पेरूच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्या
व्हिडिओ
कल्पना करा की जगातल्या वाळूचा प्रत्येक कण मोजण्याचे काम तुम्हाला दिले आहे. हे काम अशक्य आहे, हे उघडच आहे. खरे तर, जगातल्या सगळ्या लोकांनी मिळून प्रयत्न केला, तरी त्यांना हे काम पूर्ण करता येणार नाही. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच असतात. याहूनही कठीण काम म्हणजे देवाच्या दयेचा पूर्णपणे थांग लावणे. हे अशक्य आहे. देवाची दया आपल्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडे आहे. तिची खोली आणि विस्तार अमर्याद आहेत. तुम्ही सारे आयुष्य देवाच्या दयेचे चिंतन करण्यात आणि तिचा अनुभव घेण्यात घालवले, तरी तिच्या गाभ्याकडे जाण्याची ती केवळ सुरुवात ठरेल. खरे तर, आजवर अस्तित्वात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनंतकाळ देवाच्या दयेचे चिंतन केले, तरी आपल्या सर्वांचे प्रयत्न मिळूनही ती पूर्णपणे समजून घेण्यास पुरे पडणार नाहीत. देवाची दया अमर्याद आहे, हे उमगले की आपला संघर्ष कोणताही असो आणि आपले पाप कोणतेही असो, आपण आपल्या आत्म्याच्या सर्व शक्तीनिशी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळू शकतो (पाहा दैनंदिनी #1059).
देवाची दया समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? ही अमर्याद देणगी तुम्हाला कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही, याची तरी तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या प्रभूवर विश्वास ठेवायचा असेल, तर देवाच्या दयेचे चिंतन करण्याचे हे अशक्य कार्य तुम्ही हाती घेतले पाहिजे. स्वर्गात तुम्ही अनंतकाळ हेच कराल. आणि तुमच्या स्वर्गाची सुरुवात आत्ताच झाली पाहिजे. या चिंतनामुळे प्रभूवर भरवसा ठेवण्याची तुमची क्षमता वाढेल, आणि त्या भरवशामुळे तुम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवू शकाल. वाट पाहू नका; या गौरवशाली कार्याला आजच सुरुवात करा.
हे दयाळू प्रभू, तुझ्या अमर्याद प्रेमाबद्दल आणि या अथांग रहस्याच्या वाटेवर पहिले पाऊल टाकण्यासाठी तू मला बोलावलेस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझे डोळे उघडण्याची कृपा मला दे, म्हणजे मी तुझ्या दयेत खोलवर शिरू लागेन आणि आज तुझ्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
22 जुलै – संत मरिया मग्दालेना यांचा सण




