर उपाय मिळावा म्हणून देव आपल्याला आपली दया देतो. आपल्याला बरे करण्याची आणि आपली ओझी हलकी करण्याची आपल्या प्रभूला उत्कट इच्छा आहे. तुमच्यावर भार बनून राहिलेल्या प्रत्येक गोष्टीला त्याच्या दयेचा स्पर्श होऊ द्या; मग त्याची दया आपले कार्य साधेल (पाहा दैनंदिनी #1345).
थोडा वेळ काढून देवाची दया आणि तुमच्या मनावरची ओझी या दोन्हींकडे शांतपणे, चिंतनशील दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. या दोन्हींकडे पाहताना, तुमच्या आत्म्याच्या पवित्र गाभाऱ्यात त्यांची भेट होत आहे, अशी कल्पना करा. जीवनात तुम्ही अनुभवत असलेले दुःख देवाच्या दयेत मिसळू द्या. असे केल्याने देव जे करण्यास आतुर आहे, ते त्याला करू द्याल.
हे प्रभू, माझ्यावर दया कर आणि मला बरे कर. माझ्या जीवनात जिथे तुझ्या दयेची नितांत गरज आहे, ते मला दिसू दे. ते पाहताना, ज्या तुझ्या पवित्र हृदयातून दया आणि कृपा वाहतात, त्यावरही माझी दृष्टी स्थिर ठेवायला मला मदत कर. असे पाहताना तुझी अपार करुणा आणि तुझे अखंड प्रेम मला अनुभवता येवो, आणि माझ्यावर भार बनून राहिलेल्या साऱ्या गोष्टींपासून मला मुक्ती व आरोग्य लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
लिझियेची संत तेरेझ – ‘छोटे फूल’ – हिच्या सन्मानार्थ नोव्हेना
पाचवा दिवस – 26 सप्टेंबर
आजचे संत – संत कॉसमस आणि दामियान, रक्तसाक्षी




