मराठी

चिंतन 248: अमर्याद संसाधने

परुशी सिमोनच्या घरी ख्रिस्त, डिरिक बाउट्स यांचे चित्र

व्हिडिओ

कल्पना करा की अगदी थोड्या प्राणवायूपासून अमर्याद ऊर्जा निर्माण करणारे यंत्र तुम्ही बनवले आणि त्यातून तुम्हाला नैसर्गिक संसाधनांचा अक्षय स्रोत सापडला.  तुम्हाला फक्त तुम्ही बनवलेले यंत्र सुरू करायचे आहे, आणि त्यातून अखंड ऊर्जा निर्माण होत राहते.  केवढा विलक्षण शोध ठरेल तो!  पण आध्यात्मिक पातळीवर असे काहीतरी खरोखरच अस्तित्वात आहे.  ते ज्या “प्राणवायूवर” चालते, तो म्हणजे आपले दुःख आणि पाप.  आणि “ऊर्जा निर्माण करणारे यंत्र” म्हणजे येशूचे हृदय.  त्यातून निर्माण होणारी “ऊर्जा” म्हणजे देवाची अक्षय दया.  हे आपल्याला खरोखर उमगले, तर या अलौकिक स्रोताचा अमर्याद ओघ आपल्या जगाला व्यापून टाकेल.  आपल्या जीवनातील दुःख आपण देवाला अर्पण करतो, तेव्हा तो त्याचे रूपांतर करतो, हे आपण जाणले पाहिजे.  खरे तर, हीच त्याची उत्कट इच्छा आहे.  तुमच्या दुःखाचे रूपांतर आपल्या दयेत करण्याची त्याच्या हृदयाला आस आहे, जेणेकरून तुमचे स्वतःचे जीवन त्याच्या दयेने भरून जावे आणि तुमच्याद्वारे सारे जगही त्या दयेने भरून जावे.  तुमचे दुःख आणि पाप देवाला अर्पण करा आणि त्याला त्यांचे रूपांतर अखंडपणे करू द्या (पाहा दैनंदिनी #1273).

स्वतःच्या दुःखाकडे आणि पापाकडे तुम्ही कसे पाहता?  तुम्ही ते लपवता का, झाकून ठेवता का, त्याकडे दुर्लक्ष करता का आणि ते अस्तित्वातच नाही असे भासवता का?  आपल्या जीवनात पापही नाही आणि दुःखही नाही, असा आभास निर्माण करत तुम्ही जगता का?  काही जण असे करतात, तर इतर जण दुसरे टोक गाठतात: ते स्वतःची कीव करण्यात गढून जातात आणि जणू आपले दुःख ही मिरवण्यासारखी गोष्ट आहे अशा थाटात ते सर्वांना दाखवतात.  या दोन्ही मार्गांचा काही उपयोग नाही.  तुमचे पाप आणि सारे दुःख येशूच्या हृदयाकडे सोपवणे हाच खरा मार्ग आहे.  हे तुम्हाला शक्य आहे.  त्यासाठी फक्त तसा निर्णय घ्यायचा आहे.  आजच हे करा.  अशा संपूर्ण समर्पणाची सुरुवात करा. मग सर्व गोष्टींचे रूपांतर दयेत करण्याचे चमत्कारिक सामर्थ्य येशूच्या हृदयात आहे, हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. 

हे येशूच्या हृदया, माझे दुःख आणि वेदना घेऊन मी तुझ्याकडे धाव घेतो. हे प्रिय प्रभू, माझे पाप मी तुझ्या हाती सोपवतो.  कृपा करून या सर्वांचे रूपांतर तुझ्या दयेत कर, म्हणजे हे अर्पण अक्षय कृपेचा झरा बनू दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

5 सप्टेंबर – कलकत्त्याच्या संत मदर तेरेसा, कुमारी

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण