गेर्ड आल्टमान यांचे छायाचित्र पिक्साबेवरून
तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाल, तसे तुम्हाला कधी कधी वेगवेगळ्या भावना जाणवतील. काहींना देवाने आपल्याला नाकारले आहे, असे वाटेल. देव आपल्याला कधीच नाकारत नाही; पण त्याने आपल्याला नाकारल्याची भावना अंतःकरणात खरोखर जाणवू शकते. त्यामुळे काही जण आशा गमावतात. आता किंवा पुढे कधी तुम्ही निराशेशी झुंज देत असाल, तर घाबरू नका आणि निराशेपुढे हार मानू नका. त्या अनुभवात देवाला तुमच्याजवळ येऊ द्या आणि ते दुःख सोसताना त्याला तुमच्यासोबत राहू द्या (पाहा: दैनंदिनी #23).
आजही आपल्या अंतःकरणात खोलवर पाहत राहा. तुम्हाला काय दिसते? स्वतःच्या आत डोकावणे वेदनादायक असेल, तर ही वेदना देवाकडे नेणारी वाट आहे, हे लक्षात ठेवा. हे समजायला कठीण जाऊ शकते आणि ही वाट खडतरही असू शकते; पण देवपित्याने पुत्रासाठी क्रुसाचा मार्ग निवडला. बाह्य कृतीतून आणि अंतःकरणातूनही आपल्या क्रुसाचा स्वीकार करून येशूने संपूर्ण मानवी स्वभाव आपल्या देवत्वाशी एकरूप केला. आज तुमचे दुःख तुमच्या पवित्रतेचे साधन आणि देवाशी तुमच्या ऐक्याचा स्रोत ठरो.
हे प्रभू, मी माझ्या अंतःकरणात खोलवर पाहत असताना, तू मला जसे पाहतोस तसे स्वतःकडे पाहायला मला मदत कर. माझ्या मनात साचलेल्या वेदना आणि दुःख समजून घ्यायला मला मदत कर. आणि जसे तू केलेस, तसे माझ्या अंतःकरणातील वेदना स्वेच्छेने तुझ्या क्रुसाशी जोडायला मला मदत कर. हे करताना, तू जगासाठी मिळवलेली दैवी दया मला उमगू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
26 जानेवारी: संत तिमथ्य आणि तीत, बिशप




