मराठी

चिंतन 179: अंतर्मनातील उदासीला सामोरे जाताना

निर्जन प्रदेशातील संत जेरोम, चित्रकार: पिंतुरिक्किओ

व्हिडिओ

“प्रभू देतो आणि प्रभूच काढून घेतो…” (ईयोब 1:21).  हे किती खरे आहे!  जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा देवाकडून आपल्याला भरभरून सांत्वन मिळते.  कुटुंबात मोठा आनंद असतो तेव्हा किंवा एखाद्या व्यक्तीचे निरपेक्ष प्रेम आपल्याला अनुभवायला मिळते तेव्हा असे घडू शकते.  कधी कधी प्रार्थनेत देवाची उपस्थिती आपल्याला तीव्रतेने जाणवते आणि आपले मन आनंदाने भरून जाते.  पण जीवनात असेही अनेक क्षण येतात जेव्हा देव दूर आहे असे वाटते आणि अंतर्मनात उदासी दाटून येते.  याची काळजी करू नका.  ही उदासी पापामुळे आली असेल, तर त्या पापाला सामोरे जा, पापस्वीकारात ते कबूल करा आणि पुढे चला.  पण ती कोणत्याही पापाचा परिणाम नसेल, तर तुम्हाला कसेही वाटत असले तरी आपली श्रद्धा आणि देवावरील प्रेम अधिक दृढ करण्याची ही संधी आहे, हे ओळखा.  ही खरोखर एक कृपा आहे. आपल्या अंतःकरणात फारसे काही जाणवत नसतानाही देव आपल्यावर इतके प्रेम करतो की तो आपल्याला श्रद्धा ठेवण्यास बोलावतो. याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे (पाहा दैनंदिनी #943).

या क्षणी तुमच्या आत्म्यात तुम्हाला काय जाणवते?  देव तुमच्या जवळ आहे असे तुम्हाला वाटते का? त्याच्या जवळिकीने तुम्हाला मोठे सांत्वन मिळते का?  की देव तुमच्यापासून लपला आहे असे वाटून तुमच्या मनात कोरडेपणा आणि उदासी दाटून येते?  प्रत्येक अनुभवात आपण आनंद मानावा आणि त्या त्या क्षणी आपल्याला आवश्यक असलेली कृपा देव आपल्याला देतो, हे लक्षात ठेवावे.  तुम्हाला कसेही वाटत असले, तरी आज आपल्या श्रद्धेचे नूतनीकरण करा.  विशेषतः मनात गाढ उदासी दाटून येते तेव्हा असे करा.  त्या क्षणी तुम्ही दाखवलेली श्रद्धा तुमच्यासाठी आणि जगासाठी देवाच्या दयेची दारे उघडेल—आणि त्याचा परिणाम तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठा असेल.

हे प्रभू, माझे तुझ्यावर आजही प्रेम आहे आणि सदैव राहील. मला कसेही वाटत असले तरी तुझ्यावरील माझे प्रेम मी नव्याने दृढ करतो.  चांगल्या काळात आणि कठीण काळातही तुझ्यावर प्रेम करण्याचे, तुझ्यावर श्रद्धा ठेवण्याचे आणि तुझ्यावर भरवसा ठेवण्याचे मी ठरवतो.  सांत्वनाच्या क्षणी आणि उदासीच्या क्षणीही तूच माझा देव आहेस.  काहीही झाले तरी मी तुझीच निवड करतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

28 जुलै – संत इरेनेउस, बिशप आणि धर्मसाक्षी
यंदा हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनेत स्मृतिदिन म्हणून साजरा केला जात नाही

दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

आजचे संत व सण