छायाचित्र: साबिने झीरर, स्रोत: पिक्साबे
मुख्य छायाचित्र पिक्साबेवरून
तुमचे प्रेम शुद्ध आहे का? असे प्रेम कसे असते? शुद्ध प्रेम थेट ख्रिस्ताच्या हृदयातून तुमच्या जीवनात येते आणि तुमच्या जीवनातून इतरांपर्यंत वाहते. या पवित्र प्रेमाची काही सुंदर वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, ते विपुल असते. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या हृदयाने प्रेम करतो, तेव्हा आपण भरभरून प्रेम करतो. आपण किती प्रेम देऊ शकतो, याला मर्यादा नाही. ते माध्यान्हीच्या सूर्याच्या तेजासारखे आहे; त्याची किरणे खाली सर्वांवर पडतात. दुसरे म्हणजे, हे प्रेम कल्पक असते; देवाला जे आवडते ते ते करते. ते जपून पावले टाकत नाही, की हिशेब लावत नाही. ते कचरत नाही किंवा तोलामोल करत बसत नाही. उलट, प्रेमाची सुज्ञता अशी असते की प्रत्येक क्षणी देवाचे प्रेम कसे प्रकट करावे, हे त्याला लगेच कळते. आणि तिसरे म्हणजे, हे प्रेम आनंदी असते. प्रेम जेव्हा धैर्याने मोठा त्याग करण्यास बोलावते, तेव्हाही स्वतःला असे पूर्णपणे अर्पण करण्यात मोठा आनंद असतो (पाहा दैनंदिनी #140).
शुद्ध आणि उदार अंतःकरणाने तुम्ही किती मनापासून प्रेम करता, याचे आज चिंतन करा. तुम्ही स्वतःला उदारपणे देऊ करता का? आपल्याला काय किंमत मोजावी लागेल याचा हिशेब न करता सेवा करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का? इतरांवर दया करण्याचे मार्ग तुम्हाला सहज सापडतात का आणि तसे करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का? आज या प्रश्नांवर मनन करा आणि तुमच्या प्रत्येक कृतीतून प्रभूचे तेज झळकावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, माझे हृदय शुद्ध कर आणि ते पवित्र कर. माझे हृदय तुझ्या हृदयाशी एकरूप होऊ दे, म्हणजे तू जसा आहेस तसा माझ्या जीवनातून प्रकट होशील. माझ्यातून तुझे तेज भरभरून झळकू दे आणि शुद्ध प्रेमाच्या मार्गावर मला ने. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तिसऱ्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळील 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य




