मराठी

चिंतन 314: दया हे संरक्षणाचे भक्कम कवच

प्रतिमा सौजन्य: पिक्साबे

व्हिडिओ

सैन्याला वेढा पडला की ते स्वतःचा बचाव करता येईल अशी जागा शोधते. ते लगेच एखादी उंच जागा किंवा आसरा आणि संरक्षण मिळेल असे ठिकाण शोधू लागते. तुझ्या आध्यात्मिक जीवनातही असेच असले पाहिजे. जेव्हा त्या दुष्टाचे बाण तुझ्यावर येतात किंवा जेव्हा जीवन तुला जड वाटू लागते, विशेषतः तुझ्या पापामुळे, तेव्हा उंच जागा शोध आणि सर्वोत्तम आश्रयाकडे धाव घे. आपल्या प्रभूचे दयाळू हृदय हाच तो आश्रय. त्याचे हृदय तुझ्यासाठी आश्रयस्थान आहे, याबद्दल शंका बाळगू नकोस. थकवून टाकणाऱ्या या लढाईत त्याच्या हृदयात तुला सुरक्षितता लाभेल आणि तू दयेच्या अभेद्य दुर्गात आहेस, हे तुला उमगेल. दया आपल्याला सुरक्षित आश्रय देते, हे तिचे खास अंग आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. जीवनातील हालअपेष्टा आपण एकट्याने सोसू शकत नाही. केवळ स्वतःच्या बळावर आणि कौशल्यावर विसंबून आपण जीवनातील लढाया लढू शकत नाही. चवताळलेल्या शत्रूला परतवून लावण्याइतके कौशल्य कोणाकडेही नाही. देवाच्या दयेत आश्रय घे; तो सर्व अनर्थांपासून तुझे रक्षण करील (पाहा दैनंदिनी #1516).

तुला संरक्षणाची किती गरज आहे, यावर चिंतन कर. या जगात केवळ स्वतःच्या बळावर तू कधीच टिकू शकणार नाहीस. या जगात सर्वत्र असलेले प्रलोभन, हल्ले आणि दुष्टता तुझा नाश करतील. पण तुझ्या रक्षणासाठी भक्कम किल्ला असेल, तर कशानेही तुझे नुकसान होणार नाही. देवाची दया हेच तुझे संरक्षण आहे. देव आणि त्याची दया हा तुझ्या रक्षणाचा किल्ला कसा आहे, यावर आज थोडा वेळ चिंतन कर. प्रत्येक बाबतीत देव तुझा रक्षणकर्ता आहे, हे ओळख आणि या सुरक्षित आश्रयाकडे धाव घे. प्रभू तुला आपल्या कृपेचे कवच देईल आणि आपल्या हृदयाच्या निवासात तुला शांतीत ठेवील.

हे प्रभू, जगाचे ओझे माझ्यावर येते, त्याचे हल्ले मला सोसावे लागतात आणि त्याची प्रलोभने मला भेडसावतात, तेव्हा आश्रय शोधण्याची सुबुद्धी मला दे. मी तुझ्याकडे धाव घेऊन तुझ्या दयाळू हृदयात लपावे. तू माझे पूर्णपणे रक्षण करतोस, याबद्दल मी कधीही शंका बाळगू नये आणि मला तुझ्यात सदैव आश्रय मिळावा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

10 नोव्हेंबर – थोर संत लिओ, पोप आणि चर्चचे धर्माचार्य, यांचे स्मरण


दैवी दयेवरील आणखी चिंतने

सुवार्तेवरील दैनंदिन चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत व सण